अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ

 अनाथाचा नाथ दीनाचा दयाळ

                हिरेमठ संस्थान भालकी येथील पूजनीय डॉ.बसवलिंग पट्टदेवरु महाराज यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे समाजासाठी नि:स्वार्थपणे काम करणाऱ्या संतांचे उत्तम उदाहरण होय. एखाद्या संतांनी समाजाचे प्रबोधन करीत असताना कृतीच्या माध्यमातून सामाजिक काम कसं करावं? याचा आदर्श वस्तुपाठ परमपूज्य डॉ. बसवलिंग पट्टदेवररु यांनी घालून दिलेला आहे.भालकी येथील गुरुकुल संस्था केवळ शैक्षणिक केंद्र नाही, तर एक संस्कारचे आणि सामाजिक प्रबोधनाचे विद्यापीठ आहे. याच गुरुकुलमध्ये पूज्य डॉ.पट्टदेवरू अनाथ मुलांचे पालन पोषण करतात. ज्यांचा वाली कोणीच नाही, जो दीन, दुबळा , दुःखी आणि संकटात आहे. ज्याच्यावर नको ती वेळ आलेली आहे, अशा पोरक्या लेकरांना , निराधारांना आधार देण्याचे काम अनेक वर्षापासून गुरुकुल मध्ये  केले जात आहे.

         


  पूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरु यांनी जवळपास १०५ अनाथ  मुलांना दत्तक घेतले. तिथे मुलांवर उपचार, संस्कार झाल्यानंतर काही मुलं बेंगलोरला पाठविण्यात आले,तर विदेशातील लोकांनी जवळपास आठ मुलांना दत्तक घेतले. या अनाथांपैकी दिव्यांजली नावाची मुलगी अभिनयात कन्नड झी वाहिनीवर झळकली होती. पियूसी पर्यंत शिक्षण घेऊन दिव्यांजलीने डिप्लोमा कोर्सही केलेले आहे.२०१० साली पहिले मूल आप्पाजीने दत्तक घेतले. पहिले मूल जेव्हा आप्पाजीने आणले ती कहाणी मन सुन्न करणारी अशी आहे. औराद तालुक्यातील उजनी गावात एका वर लहान लेकराला टाकून देण्यात आले होते त्या गावात काही आप्पाजींची भक्त होते. ही बातमी त्यांनी आपाजीपर्यंत पोहोचवली. आप्पाजीने गाडी पाठवून त्या अर्भकाचे भालकी येथे संगोपन केले.

            गुरुकुल येथील अनाथालयामध्ये आलेली बहुतांश  मूलं ही अर्भक होती. निसर्गत: डोळे नसलेले, अपंग आणि मतिमंद अशा लहान मुलांना मायेची ऊब देऊन वाढविणे, त्यांच्यावर संस्कार करणे, ही गोष्ट म्हणावी तितकी सोपी नाही.परमपूज्य डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांच्या संदर्भात '... तोची साधू ओळखावा' या लेखात बसव साहित्याची अभ्यासक राजू जुबरे लिहितात, "बसवण्णंIच्या विचाराचा वारसा समर्थपणे चालविणारे पूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरू गत तीन दशके निराधार, गरीब, अनाथ, डोंबारीची मुले यांच्या संगोपन व शिक्षणाची जबाबदारी घेऊन करीत असलेले कार्य या बसवविचारांचे प्रत्यक्ष आचरण होय. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक आईला नको असते. आपल्या प्रतिष्ठेपायी ती आपण जन्म दिलेल्या एका दिवसाच्या बाळाला उकिरड्यावर, दवाखान्यात, रेल्वे, बसस्थानक, नजीकच्या निर्जनस्थळी उघड्यावर टाकून जाते. अशी अर्भके हिंस्त्र प्राण्याची शिकार बनतात. त्यातून बचावली आणि माणसांच्या नजरेस पडली तर त्यांचे पुढे काय होते ? कुणास ठाऊक? परंतु असे नवजात अर्भक असल्याचे वृत्त आप्पाजींना कळले, तर अशा एक-दोन दिवसाच्या अर्भकांना आपल्या गुरुकुलात आणून त्याचे संगोपन केले जाते." वर्तमानपत्रांमध्ये ' निर्जनस्थळी एक नवजात अर्भक सापडले ' ही बातमी वाचल्यानंतर डॉ.पट्टदेवरू अस्वस्थ झाले. अत्यंत संवेदनशील मन असल्यामुळे त्यांना वाटले की, आपण या अर्भकाचे संगोपन केले पाहिजे. त्यासाठी त्यांना पोलीस स्टेशन आणि कोर्ट या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या.अनेक संकटातून मार्ग काढीत आप्पाजींनी हे कार्य अखंडपणे चालू ठेवले.                            


         'ना घर होते ना गणगोत..' या ओळीप्रमाणे या लहान मुलांना आपली जात, आपले आई-वडील, आपलं कुटुंब आणि गाव काहीच माहीत नाही. अशा मुलांना डॉ. बसवलिंग पट्टदेवरु यांनी नाव दिले.त्यांना लहानाचं मोठे केले. शिक्षणाबरोबरच उत्तम अशी संस्कार केले, आरोग्याची काळजी घेतली, ते त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजेत याची सुद्धा काळजी घेतली, नव्हे तर अनेकांचे विवाह देखील लावून दिले. 

         खरं पाहिलं तर अपंग, मतिमंद अशा मुलांना दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करताना अनेक आव्हाने येत असतात. त्यांची दैनंदिनी, त्यांचा आहार, त्यांचे शिक्षण त्याचबरोबर आरोग्य या सगळ्या गोष्टीकडे खूप बारीक लक्ष असावे लागते. यातली काही मुलं मोठी झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. इतर मुलात मिसळताना त्यांना संकोच वाटू नये, याची सुद्धा दक्षता घ्यावी लागते. हे सगळे काम पूज्य आप्पांजीनी अतिशय कुशलतेने आणि तळमळीने केले आहे. या लहान मुलांचा सांभाळ करत असताना आप्पाजींनी अनाथ मुलांसाठी स्वतंत्रपणे घर बांधले. त्यांच्या संगोपनासाठी महिला ठेवल्या. त्या मुलांना आपल्या आईची उणीव भासू नये, ही काळजी  त्यांनी घेतली. पाळण्यात झोपलेली ही निरागस लहान अनाथ मुलं जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या अंगावर शहारे येतात.

         


       अर्भकांचा सांभाळ करताना अगदी आहार व आरोग्यापासून सूक्ष्मपणे काळजी घ्यावी लागते. एक वर्षापर्यंत बाळ असेल तर गाईचं दूध दिलं जातं. दोन वर्षाच्या पुढच्या लेकरांना व्हेजिटेबल फ्रुट मिक्स करून पाजवलं जातं. अगदी सुरुवातीपासून अनाथालयात असलेले श्रीमती महालक्ष्मी म्हणतात की," अशा लेकरांचा सांभाळ करण्यासाठी सेवा करण्याची मानसिकता असली पाहिजे. या लेकरांचे अनेक अडचणी असतात. काही इतकी अपंग आहेत की, ते जागेवरून उठू शकत नाही. संयम असल्याशिवाय अपंग, मतिमंद लेकरांचा सांभाळ चांगल्या प्रकारे करू शकत नाही. परंतु कालांतराने ही मुलं जेव्हा चांगली होतात तेव्हा होणारा जो आनंद असतो, त्याची तुलना कशासीही करता येत नाही."

                अनाथ मुलं काही प्रमाणात मानसिकदृष्ट्या खूप खचलेले असतात. त्यांना जेव्हा कळायला लागतं तेव्हा वाटू लागते की, आपल्याला इतराप्रमाणे कुटुंब नाही. आपल्या आई वडील कोण असतील? आपल्याला असं का टाकून दिलं असेल? इत्यादी अनेक प्रश्नांचे कल्लोळ त्यांच्यामध्ये निर्माण होत असतात.अशाप्रसंगी त्यांचं समुपदेशन करीत त्यांना सतत आधार द्यावा लागतो.अनाथ मुलांचं संगोपन करणं म्हणजे केवळ अन्न, वस्त्र आणि निवारा याची सोय करणे नव्हे, तर त्यांना आनंद,विश्वास व बळ देणे होय. हे काम गुरुकुलमध्ये आप्पाजीच्या मार्गदर्शनानुसार अतिशय मनापासून केले जाते. याची प्रचिती तिथे गेल्यानंतर प्रत्येकाला आल्याशिवाय राहत नाही. या अनाथ मुलांसोबत आप्पाजींचं नातं हे रक्तांच्या नात्यापेक्षा किती घट्ट आहे, हे कळायला लागतं. 


               आज समाजातील काही ढोंगी साधुसंत पाहिले तर माणूस बेचैन होतो. खरा संत कोणाला म्हणावं? संतांची लक्षणे कोणती आहेत? हे जाणून घ्यायचे असेल, तर आपण राजू जुबरे लिखित 'महाजंगम पूज्य श्री डॉ. बसवलिंग पट्टदेवरु' हा ग्रंथ वाचायला हवा. आप्पाजींचे मन किती मोठे असेल? खरे तर आप्पाजी संवेदनशीलतेचा महामेरू आहेत. कारण आप्पाजी आपला वाढदिवस भव्य दिव्य स्वरूपात साजरा न करता ते अनाथ मुलांचा वाढदिवस म्हणून सातत्याने साजरा करीत असतात. हे अत्यंत प्रेरणादायी व आदर्श  आहे. आपला वाढदिवस म्हणजेच त्या लेकरांचा वाढदिवस या भावनेने साजरा करत असताना सर्व मुलांना अंग भरून कपडे घेणे, त्यांना गोड खाऊ घालणे आणि त्यांच्याशी एकरूप होण्याचे काम आपाजी केवळ वाढदिवसालाच नाही, तर सातत्याने करीत असतात.

          गुरुकुल येथील अनाथ मुलांना जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर सुखा - समाधानाचे आणि प्रसन्नतेचे भाव दिसतात. त्यांच्यात अभूतपूर्व असा बदल झालेला दिसून येतो. इतकी काळजी आणि जीव त्या अनाथ मुलांशी लावला गेला आहे. हे सर्व कार्य पाहिल्यानंतर परमपूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरु यांचे व्यक्तिमत्त्व उच्च कोटीच्या संवेदनशीलता आणि मानवतेचा आहे,याचा प्रत्यय येतो. अनाथामध्ये देव पाहणाऱ्या अशा या दिनाचा दयाळू असलेल्या परमपूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरु महाराज यांना कोटी कोटी वंदन!

------------------------------------

(परमपूज्य डॉ.बसवलिंग पट्टदेवरु हिरेमठ संस्थान, भालकी जि.बिदर कर्नाटक यांच्या  अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दि.२२ एप्रिल २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमात आप्पाजींचे गौरव करताना भारताचे उपराष्ट्रपती मा.सी.पी.राधाकृष्णन, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. मल्लिकार्जुन खर्गे, कर्नाटकाचे राज्यपाल मा.थावरचंद गेहलोत इत्यादी मान्यवर...)

                                                                                                                           - म. ई. तंगावार

                                                          उदगीर जि. लातूर  भ्र.९८९००६५६९०

                                                                                    

Comments

  1. लेख वाचला. आप्पाजी व अनाथ मुलं यांच्यावर लिहीलेला लेख खूप छान झाला आहे. अभिनंदन आपले.💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पर्यावरण संवर्धन काळाची गरज

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

बिकट वाट वहिवाट नसावी