पर्यावरण संवर्धन काळाची गरज
पर्यावरण संवर्धन काळाची गरज
पर्यावरणाची समस्या ही गंभीर होत चालली आहे. आज या समस्येला वैश्विक रूप प्राप्त झाले. पन्नास वर्षांपूर्वी पर्यावरण या विषयावर जगात अशी चर्चा होत नव्हती, परंतु आज प्रमुख विषयांपैकी हा एक महत्त्वाचा विषय बनलेला आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. पर्वताच्या प्रदेशात भूस्खलन वाढत आहेत. नदीकाठच्या गावांना सातत्याने महापुराचा तडाखा बसत आहे. शहरीकरण व औद्योगिकीकरणात वाढ झाली. शेतकरी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अति वापर करीत आहे. चक्रीवादळ, भूकंप यासारख्या आपत्तीमध्ये वाढ झाली आहे. एवढेच नव्हे, तर माणसाचे आयुष्य देखील कमी होत चालले आहे. या सर्व व गोष्टीला पर्यावरणाचे बिघडलेले समतोल कारणीभूत आहे.
पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे सध्या तरी गरजेचे वाटते. माती, हवा व पाणी हे खरे तर निसर्गाचे प्राण आहेत. या घटकाशिवाय माणूस देखील जगू शकत नाही. या महत्त्वाच्या घटकांची प्रकृती ही मोठ्या प्रमाणात बिघडून गेली. पर्यावरण संवर्धनात पाणी खूप महत्त्वाचे आहे. पाण्यासाठी तिसरे महायुद्ध होईल असे नेहमी बोलले जाते. जिथे पाणी मुबलक आहे तिथे पाणी अशुद्ध दिसत आहे. पूर्वी नद्या, नाले, ओढे भरभरून वाहायचे. ते चित्र मात्र सध्या तरी खूप कमी आहे.लोक समुद्रात बांधकाम करून हस्तक्षेप करीत आहेत. बारा महिने वाहणाऱ्या नद्या पावसाळा संपताच कोरडे पडत आहेत. थोड्याफार प्रमाणात असलेले पाणी देखील गढूळ होत आहे. शहरातील सांडपाणी, कचरा, प्लास्टिक याची विल्हेवाट कशी लावायची? याचे नीटनेटके शास्त्रशुद्ध नियोजन आपल्याकडे फारसे नाही. नद्यावर,समुद्रावर माणूस आक्रमण करीत आहे. नदीत गाळ नाही, नदीच्या काठावरच सौंदर्य हरवून गेलं. नको त्या गोष्टीचे विसर्जन पाण्यात केले जाते.त्यामुळे नदीतील सजीवसृष्टी नष्ट होत आहे. गंगेची स्वच्छता, पाणी आडवा पाणी जिरवा हा नारा देऊन चालणार नाही, तर हा कृती आराखडा बनला पाहिजे, तसे अजून मात्र झाले नाही.
पर्यावरणातील अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे माती होय.माती ही सजीवांसाठी एक संजीवनी असते. माती सृष्टीचा आधार आहे. ग्रामीण भागात झाडी-झुडपे कमी झाल्यामुळे थोड्याशा पावसाने माती वाहून जात आहे. त्यामुळे जमीन नापीक बनत आहे. रासायनिक खताच्या अति वापरामुळे मातीचा गुणधर्म नष्ट होतो. त्यामुळे सेंद्रिय शेती प्रभावी चळवळ होणे काळाची गरज आहे. मातीचं विहिरीत ,धरणात ,नद्यांमध्ये व कालव्यात वाहून जात असेल तर पाण्याची साठवण कमी होईल. मागच्या पाच ते सहा वर्षांपासून उन्हाळ्यात तळ्यातील गाळ उपसा कार्यक्रम चालू आहे. नैसर्गिक माती वाहून जात असेल तर चालेल पण एखाद्या टेकडीवरील, डोंगरावरील माती जेव्हा काढले जाते किंवा झाडे तोडली जातात तेव्हा दरड कोसळण्याचे प्रमाण वाढते. कचरा, प्लास्टिक यामुळे मातीची आरोग्य बिघडत आहे.माती किंवा जमीन कशीही असली तरी ती पवित्र व कसदार असते. कवी बा.भ.बोरकर यांनी एका कवितेत आले आहे, 'जेथे कोरडी माती हरळी देखील रूजत नाही l तिला सुद्धा ओल आणा जमीन वांझ असत नाही.'
पर्यावरणाच्यादृष्टीने सर्वात महत्त्वाचा आणि आवश्यक घटक म्हणजे हवा होय. वृक्षाचे कमी होत चाललेले प्रमाण, वाहने व कारखान्यांमध्ये झालेली वाढ यामुळे शुद्ध हवा भेटत नाही. जाळेतून निघणारे धूर, शेतातील पिकावर व फळावर केली जाणारी फवारणी, वेगवेगळे उद्योग धंदे यामुळे हवेचे प्रदूषण वाढत आहे. मोठी शहरं आता धोक्याची घंटा बनत चालले आहेत. पर्वताच्या रांगेतील लोकांचे आरोग्य चांगले असतेच, त्यामुळे ते अधिक काळ जगतात. त्यास तिथे असलेली शुद्ध हवा कारणीभूत आहे.हवेतील प्रदूषण आपणास सहजपणे दिसत नाही, पण त्याचे अस्तित्व मात्र नक्कीच जाणवते. हवेच्या प्रदूषणाचा परिणाम केवळ माणसावरच होतो असे नाही, लहान-मोठे पक्षी कीटक यांच्यावर होतो. काही प्रमाणात सरकारने कायदे कडक केले. त्यामुळे शेतात थुई थुई नाचणारे मोर, हरीण इतर प्राणी मोठ्या प्रमाणात दिसत आहे. कोरोना काळात हवा स्वच्छ झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत आहे.
एकंदरीत वायू, जल, मृदा, वनस्पती इत्यादींची काळजी बारकाईने घेतल्याशिवाय पर्याय नाही. जित्राब सांभाळणारा शेतकरी हा एका अर्थाने पर्यावरण संवर्धनाचा घटक काही प्रमाणात होऊ शकतो. निसर्गाचे संवर्धन केल्यासचं निसर्गातील जैवविविधता टिकून राहू शकते.नैसर्गिक साधनसंपत्तीत सौर ऊर्जा न संपणारा घटक आहे.त्याचा अधिकाधिक वापर करावा लागेल. जागतिक तापमान वाढीस निसर्गातील रौद्ररूप, केवळ माणसाचा स्वार्थीपणा , भौतिक सुखाविषयीचे आकर्षण या गोष्टी कारणीभूत आहेत. जीवन जेव्हा आपण नैसर्गिकपणे जगतो तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनात आनंद निर्माण होतो. शेतातील झाडे तोडून घरातील कुंड्यांमध्ये झाडे लावणाऱ्याची संख्या सगळीकडे वाढत आहे. सांगण्याचे तात्पर्य असे की मानवाचे निसर्गाशी असणारे नाते कृत्रिम झाले आहे.जोपर्यंत निसर्गातील सर्व घटकांशी आपले नाते नैसर्गिक राहणार नाही, तोपर्यंत पर्यावरणाचे संवर्धन तरी कसे होणार?
पर्यावरण संवर्धनात झाडाची भूमिका महत्त्वाची असते. निसर्गातील पशुपक्षी, प्राणी एकंदरीत सर्व सजीवांचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक जण कमी-जास्त प्रमाणात एकमेकावर अवलंबून असतात.जसे झाडांना पाण्याची गरज असते तसेच सूर्यप्रकाश व मातीचीही गरज असते. असंख्य पक्षाचे वस्तीस्थान झाडावरच असते.झाडांची पानं,फुलं,फळ,फांद्या खाणारी अनेक पक्षी प्राणी कीटक असतात. थोडक्यात 'एकमेका साह्य करू l अवघे धरू सुपंथ' या उक्तीप्रमाणे पृथ्वीतलावरील सर्व घटकांची वाटचाल हजारो वर्षापासून चालू आहे.
सद्य:परिस्थितीत संपूर्ण जगात 'झाडे लावा झाडे जगवा' ही मोहीम चालू आहे.झाडाचे अनेक फायदे आहेत. झाडामुळे प्राणवायू तर मिळतोच, पण वातावरण थंड होते. त्यामुळे पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होते.माणसांच्या अनेक गरजा झाडामुळे पूर्ण होतात. आयुर्वेदात तर वनस्पती आणि झाडांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. पशु प्राण्यांना अन्न पुरविणारे झाड माणसांनाही फळाच्या माध्यमातून आहार पुरवितात. केवळ पशु प्राणीच नाही, तर अनेक माणसं झाडांचा आसरा घेऊन निवासस्थान तयार करतात. जमिनीची धूप थांबविणे, पाणी पुरविणे हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य झाडे करीत असतात. झाडापासून रबर,
कागद,आरमार,खेळाचे, शेतीचे साहित्य, घरासाठी लागणारे लाकूड इत्यादी असंख्य उपयोगाचे वस्तू तयार होतात. पर्यावरणाचा समतोल आजपर्यंत जो टिकून आहे, त्याला झाडे कारणीभूत आहेत.
काही झाडं पाचशे वर्षे जगतात.हजार वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहणारी जिन्कगो नावाचे झाड पृथ्वीतलावर आहेत. वड, कडुनिंब, पिंपळ जागोजागी दिसून येतात. हे माणसांनीच लावले, असे म्हणणे चुकीचे आहे. झाडाच्या वाढीस पक्षी देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असे सांगितले जाते की, एखादं झाड पन्नास वर्षे राहिले तर ते झाड पाच ते सहा लाख रुपयाचे ऑक्सिजन निर्माण करते. मातीची सुपीकता टिकविणे, प्रदूषण नियंत्रित ठेवणे तसेच उत्पन्नाचे साधन म्हणून झाडाकडे पाहिले जाते. सर्वसाधारणपणे एका दिवसात एक माणूस एक सिलेंडर भरेल इतका ऑक्सिजन श्वसन करतो. झाड आपणास किती लाखाचे ऑक्सिजन देत असतील याची कल्पनाही आपणास करता येणार नाही. हजारो लिटर पाण्याचे संवर्धन करणाऱ्या झाडाचे मोल,मनोगत संवेदनशीलतेने समजावून घ्यायला हवे.
तसे पाहिले तर झाडे लावण्यासाठी पूर्णवेळ कार्य करण्याची गरज नाही. आज सीड बॉलच्या माध्यमातून हे काम सहजपणे केले जात आहे. हे काम तर इतर घटक इतर गोष्टीद्वारे करत असतात. हवा बियांना दूरवर नेऊन टाकतात. पाऊस पडल्यानंतर त्या बियाचे रोपट्यात व वृक्षात रूपांतर होते. वर्धमान महावीर आणि त्यांच्या शिष्याच्या संदर्भात एक घटना सांगितली जाते. वर्धमान महावीर आणि त्यांचा एक शिष्य प्रवास करीत होते.त्यांना रस्त्यात एक जमिनीवर रोपटे दिसले. शिष्य महावीरांना म्हणतो, हे झाड जगेल, टिकेल असे तुम्हाला वाटते का? तेव्हा महावीर म्हणतात, हो नक्कीच टिकणार. तेव्हा शिष्य रोपटे उपटून टाकून देतो. महावीर काही बोलत नाहीत. पुढे निघून जातात.पाऊस पडल्यानंतर ते रोपटे पुन्हा जमिनीला चिटकते.मातीत मुळे खूपसत उभे राहते. महावीर आणि शिष्य काही दिवसानंतर त्या रस्त्याने जातात तर ते रोपटे अगदी अभिमानाने डुलत होते. आपले नाते त्या रोपट्याने जमिनीशी घट्ट जोडले होते. सांगण्याचे तात्पर्य हे की, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पूर्वी माणसाला वैज्ञानिक जाणीव नसली तरी नैसर्गिक जाणीव होती. म्हणून तेराव्या शतकात संत नामदेवांनी असे म्हटले आहे,' जे वृक्ष लावती सर्वकाळ l तयावरी छत्राचे छल्लाळ'
सध्या 'झाडे लावा झाडे जगवा' हे बाह्य प्रदर्शन झाले आहे. सरकारचे परिपत्रक आहे म्हणून किंवा आपणास फळे खायला मिळतील म्हणून झाड लावल्यास पर्यावरणाचे संवर्धन कसे होईल? असा प्रश्न पडतो. शहरांना जोडणारे महामार्ग, चौपदरी रस्ते, रिंगरोड करताना असंख्य झाडे तोडली जात आहेत. पण त्या झाडावर असणाऱ्या जीवांचा विचार कोण करणार? ठीक आहे सोईसाठी,विकासासाठी म्हणून झाड तोडत असलो तरी त्याच्या कमीत कमी तीन चार पटीने अधिक झाडे आपल्याला लावता आली पाहिजेत. नुसते लावून चालणार नाही, तर ते टिकवली पाहिजेत.तरच सजीव याबरोबरच सृष्टीवरील सौंदर्य टिकून राहील. मनाला आनंद देणारी आंबराई घनदाट जंगले कमी झाली तर पृथ्वीचा अस्तित्व जास्त काळ राहणार नाही. कारण पर्यावरण हा माणसाचा श्वास आहे. ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. तरच या विषयीची कृतज्ञभाव माणसाच्या अंगी निर्माण होईल. कवी रमण रणदिवे यांची झाडे नावाची कविता आहे. ते लिहितात,
''झाडे असतात आईसारखी आतून प्रेम करणारी
पाखरांचा संसार सावरण्यासाठी मर मर मरणारी
दगा देऊन ऋतू जातात इमान राहतात मातीशी
माथ्यावरती विजा झेलीत नाते सांगतात पावसाशी
हिरवेपण ओरबाडून ग्रीष्म जातो निघून दूर
वसंत उतरला पालवीत की झाडे लावतात हिरवा सूर
झाडे असतात प्रामाणिक करीत नाहीत विश्वासघात
जे हात घाव घालतात त्यांच्याही चुली पेटवतात.''
पर्यावरण संवर्धनासाठी जलपुनर्भरण देखील काळाची गरज आहे. कारण पाण्याशिवाय जीवन जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही.घरात भरपूर संपत्ती आहे पण पाणीचं नाही. जमीन सुपीक आहे पण पाऊस नाही. तेव्हा त्या घराला आणि जमिनीला काही अर्थ राहत नाही. तहान लागलेल्या माणसाला समोर भाकरी, सोने व पैसे ठेवून चालणार तरी कसे? जिथे पाणी तिथे हिरवळ असते. पाच पन्नास वर्षापूर्वी माणसाला जलपुनर्भरण करण्याची गरज नव्हती. इतका निसर्ग समृद्ध होता. नैसर्गिक पुनर्भरण आपले कार्य करीत होते. जेव्हा रिमझिम पाऊस पडायला लागतो. जमिनीच्या भेगातून,फटीतून पाणी जमिनीत मुरत असते.ही पुनर्भरणाची नैसर्गिक प्रक्रिया असते. मानव बेसुमार पाणी जमिनीतून उपसत आहे. मात्र त्याचा योग्य वापर करताना दिसत नाही.जेव्हा पाणी अडविले जाते तेव्हा पाणी साठून राहते. साठवलेले पाणी जमिनीत मुरायला लागते. त्यालाच आपण जलपुनर्भरण असे म्हणत असतो. पावसाच्या पाण्याची साठवण करून पूर्णपणे एखादे दोन वर्षे वापरता येते. त्यामुळे भूजलातील ओलावा वाढत असतो.
पाझर तलाव, गाव तलाव, आणि नालाबंडिंग म्हणजे डोंगराच्या उतारावर बांध घालून पाणी अडविने. साठवण तलाव, कोल्हापुरी बंधारे, शेततळे, सिमेंट व दगडी बंधारे ,बोर, विहीर, कालवे, चलमे, शोषखड्डे याद्वारे जलपुनर्भरण करता येते. जलपुनर्भरण आणि पर्यावरण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आज भूजलाची पातळी घटत आहे. पाचशे ते हजार फुटापर्यंत पाणी गेले आहे. एकेकाळी हेच पाणी वीस ते पंचवीस फुटावर होते. पन्नास ते शंभर वर्षांपूर्वीचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, गावात बोर ,हापसे नव्हते.होत्या फक्त विहिरी. सांडपाणी व पिण्यासाठी बारामही विहिरीचा वापर होत असे. गावातील वळचणीचे छपरावरचे ,पत्रावरचे पाणी गावातच थांबायचं आणि गावातील विहिरीचं पुनर्भरण व्हायचं. आज आपण पाण्याचा उपसा करीत आहोत, पण भूजल पुनर्भरण याचा विचार करीत नाही. ओढे, बंधारे ,झाडे,गवत हे जवळपास एकमेकावर अवलंबून आहेत. दोन ते चार किलोमीटरच्या परिसरात आजूबाजूला तळे असतील, तर त्या सभोवतालच्या सर्व विहिरींना पाणी भरपूर असते. विहिरीच्या बाजूला दोन खड्डे पाडून पाईपद्वारे पाणी विहिरीत सोडण्याची प्रक्रिया शेतकरी पाच टक्के देखील करीत नाही. पाणी आणण्यासाठी जेव्हा कष्ट घ्यावे लागतात तेव्हा माणूस पाणी जपून वापरत असतो.आज बहुतांश लोकांच्या घरी हातापायाला पाण्याचे नळ आहेत. पोहऱ्याने विहिरीतून पाणी काढणे व विद्युत मोटारीद्वारे पाणी काढणे यात फरक आहे.
शहरात तर फरशी, टाइल्स,सिमेंट, गिट्टी, मुरूमचा वापर होत असल्यामुळे जमिनीत पाण्याला मुरण्यासाठी जागाच राहिली नाही. धावणारं पाणी चालवण, चालणाऱ्या पाण्याला बाळासारखं रांगत करण व रांगणाऱ्यांला थांबवण.हे जलपुनर्भरनाचे गमक आहे.खर्या अर्थाने जल पुनर्भरणाचे काम सहजपणे झाडे करीत असतात. झाडाची मूळ जमिनीचे थर ढिले करतात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीच्या पोटात जात असते. पाण्याचा ओलाव्यामुळे झाड हिरवेगार राहते. ही एकमेकांना मदत, सहकार्य करण्याची सवय माणसाला मात्र पडली नाही. घरात, शेतात विहीर व बोरवेल नसेल तरी शेजारच्या बोरला पाणी येईल या उदात्त भावनेने सामाजिक कार्य म्हणून माणूस जलपुनर्भरणाचे काम करीत नाही.
इजराइलमध्ये 60% वाळवंट असूनही पाण्याचा पुनर्वापर करून शेतीचा विकास त्यांनी केला. तिथे 80% पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. भारतात अनेकांच्या घरात अंगणात बोअरवेल, विहिरी आहेत. बाजूला खड्डा तयार करून त्यात दगड, विटा टाकून पाईप बोरवेलमध्ये फार लोक सोडत नाही. गच्चीवरचे पाणी फिल्टर करून बोरवेलमध्ये सोडल्यास,बाजूला शोषखड्डा घेतल्यास नक्कीच पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. शिरपूर पॅटर्नच्या निवृत्त भूवैज्ञानिक सुरेश खानापूरकर यांनी नाल्यांमध्ये बंधारे बांधून गावातले पाणी गावात, शेतातले पाणी शेतात अडविण्यासाठी प्रयोग केले. जलपुनर्भरनाचा हा एक उत्तम असा प्रयोग आहे.
ग्रामीण भागातील तलाव भूजले जात आहेत. छोट्या-मोठ्या खड्ड्यांना लेव्हल करून जमीन केली जात आहे. आपल्या शेतात पाणी थांबता कामा नये म्हणून शेतातील धुरे फोडली जात आहेत. परिणामी पाणी वाहून जात आहे. जमीन घट्ट होते त्यामुळे पाणी मुरत नाही. अधिकाधिक शेततळे, तळ्यातील गाळ काढणे आज काळाची गरज आहे. तरच जमिनीची तहान भागेल. जल पुनर्भरणाचे प्रयोग शासनाच्या जलयुक्त शिवार, पाणी फाउंडेशनमुळे काही प्रमाणात नक्कीच झाले आहे. बहुतांशी शेतकऱ्यांकडे आजही ठिबक, तुषार नाहीत. कालव्याने पाणी सोडले जाते. त्यामुळे माती वाहून जाते. पिकांचे नुकसान होते.तुषारमुळे पाणी जमिनीत मुरायला लागते. यामुळे पाण्याची पातळी वाढते. जमिनीची धूप थांबवून ओलावा राहिल्यास झाडे हिरवी राहतात. हिरवी राहत असल्यामुळे पक्षी टिकून राहतात. एकंदरीत पर्यावरणाचे संवर्धन व्हायला लागते. जलपुनर्भरण यासाठी घर तिथे शोषखड्डा, शेत तिथे तुषार-ठिबक, गाव तिथे झाडे, असे असंख्य प्रयोग प्रबोधनातून वेळप्रसंगी कायदे करून राबविण्याची गरज आहे. आपण पृथ्वीच्या बाह्य रूपाचा विचार करतो.त्याच्या अंतरंगाचा विचार करून प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक आहे. अन्यथ: ही धरतीमाता आपणास थारा देणार नाही. जलपुनर्भरण लोकचळवळ व्हावी, असे वाटत असेल तर जलसाक्षर झाल्याशिवाय पर्याय नाही. एकंदरीत पर्यावरण हा विषय आस्थेचा झाला पाहिजे. याशिवाय माणसासमोर दुसरे पर्याय नाही. खरंतर आज पाऊस वेळेवर का पडत नाही या मागचे कारण योगीराज माने नावाच्या कवीने आपल्या 'पाऊस' नावाच्या कवितेत सांगितले आहे. ही कविता अंतर्मुख करून विचार करायला भाग पाडणारी आहे. ते असे म्हणतात की,
''पूर्वीची माणसं जितकी खरी होती
तितकाच पाऊस सुद्धा खरा होता
प्रत्येकाच्या हृदयात माणुसकीचा झरा होता
आताची माणसं खोटं वाटतात
तसा पाऊस सुद्धा खोटा वाटतो
एक-दोन मिलिमीटर पडण्यासाठी
पेटी भरून नोटा मागतो
बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा
नदीच्या पुरात मंदिराचा कळस सुद्धा बुडायचा
रानातलं वाहत पाणी आता कुठे दिसत नाही
झाड हिरवं नाही म्हणून पाखरू सुद्धा बसत नाही
खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखा वागत नाही
अख्खा पावसाळा गेला तरी
चिखल पायाला लागत नाही
पाहू तिथे सगळे कसे हिरवे हिरवे गार होते
पावसाच्या तालावर नाचणारे मोर होते
हल्लीच्या मोराचा पिसारा झडून गेला
माणसाच्या काळजातला हिरवा रंग उडून गेला
आजी पाकडायची दळण तेव्हा चिमण्या सुपात यायच्या
धीट होऊन साऱ्याजणी एकेक दाणा टिपायच्या
अंगण आता उरलं नाही चिमण्या साऱ्या उडून गेल्या
बंद खिडकी पाहून चिमण्या जाता जाता रडून गेल्या
मला वाटतं चिमण्यांनी त्यांच्यासोबत पाऊस नेला
दृष्ट पापी माणसाला तळतळून शाप दिला
हवा तेव्हा यावा पाऊस असं कधीच घडणार नाही
तू वाट बघत रहा पाऊस आता पडणार नाही…!
(पेपर: 'पर्यावरण अभ्यास' सर्व पदवी अभ्यासक्रमास शेवटच्या वर्षी अनिवार्य असलेली अभ्यासपत्रिका)
म.ई.तंगावार
श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर
९८९००६५६९०
metangawar@gmail.com
खूप छान
ReplyDeleteHadole pranita B. A. T. Y
ReplyDelete