बिकट वाट वहिवाट नसावी

  कविता आणि व्यक्तिमत्त्व विकास

 बिकट वाट वहिवाट नसावी : अनंत फंदी


         ललित साहित्याचा संबंध व्यक्तिमत्त्व विकासाशी असतो का?असा प्रश्न काही जणांना पडतो. पण काही कलाकृतीच्या बाबतीत त्याचे उत्तर होकारात्मक असेच द्यावे लागेल. एखाद्या कवितेचा विचार व्यक्तिमत्त्व विकासाच्या अंगाने करता येऊ शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणून अनंत फंदी यांच्या 'बिकट वाट वहिवाट नसावी' या कवितेचे देता येईल. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचा व्यक्तिमत्त्व विकास झाला नसेल तर स्वतःचा विकास होणे इतके सोपे नसते. म्हणून मला वाटते की, व्यक्तिमत्त्व विकासाचा संबंध हा सामाजिक बांधिलकीशी देखील आहे. उगीच म्हटले नाही संतांनी 'बुडती हे जण न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनीया' अनंत फंदी यांनी प्रस्तुत कवितेतून उपदेशात्मक पद्धतीने अगदी सोप्या भाषेत व्यक्तिमत्त्व विकासाचा सुलभ असा मार्ग सांगितलेला आहे.

        शाहीर अनंत भवानीबाबा घोलप हे अठराव्या शतकातील एक महत्त्वाचे कवी होते. यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर. सराफी व गोंधळीपण हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय असल्याचे सांगितले जाते. पेशव्यांच्या काळात शाहिरी वांग्मयला बहर आलेला होता. कवी मोठ्या प्रमाणात लावणी व पोवाडे लिहीत होते. जागोजागी तमाशाचे फड रंगत होते. यांच्या प्रभावामुळे अनंत फंदी तमाशाकडे वळले. या व्यवसायात मलक फ़ंदी नावाच्या व्यक्तीशी त्यांची मैत्री झाली. हा कलावंत अनेक वर्ष अनंत फंदी यांचा साथीदार होता. मैत्रीच्या या अतूट प्रेमामुळे पुढे अनंत घोलप यांनी आपल्या नावापुढे फ़ंदीचे नाव जोडले. असे उदाहरण फारसे पाहायला मिळत नाहीत. अनंत फंदी यांनी पोवाडे, लावणी, कटाव व फटके या रचना प्रकारात लेखन केले. 'फटका' हा काव्यप्रकार तर अनंत फंदी यांच्यामुळेच अस्तित्वात आला. कालांतराने अनंत फंदी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये बदल झाला. असेही म्हटले जाते की, अहिल्याबाई होळकर यांच्या सांगण्यावरून अनंत फंदी कीर्तनाकडे वळले. पुढे 'फटका' या रचना प्रकाराची निर्मिती झाली.

      'फटका' हा एक उपदेशात्मक रचनाप्रकार आहे.या काव्यप्रकाराचे जनक हे अनंत फ़ंदी हेचं आहेत.

खरं पाहिलं तर समाजात अनेक लोक असे आहेत की, त्यांना गांभीर्य राहत नाही.ते वाटेल त्या पद्धतीने जगत असतात.गंभीर गोष्ट कधी कधी प्रेमाने सांगून चालत नाही,तर काही प्रमाणात कठोर भाषेत सांगावे लागते.जीवन उपयोगी तत्त्वज्ञान कठोर भाषेत पटवून देणे,हे फटका या रचनाप्रकाराचे प्रयोजन आहे.

               'बिकट वाट वहिवाट नसावी' या कवितेत अनंत फंदी म्हणतात की,

            बिकट वाट वहिवाट नसावी 

              धोपट मार्गा सोडू नको 

              संसारामधि ऐस आपला

              उगाच भटकत फिरू नको

       जीवन सरळ व  राजमार्गाने जगता आले पाहिजे. जगणं सुंदर करता आले पाहिजे, पण आपण ते करीत नाही. जीवनातला,संसारातला रस्ता हा वेडंवाकडं असता कामा नये.जगणं, बोलणं, वागणं, व्यवहार सर्व गोष्टी अवघड व त्रासदायक असू नये. म्हणजेच वाम मार्गाने जाऊ नका सरळ मार्ग सोडू नका असे कवीला या फटक्यातून सांगावयाचे आहे. संतांनी म्हटले आहे की, 'संसार करावा नेटका परमार्थ साधेल विवेका' संसार करताना कुठेतरी माणुसकी जपली पाहिजे. संसाराच्या हव्यासापोटी आज काही माणसं नीतिमूल्ये पायदळी तुडवून वाटेल त्या मार्गाने जात आहेत. इतरांच्या पोटावर पाय देऊन पुढे गेल्यास त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत नाही किंवा त्याला व्यक्तिमत्त्व विकास म्हणता येत नाही. संसारात भटकत असताना अनेकदा आपलं जगणंच राहून जातं. कवी बा.भ. बोरकर यांनी म्हटले आहे की, 'अमृतघट भरले तुझ्या द्वारी का वणवण फिरशी बाजारी' आपल्याला आनंद देणारी माणसं, वस्तू व प्राणी आपल्या जवळच आहेत. मात्र आपण विसरलो आहोत. त्यामुळे आपलं व्यक्तिमत्त्व विकास झाला असला तरी अंतरंगात मात्र झालेला नाही. व्यक्तिमत्त्व विकासाचा संबंध हे बाहेरून कमी व आतून जास्त असतो. हे कुठेतरी लक्षात घ्यायला हवे. खोटे बोलणे, विणाकारण रागावणे तसेच नास्तिक नसतानाही  तसा मुखवटा धारण करणाऱ्या लोकांपासून सावध राहायला हवे. बोलायचे असेल तर स्पष्ट व रोखठोक बोला. त्याबरोबरच नम्रता सदा जपून ठेवा असा उपदेश कवीने कवितेतून केलेले आहे.

            अनंत फंदी म्हणतात की, 'आल्या अतिथी मूठभर  द्याया मागे पुढती पाहू नको' 'अतिथी देवो भव' ही भारतीय संस्कृती आहे. घरी आलेला माणूस रिकामा जाता कामा नये. घरासमोर येणाऱ्या माणसाला कवीने भिकारी म्हटले नाही. भीक आणि भिक्षा यात फरक आहे. भिक्षा मागणारा हा उपदेश करीत असतो.संत गाडगे महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. संत गाडगेबाबा कीर्तनासाठी एका गावात गेले. कीर्तन रात्री होतं. सायंकाळी औषध घेण्यासाठी त्यांना दुधाची गरज होती. एका घरासमोर जाऊन ते प्रथम झाडून घेतात. नंतर ते घरातल्या स्त्रीला आवाज देतात. ये माय मला चमचाभर गाईचं दूध देती का? स्त्री घरातून बाहेर आली रागात ती म्हणाली, की दूध वगैरे काही नाही जा इथून निघून. त्या माऊलीला माहीत नव्हतं की हे संत गाडगे महाराज आहेत म्हणून, परंतु ती घाई करीत होती की रात्री आपल्याला गाडगे महाराजांचे कीर्तन ऐकायचे आहे.किर्तनाला गेल्यानंतर त्या स्त्रीला पश्चाताप होतो. हेच माझ्या दारासमोर आले होते. घरात असतानाही त्यांना मी दुध दिलो नाही. त्यांनी तर चमचाभर दुध मागितला होता एवढेच नाही त्याचा मोबदला म्हणून त्यांनी माझ्या घरासमोरचं अंगण,जागा झाडून काढलं होतं. तात्पर्य असे की, याचकाना दान करा, असे कवीला सांगायचे आहे. जेव्हा आपण इतरांना मानसिक, आर्थिक व वैचारिक स्वरूपात मदत करतो, तेव्हा ती माणसे आपली कदर करीत असतात. त्यातूनच व्यक्तिमत्त्व विकासाला बहर येतो. पुढे ते म्हणतात की,

                 मायबापावर रुसू नको

                  दुर्मुखलेला असू नको

                 व्यवहारामधि फसू नको 

                कधी रिकामा बसू नको

                परी उलाढाली भलभलत्या 

                   पोटासाठी करू नको 

     जगात रडकी माणसं फार आहेत.आपण नेहमीच माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणतो. दुर्मुखलेला म्हणजे एकलकोंडा, मनमोकळा नसलेला. माणसांनी सदैव दुःखी असता कामा नये. व्यवहारात अनेकदा आपण कोणाचे तरी सावज होतो.म्हणजेच शिकारी होतो. ज्याप्रमाणे बगळा माशाला पकडण्यासाठी शांत बसून राहतो. त्याप्रमाणे पावलोपावली माणसं बसून आहेत ते कधी आपल्यावरच झडप टाकतात, हे कळणार देखील नाही. ज्यांना माणसं - व्यवहार कळतो,त्याचा नक्कीच व्यक्तिमत्वाचा विकास होतो. कवी म्हणतात की, माणसाने  रिकामा बसू नये. ग्रामीण भागात असे म्हटले जाते की, 'रिकामा माणूस गावला उपदर' रिकाम्या माणसाच्या डोक्यात नकारात्मक विचार अधिक येतात. व्यक्तिमत्त्व विकासाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माणूस सतत क्रियाशील असायला हवा. याचा अर्थ असा नाही की आपण काहीही उलाढाल्या करावं.  जीवनातं आवडीनं, निष्ठेने एखादं काम न करता आपण वरवर करतो. त्यामुळे आपली वाटचाल परिपूर्णतेकडे होत नाही. मन व ज्ञानाचा विकास हाच व्यक्तिमत्त्व विकास होय. यासाठी जीवनात प्रामाणिकता हे मूल्ये टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

            अनंत फंदी म्हणतात की, कोणाच्याही वर्मावर,कमतरतेवर बोट ठेवू नका. कोणताही माणूस हा परिपूर्ण राहत नाही. त्यामुळे माणसाने स्वतःला पहिल्यांदा तपासले पाहिजे.आपण दुसऱ्याला तपासतो. दुसऱ्यासाठी जर आपण गार खोदलो तर त्या गारीत कधी कधी आपण किंवा आपल्या जवळचेच पडू शकतात. कोणाला टाकून न बोलता 'मी कोण आहे' व 'मी काय करीत आहे' याचा विचार करणे गरजेचे आहे. तरच आपली वाटचाल ही व्यक्तिमत्त्व विकासाकडे होऊ शकते.

          मी मोठा शहाणा धन्याढही

            गर्वभार हा वाहू  नको 

           एकाहूनि चढ एक जगामधि

             थोरपणाला मिरवू नको

       हिमायतीच्या बळे गरीबगुरीबाला 

                तू गुरकावू नको

          दो दिवसांची जाइल सत्ता 

              अपयश माथा घेवू नको

        जगात अनेक माणसं खूप थोर आहेत. काही माणसं मंडूक वृत्तीचे असतात. विहिरीतल्या बेडकाला गर्व असतो की, मी मोठया ठिकाणी राहतो. त्याला बाहेरचं विश्वचं माहीत नसत. बाहेर नदी,तलाव, समुद्र आहे त्याचा विस्तार खूप मोठा आहे, याची जाणीव त्याला नसते. तसे काही माणसाच्या बाबतीत होत असते. ज्ञानाचा व धनाचा अहंकार वाढला की, व्यक्तिमत्त्व विकास खुंटला समजायचा. माणसाचे पाय सदैव जमिनीवर असले पाहिजेत. शक्तीच्या - पैशाच्या जोरावर इतरांना तुच्छ मानू नये.संतांनी एका गौळणीत म्हटले आहे की, 'दोन दिवसाची दौलत ग राधे जाऊ नको अशी रागात ग राधे' जीवन आणि एखादं पद हे कायम टिकून राहणार नाही. काही माणसांना पद, प्रतिष्ठा, मानसन्मान व प्रसिद्धीचा हव्यास असतो. ते नाही मिळाले की ते नाराज होत असतात. खरं तर प्रसिद्धी ही सावली सारखी असायला हवी.आपण पुढे जाताना आपल्या सावलीला बोलवायची गरज असते का?  अनंत फ़ंदी यांनी म्हटल्याप्रमाणे नुसती उठाठेव करीत कर्जबाजारी होऊ नको. पण ते असेही म्हणतात, 'स्नेहासाठी पदरमोड कर' जीवलग असेल तर कुठल्याही परिस्थितीला त्याला मदत करायला हवी. व्यक्तिमत्त्व विकासाचा संबंध खरं तर आपण माणूसकिशी , संस्काराची जोडले पाहिजे. वरवरचा झगमगाट व भौतिक सुविधा उपलब्ध झाल्या म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास झाला असे नाही.

   अनंत फंदी  यांनी म्हटल्याप्रमाणे  विनाकारण  पैजेचा विडा उचलता कामा नये.शर्यत ही स्वतःशीच लावली पाहिजे. माझ्यात मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी काय बदल झाला हे पहायला हवे.कुणाला कमी लेखू नये.प्रत्येकात कुठला तरी एक चांगला गुण दडलेला असतो.त्याची कदर केली पाहिजे.परंतु समाजात असे होत असताना दिसत नाही.

           

              उगीचं निंदा स्तुती कुणाची            

            स्वहितासाठी करू नको 

             बरी खुशामत शहाण्याची परी

                मूर्खाची ती मैत्री नको 

             कष्टाची बरी भाजिभाकरी

              तूपसाखरे चोरू नको 

         संतांनी 'निंदकाचे घर असावे शेजारी' असे म्हटले आहे. याचा अर्थ आपण सतत निंदा करावी असे नाही.निंदकामुळे आपण जागे होतो. उणिवेकडे लक्ष देतो.पण कारण नसताना निंदा करणे गुणवत्ता नसताना स्वहितासाठी स्तुती करणे, हे कधीही घातकच आहे. एखाद्यावेळेस सज्जनाविषयी आपुलकी ठेवून त्याची महती सांगावी, पण मूर्ख माणसापासून अंतर ठेवूनच रहावे. असे म्हटले जाते की, 'सज्जन से सज्जन मिले तो करते दो बात गदे से गदे मिले तो खाते दो बात' स्वार्थासाठी निंदा, स्तुती करणारे लवकरच उघडे पडतात. 

       श्रमसंस्कृतीच माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासाला हितकारक आहे.श्रम न करता व्यक्तिमत्त्व विकासाचे स्वप्न पाहणे म्हणजे रेड्यापासून दुधाची अपेक्षा करण्यासारखे होईल. माणसाला जगायला फार पैसे लागत नाहीत. धनसंचय झाला असेल, तर त्यातील काही भाग सत्कार्यासाठी खर्च करायला हवा. या कवितेच्या शेवटी अनंत फंदी असे म्हणतात,

              सुविचारा कातरू नको

              सत्संगत अंतरू नको 

              द्वैताला अनुसरू नको 

             हरिभजना विसरू नको 

          सतकीर्ती नौबदिचाचा डंका

              गाजे मग शंकाच नको 

सकारात्मक व निस्वार्थपणे केलेला विचार हा व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक असतो. सत्संग म्हणजे चांगले लोकहिताचे कार्य यातही आपला वाटा असला पाहिजे.  द्वैतपेक्षा अद्वैत महत्त्वाचा आहे. वारकरी संप्रदाय हा अद्वैतवादी आहे. एखाद्याच्या दुःखात, संकटात समरस होऊन शक्य झाल्यास मदत करणे, ही अद्वैताचीचं भावना होय. श्रम करत नामस्मरण करता येते. संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणे 'नाम संकीर्तन साधन पै सोपे…' याचा वस्तुपाठ गिरवायला हवा. याप्रमाणे जर आपण वागण्याचा प्रयत्न केला, तर आपला विकास होईल. तेव्हाच माणूस अजर,अमर व अक्षर राहील.

         एकंदरीत अनंत फंदी यांच्या कवितेतील आशय कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग नक्कीच सुकर होईल. प्रामाणिकपणा, सरळमार्ग, मानवी मूल्य, श्रमसंस्कृती, सदाचार, सावधानता बाळगायला हवी. चांगला विचार, आई-वडिलांची सेवा हीच यशाची गुरुकिल्ली आहे. मोठेपणा मिरविणे, अहंकार बाळगणे, कर्जबाजारी होणे, शर्यत लावणे, निंदा करणे यामुळे माणूस ऱ्हासाकडे जातो. ही कविता म्हणजे व्यवहारज्ञान व व्यक्तिमत्त्व विकासाचे उत्तम उदाहरण आहे.जागोजागी कवीने अंत्य यमक साधलेला आहे. प्रासादिकता व उपदेशात्मकता हे या कवितेचे महत्त्वाचे बलस्थान आहे

 ( द्वितीय भाषा मराठी, प्रथम वर्ष, सत्र पहिले,

२०२०-२१,पद्य विभाग, कविता क्र. ०२,

 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड)


                              म.ई.तंगावार

                                    मराठी विभाग 

                      श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर 

                                    जि.लातूर

                                ९८९००६५६९०

                        metangawar@gmail.com

Comments

  1. Bedre Someshwar Digambar
    B. Com(F.Y)

    ReplyDelete
  2. Patil sakshta mallikarjun.( B.a.fy)

    ReplyDelete
  3. Shinde jogeshwari Tanaji
    B.com fy

    ReplyDelete
  4. Gaikwad shrikrushna balaji
    B. A. F. Y
    छान प्रकारे विश्लेषण केलात

    ReplyDelete
  5. Sangmeshwar Dawane
    B. A. F. Y
    छान प्रकारे विश्लेषण केलात गुरुजी

    ReplyDelete
  6. B.A.F.Y
    छान प्रकारे विश्र्लेशन केलात सिर

    ReplyDelete
    Replies
    1. Shailesh koli
      B.A.F.Y
      छान प्रकारे विश्लेशन केलात सर

      Delete
  7. Patil prathmesh
    Bcom FY
    Khup sudar ahe sir

    ReplyDelete
  8. Chole Aarti Rajkumar
    B.Com.F.Y.
    Lekh Vachla

    ReplyDelete
  9. Kaloji Priti sanjay
    B.A.F.Y
    Khup chan lekh ahe sir samajnya sarkh 🙏🙏

    ReplyDelete
  10. Wadikar nikita
    B.A.F.Y khup chan lekh ahe sir

    ReplyDelete
  11. AniketJadhav Bsc fy khup chan ahe lekh

    ReplyDelete
  12. सर हा लेख खूप चांगल्याप्रकारे तुम्ही लिहिला आहे. या लेखामुळे बिकट वाट हा पाठ खूप चांगल्याप्रकारे समजला.

    ReplyDelete
  13. हा लेख मुळतः First Year च्या विद्यार्थ्यांसाठी खुप महत्वाचा आहे . आणि हा लेख तुम्ही एकदम व्यवस्थित समजवुन सांगितला आहेत.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज