भारताच्या राजधानीतील मराठी साहित्यिक
भारताच्या राजधानीतील मराठी साहित्यिक
मराठीतील प्रसिद्ध कवी व गीतकार राजा बढे यांनी ‘दिल्लीचेही तक्त राखितो, महाराष्ट्र माझा’ असे म्हटले आहे. उद्योग, राजकारण व सांस्कृतिक क्षेत्रात अनेकांनी दिल्लीत आपले वर्चस्व निर्माण केले. सतराव्या - अठराव्या शतकात मराठी सैनिकांनी देखील दिल्लीत पराक्रम गाजवला. साहित्याच्या बाबतीत दिल्लीतही दारिद्रय नाही. हे दिल्लीतील साहित्यिकांचा परिचय करून घेतल्यानंतर लक्षात येते. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व सरहद पुणे यांच्यावतीने आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी माणूस व संस्कृती याचा परिचय संपूर्ण जगाला होईल; हे सत्य नाकारता येत नाही. राजधानीत ४० ते ५० वर्षापासून स्थायिक असलेले काही लेखक मराठी साहित्य व संस्कृतीची सेवा करताना दिसतात. अगदी एकविसाव्या शतकातील काहीजण मराठीत समर्थपणे लेखन करीत आहेत. त्यांच्या लेखनकार्याचा धांडोळा घ्यावा, हे या लेखामागचे प्रयोजन आहे.
प्रस्तुत लेखाच्या सुरुवातीला मिरजकर कुटुंबाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. आदरणीय प्रा. निशिकांत मिरजकर यांनी दिल्ली विद्यापीठात तुलनात्मक भारतीय साहित्य आणि मराठी साहित्याचे ३० वर्षे अध्यापन केले. विद्यापीठ अनुदान आयोग, लोकसेवा आयोग, ज्ञानपीठ पुरस्कार व केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड यासारख्या अतिशय महत्त्वाच्या संस्थेवर मिरजकर यांनी सल्लागार म्हणून काम केले. विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक प्रशासकीय पदावर मिरजकर कार्यरत होते. संत साहित्य, भारतीय साहित्य आणि तुलनात्मक साहित्य अशा विविध विषयावर त्यांची २० ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यापैकी अकरा ग्रंथ मराठीत लिहिलेली आहेत. तसेच हिंदी व इंग्रजी भाषेतही त्यांचे लेखन आहे. संत नामदेव व तुलनात्मक साहित्यावर महाराष्ट्रातील विविध चर्चासत्रात त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केलेली आहे.
निशिकांत मिरजकर यांचे श्री नामदेव दर्शन, श्री नामदेव : चरित्र काव्य आणि कार्य, नामदेवांची अभंगवाणी, नव्या वाटा नवी वळणे, साहित्य : रंग आणि अंतरंग असे महत्त्वाचे ग्रंथ प्रकाशित आहेत. संत नामदेव हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. कारण संत नामदेव हे मराठीतील पहिले कीर्तनकार, प्रवचनकार, पद्यात्मक आत्मकथन व चरित्र लिहिणारे तसेच शिष्याची समाधी बांधणारे मराठीतील पहिले संत. वारकरी संप्रदायाचा भारतात प्रचार आणि प्रसार करणारे पहिले राष्ट्रीय संत होते. अभंग हा रचनाप्रकार यादवकाळात संत नामदेवांनी समृद्ध केलेला आहे. वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीत संत नामदेवांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. या दृष्टिकोनातून प्रा.मिरजकर यांचे चिंतन लक्षात घेण्यासारखे आहे. निशिकांत मिरजकर यांची पत्नी प्रा.ललिता मिरजकर या देखील नामांकित अशा दिल्ली विद्यापीठातील आधुनिक भारतीय भाषा आणि साहित्य या विभागात मराठी आणि तैलानिक साहित्याच्या प्राध्यापक होत्या. यांनी श्रीधरांची कथाकाव्य, मला काय त्याचे, समग्र सावरकर इत्यादी ग्रंथाचे लेखन व संपादन केले आहे.
दिल्लीतील अतिशय महत्त्वाच्या लेखिका व समीक्षक म्हणजे अर्चना मिरजकर या होत. यांचे पूर्ण शिक्षण दिल्लीत इंग्रजी माध्यमात झालेले असले तरी मराठी माणूस, भाषा, साहित्य व संस्कृती याविषयीची कृतज्ञता आपल्या लेखन व वाणीच्या माध्यमातून सतत त्या व्यक्त करतात. अर्चना मिरजकर या कॅनडाच्या दुतावासात वरिष्ठ माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणून मागच्या अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिकन व ब्रिटिश दूतावासासाठी काम केलेले आहे. राजदूतांची भाषणे लिहिणे, भारत व विदेश संबंध या संदर्भात भारतीय प्रसार माध्यमाला माहिती देणे हे काम त्या करतात. टाइम्स ऑफ इंडिया व द हिंदू यासारख्या प्रतिष्ठित दैनिकात त्यांनी काम केले आहे. आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की, प्रशासकीय क्षेत्रात कामाचा व्याप खूप असतो. यातून साहित्यासाठी वेळ काढणे, हे म्हणावे तितके सोपे नसते. परंतु घरात असलेला मराठी संस्कृतीचा समृद्ध वारसा व अर्चना मिरजकर यांची जिद्द, तळमळ, साहित्यावर असलेली निष्ठा यामुळे हे सर्व शक्य झाले आहे.
अर्चना मिरजकर यांची नऊ ते दहा ग्रंथ प्रकाशित आहेत. स्वयंसिद्ध, ग्रंथयात्रा, नदीकाठी, वाळवंटी, शकुंतला, मातीची माणसे इत्यादी. कथा, नाटक आणि दीर्घकथा त्यांनी लिहिल्या असून हॅलो कोण? हे त्यांचे नाटक ई-साहित्याच्या वेबसाईटवर प्रकाशित आहे. स्वयंसिध्दा हा ग्रंथ महाभारतातील स्त्रियांवर आधारित असून यात प्रेरणादायी अशा कथा आहेत. सदरील ग्रंथाविषयी अर्चना मिरजकर यांचे वडील प्रा.निशिकांत मिरजकर लिहितात, “अत्यंत प्रभावी व्यक्तीचित्रण, नाट्यात्मक प्रसंग लेखन आणि सुंदर निसर्गचित्रे यामुळे या कथा वाचनीय बनले आहेत. अर्चना मिरजकर यांची भाषा इतकी ओघवती आहे की, एखादी कथा वाचायला घेतली की ती पूर्ण वाचल्याशिवाय राहवत नाही. त्यामुळे हे पुस्तक अत्यंत रंजक आणि चोखंदळ वाचकांनी आपल्या संग्रही ठेवण्यासारखे आहे.”
अर्चना मिरजकर या यूट्यूब चैनलवर ग्रंथयात्रा ही मालिका चालवतात. जवळपास १०० पेक्षा अधिक मराठी ग्रंथांचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. हे सर्व व्हिडिओ मराठी भाषेबरोबरच इंग्रजीतही आहेत. प्रत्येक मराठी ग्रंथांचा परिचय दोन भाषेत करून देणे, हा भारतातील पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल. परंतु त्यासाठी दोन्ही भाषेवर प्रभुत्व असावे लागते. मराठी कलाकृतीचा परिचय विदेशातील लोकांना व्हावा म्हणून त्यांनी इंग्रजीत ग्रंथांचा परिचय करून दिला. मराठीतील १०२ पुस्तकावर मराठीत १०२ व इंग्रजीत १०२ असे एकूण २०४ व्हिडिओ त्यांनी तयार केलेले आहेत. यात संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंतच्या सर्व अजरामर ग्रंथांचा समावेश आहे. एखाद्या ग्रंथाचा परिचय वस्तूनिष्ठपणे कसा करून द्यावा, याचे एक उत्तम उदाहरण म्हणून ग्रंथयात्रा या मालिकेकडे पाहता येईल. इतक्या मोठ्या पदावर कार्यरत असतानाही अर्चना मिरजकर यांचे पाय जमिनीवर आहेत. याला निश्चितच मराठी संत व संस्कृती कारणीभूत असावी. ‘मातीसाठी रे लढावं. मातीसाठी रे मरावं. बेटा माती लई थोर. त्याला कसं ईसराव’ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या या ओळीची प्रचिती मिरजकर कुटुंबाच्या बाबतीत येतो. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीविषयीचा सार्थ अभिमान अर्चना मिरजकर या कृतीच्या माध्यमातून सतत व्यक्त करतात.
आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी माणसाला परिचित असलेले अतिशय महत्त्वाचे लेखक म्हणजे डॉ.ज्ञानेश्वर मुळे हे होत. आंतरराष्ट्रीय मराठी मंचच्या माध्यमातून मराठी भाषा व साहित्य विश्वात सगळीकडे कशा पद्धतीने पोहोचता येईल? याचा प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. मराठी माध्यमात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी (आय.एफ.एस.) म्हणून त्यांनी उत्तमपणे कार्य केले. ते विदेश मंत्रालयात सचिव देखील होते. रशियातील मास्को व जपानच्या दुतावासात प्रथम सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले. एक वैचारिक अभ्यासक, समीक्षक, कवी व आत्मकथाकार म्हणून ज्ञानेश्वर मुळे यांचे मराठीतील योगदान कोणालाही नाकारता येत नाही.
ज्ञानेश्वर मुळे यांचा माती पंख आणि आकाश हे आत्मकथन सर्व वाचकापर्यंत पोहोचले. विदेशातील कार्य व प्रवास हे या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. अगदी ग्रामीण भागातील मातीत त्यांची जडणघडण झाली. असे हे लेखक आपल्या प्रयत्नाच्या बळावर आकाशाला गवसणी घालतात. माणूस आणि मुक्काम, ग्यानबाची मेक व नोकरशाहीचे रंग हे त्यांचे मराठीतील लेख संग्रह प्रकाशित आहेत. दूर राहिला गाव, रस्ताच वेगळा धरला, स्वतःतील अवकाश इत्यादी कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. साप्ताहिक साधना याबरोबरच मराठीतील अनेक दैनिकातून त्यांचे असंख्य लेख प्रकाशित झालेले आहेत. आरती प्रभू यांच्या कविता समजून घेणे तितके सोपं नाही, परंतु नक्षत्राचे देणे या कवितासंग्रहावरील साधनांमध्ये प्रकाशित झालेला त्यांचा लेख चिंतनाचा प्रत्यय आणून देतो. ज्ञानेश्वर मुळे यांनी विलोभ या ग्रंथाचे संपादन केले. यात मराठीतील कविता त्यांनी संग्रहित केले आहेत. विशेष करून या ग्रंथातील कवी व कवयित्री या दिल्लीत स्थायिक असलेले आहेत. ज्ञानेश्वर मुळे यांनी कामाचा व्याप स्वतःहून वाढवून घेतलेला आहे. मराठी, माणूस, भाषा व साहित्य सातासमुद्रापार गेले पाहिजे. यातच ते खरा आनंद शोधताना दिसतात. आपल्या कामाचा आवाका ते बोलण्यातून वागण्यातून कुठेही जाणवू देत नाहीत. ते एक शांत, संयमी व संवेदनशील असे हे सृर्जनात्मक लेखक आहेत.
राजधानीतील मराठी साहित्यात हेमा देवरे व काही प्रमाणात सुधीर देवरे यांचे लेखन तितकेच महत्त्वाचे आहे. हेमा देवरे यांनी विश्वविदेश सेवेचे, राजनीतिच्या हिंदोळ्यावर आणि वितळलेले ढग हे तीन महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. सुधीर देवरे हे प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. काही काळ विदेश मंत्रालयात सचिव पदावर तर इंडोनेशियात भारताचे राजदूत म्हणूनही त्यांनी काम पाहिले. अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठाने त्यांना शिष्यवृत्ती देउन आमंत्रित केले होते. जर्मनी, साऊथ कोरिया, ब्रह्मदेश, वाशिंग्टन, मास्को आणि युक्रेन इत्यादी अनेक देशात सुधीर देवरे प्रशासकीय सेवेत कार्यरत होते. त्यामुळे हेमा देवरे यांनी विदेशात विविध क्षेत्रातील अनुभव घेतलेला होता. त्यांचे सूक्ष्म निरीक्षण होते. त्यातून या ग्रंथाची निर्मिती झाली. या संपूर्ण अनुभवावर आधारित विश्वविदेश सेवेचे हा ग्रंथ वाचकांना नवीन माहिती देऊन जातो. सुधीर देवरे यांचे देखील राजकीय, सामाजिक व आर्थिक विषयावर लेख प्रकाशित आहेत.
दैनिक सकाळचे सल्लागार संपादक, ब्लॉगर व पत्रकार विजय नाईक हे मागच्या ५५ वर्षापासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. विजय नाईक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत. दक्षिण आफ्रिका व अमेरिका या देशात भ्रमंती करून त्यांनी लेखन केले. इ.स. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात युद्धवार्ताहर म्हणून, श्रीलंकेतील तमिळ वाघ व कारगिल आदी युद्धात त्यांनी निर्भीडपणे वार्तांकन केले. पंतप्रधान व राष्ट्रपतीसह इतर वेगवेगळ्या निमित्ताने ५२ देशात प्रवास करून वार्तांकंनाचे काम विजय नाईक यांनी अतिशय प्रामाणिक, निर्भीडपणे व निष्ठेने केले. त्यामुळे दिल्ली दरबारी मराठी पत्रकारात यांना विशेष स्थान आहे. मंडेलाच्या देशात, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, शिष्टाईचे इंद्रधनु, हवा-हवाई , शी जिनपिंग, साऊथ ब्लॉक नवी दिल्ली इत्यादी वैचारिक ग्रंथाबरोबरच त्रिकोण कादंबरी त्यांची प्रकाशित आहे. नैना ही या कादंबरीतील नाईका असून तिच्या संघर्षावर लेखकाने प्रभावीपणे कादंबरीच्या माध्यमातून प्रकाश टाकले. एकंदरीत राजकारणातील स्पर्धा व अंतर्गत हेवेदावे, राष्ट्रवाद, राजकीय धोरण व अंमलबजावणी इत्यादी असंख्य अशा प्रासंगिक विषयावर अभ्यासपूर्णपणे व संशोधनात्मक पातळीवर विजय नाईक यांनी लेखणी चालविली.
दिल्लीतील सांस्कृतिक चळवळीत ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, त्या म्हणजे निवेदिता मदाने - वैशंपायन. या माध्यम समन्वयक, अनुवादक आणि मुक्त पत्रकार आहेत. बालसाहित्यातील दोन पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. त्यांची बालसाहित्याची पाच द्विभाषिक पुस्तके प्रकाशित आहेत. बृहन्महाराष्ट्राच्या आमची दिल्ली, दिल्ली मराठी प्रतिष्ठान व सार्वजनिक उत्सव अशा वेगवेगळ्या समितीत त्यांचा आत्मीयतेने पुढाकार राहत असतो. महाराष्ट्रातील विविध दैनिकातून मराठी माणूस व संस्कृती याविषयी त्यांनी सातत्याने लेखन केले. दिल्ली डायरी या सदरात ते प्रासंगिक लेखन करतात. मराठी जगत नावाचा त्यांचा सदर दैनिक लोकसत्तामध्ये चालू होता. दिल्लीमध्ये मराठी भाषा व संस्कृती संदर्भात जे काही कार्यक्रम होतात ते रंगमंचावरील नाटक, मराठी चित्रपट, मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अशा अनेक कार्यक्रमांच्या बातम्या ते अतिशय तळमळीने देत असतात. मराठी साहित्यिकांच्या अनेक मुलाखती त्यांनी घेतलेले आहेत. एकंदरीत मराठी साहित्य व संस्कृतीविषयी त्यांचं नातं अतिशय घट्ट आहे. हे दिल्लीत राहूनही त्यांनी कमी होऊ दिलं नाही. आपल्या भाषेची अस्मिता आपणच जपली पाहिजे. ही त्यांची धडपड जागोजागी लक्षात येते. मराठी संस्कृतीशी एकजीव होणाऱ्या वैशंपायन यांनी विविध पातळीवर अतिशय कौतुकास्पद कार्य करीत आहेत.
दिल्लीत मराठी माणूस व साहित्यिकांना विविध उपक्रमाच्या माध्यमाने बांधून ठेवण्याचं काम जीवन तळेगावकर सातत्याने करतात. तळेगावकर दूरसंचार व्यवस्थापन क्षेत्रात गुरुग्राम येथे कार्यरत आहेत. जागतिकीकरणाच्या प्रतीक्षेत मराठी हा कवितासंग्रह आणि साठवणीतील महात्मा हा वैचारिक ग्रंथ त्यांचा प्रकाशित आहे. ते नॅशनल बुक ट्रस्टचे लेखक व अनुवादक आहेत. अक्षरनामा वेबपोर्टलवर तसेच दैनिक सकाळ मधून अनेक ग्रंथाचा परिचय त्यांनी करून दिलेला आहे. दिल्लीत जोश प्रकाशन संस्था ते चालवतात. सार्वजनिक गणेशोत्सव समिती गुरुग्रामचे ते विद्यमान अध्यक्ष आहेत. मराठी भाषिकांना प्रेरणा व ऊर्जा मिळावी या नि:स्वार्थ भावनेने जीवन तळेगावकर राजधानीत काम करीत आहेत.
नयना सहस्त्रबुध्दे या सुद्धा दिल्लीतील एक महत्त्वाच्या लेखिका आहेत. त्यांचा स्त्रीभान हा ग्रंथ्र इ.स. २०२० मध्ये प्रकाशित झाला. या ग्रंथाला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. हा ग्रंथ ललित प्रकारात येतो. भारतीय स्त्री शक्ती व स्त्रीवाद या अनुषंगाने त्यांचे लेखन आहे. ब्लॉग लेखन, वैचारिक लेखन याबरोबर काही ग्रंथाचे संपादन देखील त्यांनी केले आहे. सुचेता अभ्यंकर या सुद्धा एक महत्त्वाच्या कवयित्री आहेत. उत्तम गायिका, खट्टा मिठा हा ब्लॉग चालविणाऱ्या लेखिका म्हणून त्यांचा परिचय आहे. अमलताश आणि अपराजिता हे दोन महत्त्वाचे मराठीतील त्यांचे कवितासंग्रह आहेत.
दिल्लीतील सह्याद्री मराठी सोसायटीमध्ये एक ग्रंथालय सुरू करून समर्थपणे काम करणाऱ्या एक चळवळीतील लेखिका म्हणजे प्रांजली लेले. या दयानंद आर्य या शाळेत ग्रंथपाल आहेत. तसेच सोसायटीतील लहान-लहान मुलांना ग्रंथालयातील ग्रंथ वाचता यावे, त्यांना मराठी साहित्य विषयाची आवड निर्माण व्हावी, यासाठी त्या सतत धडपडत असतात. त्यांच्या या सोसायटीत ४० ते ५० महाराष्ट्रातील लोकांची घरं आहेत. माझे पान शोपीझन, आम्ही साहित्यिक, मराठी कविता समूह व अक्षरधन इत्यादी अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रांजली लेले यांचे साहित्य प्रकाशित आहे. अनेक समीक्षणात्मक लेख व कथा यांच्या विविध डिजिटल माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्रातील सण व उत्सव अतिशय आनंदाने त्या साजरा करीत असतात.
ऋचा मायी जवळपास २५ वर्ष दिल्लीत वकील म्हणून स्थायिक होत्या. ब्लॉगवर जवळपास ६०० पेक्षा अधिक त्यांच्या कथा प्रकाशित आहेत. ५० कविताही त्यांनी लिहिल्या. फेसबुकवरती त्या सातत्याने लेखन करतात. 'ऋचामाई वर्डप्रेस' यावर त्यांचे लेख व लघुकथा वाचता येतील. अल्पाक्षररमणीयता हे त्यांच्या कथेचे बलस्थान आहे.
मा.राजन हर्षे हे देखील अनेक वर्ष दिल्लीत प्रशासकीय, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात कार्यरत होते. देश-विदेशात त्यांनी भ्रमंती केली. ‘पक्षी उन्हाचा साथ विद्यापीठांच्या आवारात’ हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित आहे. विविध विद्यापीठाचे कुलगुरू असताना त्यांना आलेले अनुभव त्यांनी या ग्रंथातून मांडले. मातृभाषा मराठी आणि महाराष्ट्र या विषयावर साधनांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित आहेत. काही वर्षे दिल्लीत साउथ एशियन यूनिवर्सिटीमध्ये ते व्हिजिटिंग प्रोफेसर होते. तिथेच त्यांना संकल्प गुर्जर नावाचा विद्यार्थी लाभला. संकल्प गुर्जर यांनी देखील या विद्यापीठात संशोधनाचे काम करताना असंख्य अभ्यासपूर्ण लेख लिहिले. विविध लेखांचे अनुवाद व मुलाखती त्यांच्या साप्ताहिक साधनांमधून प्रकाशित झालेले आहेत. संकल्प गुर्जर यांची 'हिरवे पान : पत्रे' हा ग्रंथ प्रकाशित आहे. त्यांनी सार्क विद्यापीठातील दिवस या ग्रंथाचे संपादन देखील केले. हा ग्रंथ साधना प्रकाशनाच्या वतीने प्रकाशित झाला. भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान व श्रीलंका या आठ सदस्य राष्ट्रांची विद्यापीठ सार्क म्हणजेच दिल्ली येथे असलेले दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय विद्यापीठ होय. विद्यापीठात आठ देशातील विविध भाषेतील विद्यार्थी शिकण्यासाठी जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समोरील समस्या व त्यातून ते काढत असलेले मार्ग, अनुभव याचे सर्व वर्णन प्रस्तुत ग्रंथात आले आहे.
याशिवाय स्मिता देशमुख यांचा काव्यसरिता हा कवितासंग्रह तितकाच अनमोल आहे. प्रमोद खाडीलकर हे आयआयटी दिल्ली येथे प्राध्यापक असून नाटकाची निर्मिती प्रक्रिया हा त्यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. निलेश कुलकर्णी हे व्यवस्थापन पदवीधर असून त्यांची स्वतःची कंपनी आहे. ते सुद्धा कवी-लेखक आहेत. अंजू कांबळे यांनी देखील विविध विषयावर लेखन केले. डॉ.ज्ञानेश्वर मुळे यांनी विलोभ नावाच्या संपादित कवितासंग्रहात दिल्ली येथील अठरा कवी कवयित्रींच्या कविता प्रकाशित केल्या आहेत. त्यात काही मराठी कवी व कवित्रींचा समावेश आहे. तसेच मराठी साहित्य व संस्कृती याचा विस्तार झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या श्रीमती शशी कुलकर्णी यांची धडपड खरंच अंतर्मुख करणारी आहे.
दिल्ली येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले एकविसाव्या शतकातील अतिशय महत्त्वाचे लेखक, तरुण अभ्यासक म्हणून प्रा.शरद बाविस्कर यांची ख्याती आहे. ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथे फ्रेंच विषयाचे प्राध्यापक असले तरी मराठी भाषेवर त्यांची प्रभुत्व आहे. इ.स. २०२१ साली त्यांचा भुरा हा आत्मकथन प्रकाशित झाला. मराठी समीक्षक व वाचकांनी या आत्मकथनाची विशेष नोंद घेतली. अनेक महत्त्वाचे पुरस्कार या ग्रंथाला मिळाले. दहावीत इंग्रजी विषयात नापास झालेला एक शेतकऱ्याचा मुलगा जिद्द व चिकाटीच्या बळावर फ्रेंच भाषा शिकतो. प्रदेशात जाऊन शिक्षण घेतो व भारतातील अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे काम करतो. हा प्रवास म्हणावा तितका सोपा नाही. शिक्षण, समाज, जीवनातील संघर्ष व आधुनिकता इत्यादी अनेक विषयावर भुरा या आत्मकथनातून लेखकाने सहजपणे भाष्य केले आहे. जानेवारी २०२५ पासून दैनिक लोकसत्तामध्ये प्रा.शरद बाविस्कर पाश्चिमात्य तत्त्वज्ञानावर आधारित मराठीत सदर चालवीत आहेत. वाचन व चिंतनाची सखोलता, खंडण-मंडणात्मकता, आशय व अभिव्यक्ती या दृष्टिकोनातून त्यांचे हे लेख वाचकांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत.
मराठी साहित्य व संस्कृतीच्या जडणघडणीत दिल्लीतील मराठी संस्था ज्यात दिल्ली मराठी प्रतिष्ठान, महाराष्ट्रीय स्नेहसंवर्धक समाज, बृहन्महाराष्ट्र मंडळ, महाराष्ट्र सांस्कृतिक समिती तसेच उपनगरातील गुरुग्राम, नोएडा, फरीदाबाद व गाजियाबाद येथील मराठी संस्थेचा सिंहाचा वाटा आहे. दिल्लीतील मराठी भाषिक आषाढी एकादशीला अंतर लांब असल्यामुळे देहू, आळंदी व पंढरपूर येथे प्रत्येक वर्षी जाऊ शकत नाहीत. म्हणून दिल्ली मराठी प्रतिष्ठानने सांकेतिक वारीला सुरुवात केली. एक दिवस हे सगळे वारकरी, विठ्ठल भक्त एकत्र जमतात. महाराष्ट्रापासून दूर असले तरी वारकरी संप्रदायाशी त्यांचे नाते अतूट आहे. गुढीपाडवा, गणपती उत्सव व दिवाळी पहाट या माध्यमातून मराठीतील भावगीत, अभंग व महाराष्ट्र संस्कृतीचा जागर या प्रतिष्ठानच्यावतीने घातला जात आहे. यात प्रतिष्ठानचे वैभव डांगे यांचा खूप मोठा वाटा आहे. दिल्ली येथील विविध माध्यमांमध्ये काम करणारे महाराष्ट्रातील अनेक पत्रकार आहेत. ज्यांनी वैचारिक स्वरूपाचे लेखन मोठ्या प्रमाणात केले आहे.
दिल्लीत स्थायिक झालेले अनेक लोक भारतातील वेगवेगळ्या राज्यातून आलेले असले तरी ते हिंदी व इंग्रजी भाषेचा वापर ते अधिक करतात. कारण इथे विदेशातील विविध क्षेत्रातील लोक देखील कार्यरत आहेत. विशेष करून हिंदी भाषिक अनेक राज्य दिल्लीच्या सभोवताली असल्यामुळे दैनंदिन व्यवहारात हिंदीचा वापर अधिक केला जातो. अशाही परिस्थितीत मराठी साहित्यिक माय मराठी विषयी आपल्या लेखनाद्वारे सतत ऋण व्यक्त करतात. अजूनही त्यांचे नाते मराठी भाषा व संस्कृतीची घट्ट जोडलेले आहे. हे खरचं कौतुकास्पद म्हणावे लागेल. तीन महिन्यापूर्वी मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे निश्चितच हे संमेलन मराठी भाषिक व दिल्लीतील मराठी माणूस व साहित्यिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे ठरेल.
(दि.२१,२२ आणि २३ फेब्रुवारी, २०२५ रोजी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष मा.खा.शरदचंद्र पवार हे आहेत. या संमेलनाचे औचित्य साधून दिल्लीतील मराठी साहित्यिकावर टाकण्यात आलेला प्रकाश.)
- म.ई.तंगावार
उदगीर जि.लातूर (महाराष्ट्र)
भ्र.९८९००६५६९०
ईमेल : metangawar@gmail.com
अतिशय अभ्यास पूर्ण माहिती, त्यातून तुम्ही घेतलेले परिश्रम दिसून येते. छान संकलन केलं आहे .खूप शुभेच्छा 💐
ReplyDeleteअभिनंदन सर,खुप छान
ReplyDeleteअखेर माय मराठीची सेवा करणाऱ्या दिल्लीकरांना आणि त्यांच्या कार्याला आपल्या या लेखाच्या व लेखणीच्या रूपाने उजाळा मिळाला. या लेखाने खरोखरच दीपस्तंभाची भूमिका बजावली आहे. दिल्लीतील मराठी साहित्य व साहित्यिक यांचा मराठी मायभूमीशी दुवा जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा लेख आहे. 'दिल्लीचेही तक्त राखीतो महाराष्ट्र माझा' याची प्रचिती देणारा असा हा सुंदर लेख.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDelete