मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी
मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी
समाज व संस्कृतीचे वाहक म्हणून आपण भाषा व साहित्य याकडे पाहत असतो. महाराष्ट्रातील मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, हे काही प्रमाणात तथ्य असले तरी रोजगाराच्या कुठल्याच संधी उपलब्ध नाहीत, असे म्हणणे देखील चुकीचे आहे. ज्यांच्याकडे कौशल्य आहे, जो प्रामाणिकपणे एखादे काम करतो, सातत्य व जिद्द ज्यांच्यामध्ये आहे, ते शक्यतो बेकार राहू शकत नाहीत. आपल्या स्वतःच्या विश्वकोशातला पहिला शब्द म्हणजे आळस हा दुर्गुण. त्यामुळे आपणास अनेक संकटाला तोंड द्यावे लागते. जीवन व्यवहाराच्या सर्वच क्षेत्रात साहित्य व भाषेची आवश्यकता असते. भाषेशी संबंधित करिअरची क्षेत्रे शेकडो आहेत. कुठल्याही गोष्टीविषयी मनात साशंकता असेल तर आत्मविश्वास कमी पडतो. आत्मविश्वासाने व गांभीर्याने आपल्यातला राजहंस ओळखून आपण जर भाषा व साहित्याचा विचार केला तर लक्षात येईल की, यात जागोजागी संधी दडलेल्या आहेत. आकाश खूप मोकळं व स्वच्छ आहे. गरज आहे आपण खिडकी काढून बाहेर पाहण्याची.
एकविसावे शतक माहिती-तंत्रज्ञानाचे शतक जसे आहे, तसे धावपळीची शतक देखील वाटायला लागले आहे. अशा वेळी लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्यासाठी प्रसारमाध्यमे हे एक महत्त्वाचे साधन ठरते. या क्षेत्रात प्रयत्नवादी आणि कौशल्याने युक्त असलेल्या व्यक्तींना खूप संधी आहेत. 'न बोलणाऱ्याचे सोने ही विकली जात नाहीत आणि बोलणाऱ्याच्या चिंध्या विकल्या जातात' असे जे म्हटले जाते, त्यात काही प्रमाणात तथ्य वाटायला लागते. लोकांशी चांगल्या प्रकारे संवाद साधणारा तसेच लिहिणारा आजही तो बेकार राहू शकत नाही. तंत्रज्ञानाच्या युगात माणूस यंत्रासारखे संवेदनहीन बनत चालला असला तरी माणूस हा संवेदनशील व सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे साहित्याची मानवी जीवनात नितांत गरज आहे. मराठीत अण्णाभाऊ साठे, उद्धव शेळके, विरुपाक्ष व उमा कुलकर्णी असे कितीतरी साहित्यिक आहेत ज्यांनी लेखनातून काही प्रमाणात रोजगार शोधला होता. आजही लेखन काही जणांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे.
मराठी भाषिक किंवा मराठी विषयाचे पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थी सन्मानाने जीवन जगू शकत नाहीत.त्यांना रोजगार मिळत नाही, असेही बोलले जाते. महाराष्ट्राचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की येथे सतर ते ऐशी टक्के लोक येथे मातृभाषेतून संवाद करतात. याच भाषेच्या आधारे जीवन जगतात व व्यवहारही करतात. हे सत्य असूनही मराठी माणूस अर्थार्जन करू शकत नाही, असे बोलले जाते हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
आज मी ज्या परिसरात राहतो, त्या शहरात पाच ते सहा तालुक्यातील व्यापारी, कर्मचारी स्थायिक आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक व प्राध्यापकांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. एक ते दोन तरुण मराठीत अचूक टंकलेखन करणारे सोडले तर तिसरा माणूस सापडत नाही. येथे काही दैनिक व लोकल चैनल्स चालतात. तिथे भाषेवर, लेखनावर प्रभुत्व असणारे, प्रयत्न करणारे तसेच कौशल्ययुक्त विद्यार्थी मिळत नाहीत. त्यांना टाईपसाठी, बातम्या देण्यासाठी, मुद्रित शोधण्यासाठी तसेच बातम्या सांगण्यासाठी मुलगा-मुलगी पाहिजे अशा जाहिराती द्यावे लागते. खरोखरच बेकारीची तीव्रता इतकी असेल तर त्या जाहिराती कशामुळे दिल्या जातात असा प्रश्न पडतो.
आजच्या या काळात प्रसारमाध्यमे तर संधीचे केंद्रच आहेत. आज माध्यमांमध्ये जे लेखक, पत्रकार आहेत ते अगदी तरुण आहेत. चोवीस तास अनेक मराठीतील वृत्तवाहिन्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तिकडे माध्यमं विविध क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटी असलेल्या वार्ताहाराच्या शोधात असतात. दृक-श्राव्य माध्यमात संवाद व पटकथा लेखकाला भरपूर पैसे मिळतात. नाटक, चित्रपट मालिकांच्या संहितालेखनाच्या प्रत्येक एपिसोडला तसा दर्जा असेल तर दहा ते पंचवीस हजार रुपये मानधन दिले जाते.आकाशवाणी आणि दूरदर्शन या सरकारी तसेच खाजगी वाहिन्यांमध्ये निवेदकासाठी चांगल्या संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात पैसा व प्रसिद्धी देखील मिळत असते. हंगामी निवेदक तसेच विविध मालिकेत उत्कृष्टपणे भाषण देणाऱ्याना संवाद संवादकाना योग्य असे मानधन दिले जाते.
प्रसारमाध्यमातून काम करणाऱ्याना महिन्याला पाच ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाते.संपादक व उपसंपादक यांचे वेतन तर काही ठिकाणी लाखापेक्षा अधिक आहे. प्रसार माध्यमात करिअर करण्यासाठी फिरण्याची व निरीक्षणाची आवड , सामाजिक बांधिलकी,लेखन-वाचन, आधुनिक साधने हाताळण्याचे कौशल्य, बातम्यांची सुसूत्रता अचूकता, मांडणी, संवाद कौशल्य,संवादातील आरोह-अवरोह अशा विविध कौशल्यांची आणि ज्ञानाची आवश्यकता असते. यासाठी मोबदलाही त्यांना चांगला दिला जातो. या क्षेत्रात एक वेगळी प्रतिमा तयार होते, नव्हे तर एखादे वृत्तपत्र त्या संपादकाच्या नावावरून ओळखले जाते. क्रिएटिवपणा, लोकांना भेटण्याची आवड, उत्तम संवाद साधण्याची कला व मेहनत घेण्याची प्रवृत्ती असेल तर निश्चितच माध्यमांमध्ये सुवर्ण अशा संधी आहेत.
वृत्तपत्र, रेडिओ,दूरदर्शन क्षेत्रातील जाहिरातीसाठी कल्पकतेची आवश्यकता आहे. जाहिरात क्षेत्रात, ग्रंथांचे मुखपृष्ठ तयार करण्यात तरुणाईला उत्तम संधी आहे. अलीकडे बहुतांश ठिकाणी जनसंपर्क अधिकारी हे पद भरले जात आहे. यासाठी फक्त पदवीची गरज आहे.तांत्रिक ज्ञान, संवाद कौशल्य व लेखन कौशल्य या क्षेत्रासाठी फायदेशीर ठरते.
विविध कार्यालय, वांग्मय तसेच पर्यटनाच्या ठिकाणी मराठी भाषिक तरुणांना रोजगार मिळू शकतो.महाराष्ट्र विधानसभेत सहा भाषा जाणकारांची शब्दांकनासाठी आवश्यकता असते. १९६ देशातील राजदूत दिल्लीत राहतात. अशा ठिकाणी देखील अनुवादात रोजगार आहे. महाराष्ट्र व भारतात ऑनलाईन ग्राहकांची संख्या वाढत आहे. भारतीय भाषेतील भाषांतराची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक चित्रपट डबिंग केले जात आहेत. मी ज्या या परिसरात राहतो त्या महाराष्ट्र, तेलंगण व कर्नाटक सीमाभागात बहुभाषिक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. या सर्व बहुभाषिक लोकांची एक मर्यादा आहे. ते चार ते पाच भाषा बोलू शकतात, परंतु त्या भाषेमध्ये वाचू व लिहू शकत नाहीत. परंतु काही लोकांना मात्र वाचता लिहिता येते. अशा लोकांसाठी सीमाभागात देखील विशेषत: अनुवादासाठी काही संधी आहेत.
मराठी भाषा बोलणारे व जाणणारे केवळ भारतातच नाही, तर प्रदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत.ऑस्ट्रेलियाच्या आकाशवाणीवर आठवड्यातून दोन वेळा मराठीत बातम्या दिल्या जातात.बातम्यांचे वस्तुनिष्ठ पद्धतीने वृत्तांकन करणे हे देखील एक कौशल्य आहे. नॅशनल ट्रान्सलेशन मिशनच्यावतीने ग्रंथाचे बावीस भारतीय भाषेत भाषांतर केले जाते. परदेशात अनेक मराठी भाषिकांच्या संस्था कार्यरत आहेत. त्या संस्थेकडून साहित्याशी निगडित विविध उपक्रम महाराष्ट्राच्या साहित्यिकांना बोलवून आयोजित केले जातात.एकंदरीत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी भाषा व साहित्य विस्तारलेले आहे. अशा विविध ठिकाणी रोजगारांच्या पाऊलखुणा शोधता येतात.
मराठी भाषिकांना मनोरंजनाच्या क्षेत्रात अनेक संधी आहेत. फू बाई फू, भाऊचा धक्का, चला हवा येवू द्या, तुमच्यासाठी काय पण यासारखे रंजनात्मक कार्यक्रम आहेत. योगेश शिरसाट, भाऊ कदम,वैभव मांगले,भारत गणेशपुरे, निलेश साबळे, सुप्रिया पाठारे,श्रेया बुगडे, किशोरी अंबिये असे कितीतरी कलावंत आहेत. हे सर्व कलावंत भाषिक नैपुण्यामुळे लोकप्रिय तर झालेच आहेत. आज ते सुद्धा इतरांना या क्षेत्रात रोजगार देऊ शकतात, इतके सामर्थ्य त्यांच्यात आहे. सांगण्याचे तात्पर्य भाषा आणि साहित्य याचा सुरेख संगम अशा मनोरंजनात्मक कार्यक्रमात झालेला असतो. इथे गरज आहे हजरजबाबी व संवाद कौशल्याची. भाषिक कौशल्य असेल तर व्याख्यान, सूत्रसंचालन, कीर्तन व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात मराठी माणसाला मानधन मिळू शकते. कारण विषयाला धरून विषयांतर करणारे विषयावर बोलणारे वक्ते फार कमी झालेले आहेत. एका तासासाठी काही प्रभावी वक्त्यांना, निवेदकाना, कीर्तनकाराना कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये दिले जातात. तरी अशांच्या तारखा मिळत नाहीत. त्यांची सहा सहा महिने एक वर्ष आदी तारीख बुक झालेली असते. यामध्ये काही लोककलावंत देखील आहेत. वक्तृत्व, संगीत आणि गायन या माध्यमातून ते प्रभावी कार्यक्रम देतात.
आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, बाबासाहेब पुरंदरे, नरहर कुरुंदकर, पु.ल.देशपांडे या जुन्या नावाबरोबरच अनेक नवे नावे सांगता येतील वक्तृत्व कलेमुळेच यांनी मराठी माणसाच्या मनावर राज्य केले. अशांना अर्थाजन सोबतच लोकप्रियता देखील तितकीच मिळालेली आहे.असे सांगितले जाते लता मंगेशकरांच्या एका कार्यक्रमाचे निवेदन राम शेवाळकर यांच्याकडे होते.तिथे आलेल्या श्रोत्यापैकी पनास टक्के शेवाळकरांचे निवेदन ऐकण्यासाठी आले होते.निवेदक, सूत्रसंचालक,प्राध्यापक, वकील,कथाकथनकार, प्रवचनकार, कीर्तनकार या क्षेत्रात वक्तृत्व व थोडीसे अभिनय, देहबोली महत्त्वाचे असते. एकंदरीत मंचीय कार्यक्रम जसे आकाशवाणी, चित्रपट,नाटक, अशा माध्यमात भाषा व साहित्याच्या आधारे करिअर उत्तम प्रकारे करता येते.
अलीकडे मुद्रण क्षेत्रात देखील संधी दडलेल्या आहेत. मुद्रित शोधन आणि संपादन कौशल्य संदर्भात अरुण फडके सातत्याने महाराष्ट्रात भ्रमंती करून लोकांचे प्रबोधन केले. आजही अनेक प्रकाशकांचे असे मत आहे की, आम्हाला प्रूफ रीडिंगला माणूस मिळत नाही. प्रकाशन संस्था,ऑफसेट, पोस्टर, पत्रिका,ग्रंथ जिथे काढले जातात अशा ठिकाणी तरुणांना रोजगार शोधता येईल.
सृजनात्मक साहित्य लेखनातही काही प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत.कथा, कादंबरी,एकांकिका, नाटक, चरित्र लेखनास फारसे पैसे मिळत नसले तरी जो काही आनंद मिळतो त्याची तुलना कशाशीही करता येत नाही.रूपांतर कौशल्याला आज अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कलाकृतीला एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजेचं कथा, कादंबरीवर आधारित एकांकिका,नाटक. आकाशवाणीसाठी श्रुतिका,दूरचित्रवाणीसाठी मालिका, चित्रपटसहिता हे रूपांतराची उदाहरणे होत. कवितेवर आधारितही सादरीकरण केले जाते. 'मराठवाड्याचा गळा बहिणाबाईचा मळा' 'गोकुळवाटा, गीतरामायण असे कितीतरी रूपांतराची उदाहरणे देता येतील. तात्पर्य असे की याही क्षेत्रात करिअर करता येते. चरित्रे, शब्दांकन, वैचारिक लेखन दर्जा टिकवून ठेवल्यास इथे सुद्धा रोजगाराच्या संधी नाकारता येत नाहीत. केवळ रोजगारच नव्हे, तर या क्षेत्रातल्या व्यक्तीचे नाव हे अजर, अमर व अक्षर राहते.
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही रोजगार आहेत. जगात ज्या काही भाषा बोलल्या जातात. प्रचलित स्वरूपाच्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषेत मराठी भाषेचा क्रमांक बारा ते तेरा क्रमांकाचा आहे. आज युनिकोड प्रणालीमुळे संगणक ,इंटरनेटवरील मराठीचा वापर सुकर बनला आहे.मराठी साहित्य व भाषा टिकवित बहुभाषिकता विकसित केल्यास करिअरच्या संधी आहेत. असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कोरोना काळामध्ये तर ज्यांना तंत्रज्ञानाचे ज्ञान होते त्यांना मोठ्या प्रमाणात या माध्यमातून विविध कार्यक्रमासाठी तंत्र सहायक म्हणून मागणी होती. याबरोबरच संकेतस्थळ, डेटाइंट्री व युट्यूब यासारख्या क्षेत्रात करिअरच्या संधी शोधता येतात.
यशस्वी लोकांच्या मुलाखती घेणे, चर्चात्मक व रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्याचे शब्दांकन करणे, हे सुद्धा एक प्रकारचे तंत्र आहे. मराठी भाषा व साहित्याच्या माध्यमातून रोजगार कसा मिळू शकतो? हे मुंबई-पुणे यासारखे काही शहर सोडले तर बाकी ठिकाणी तसे वातावरण असताना आपल्याला दिसत नाही, हेही तितकेच सत्य आहे. एकंदरीत जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व काम करण्याची प्रवृत्ती असेल, तर चांगल्या प्रकारे जीवन जगता येते.
(आज 'मराठी राजभाषा दिन' त्यानिमित्त हा लेख. मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संदर्भात अजून काही पर्याय असतील तर ब्लॉगच्या कमेंट बॉक्समध्ये कळवावे, ही विनंती.)
म.ई.तंगावार
श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर
९८९००६५६८०
metangawar@gmail.com
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
ReplyDeleteचांगला लेख वाचायला मिळाला.छान. अभिनंदन.
Deleteखूप अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.अभिनंदनसर..
ReplyDeleteसंदर्भ पूर्ण लेखन.
खूप सुंदर लेख आहे सर!
ReplyDeleteखूप खूपच प्रेरणादायी लेखन अभिनंदन 🌹🌹
ReplyDeleteअभिनंदन सर.
ReplyDeleteअभिनंदन सर
ReplyDeleteCongratulations Mitra
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteसुरेख मांडणी झाली आहे, माहिती पूर्ण लेख वाचता आला.
ReplyDeleteअभिनंदन सर
धन्यवाद आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा
खुप सुंदर लिहीलय सर धन्यवाद
Deleteछान .उत्कृष्ट मांडणी आणि उपयोगी लेख.अभिनंदन आपले आणि याचं विषयावरिल पुढील लेखनास शुभेच्छा.
Delete