वाङ्मयीन नियतकालिकांचे संपादन

 वाङ्मयीन नियतकालिकांचे  संपादन...

          वाङ्मयीन पर्यावरण निर्माण करण्‍यात वाङ्मयीन नियतकालिके महत्‍वाची भूमिका बजावत असतात. वाङ्मयीन नियतकालिकात साहित्‍य समीक्षा ग्रंथ परीक्षणे, आत्‍मकथन व साहित्‍याशी निगडीत लेखन प्रकाशित केले जाते. याबरोबरच समाज व चळवळीला देखील प्रेरणा देण्‍याचे सामर्थ्‍य दर्जेदार वाङ्मयीन नियतकालिकात असते. संपादकाच्‍या ज्ञानाच्‍या  उंचीवर  नियतकालिकांचा  दर्जा  ठरतो. त्‍या त्‍या परिसरात वाङ्मयीन नियतकालिके आज निघत आहेत. पण संपादकाच्‍या स्‍वार्थी दृष्टिकोणामुळे, प्रयत्‍न व निष्‍ठेच्‍या अभावामुळे  ती  नियतकालिके  अल्‍पजीवी ठरत आहेत. संपादकाची दूरदृष्‍टी अतिशय महत्‍वाची असते. संपादकाकडे संयम असणे गरजेचे आहे. कारण वाङ्मयीन नियतकालिकांना तात्‍काळ प्रतिसाद व लोकप्रियता मिळत नाही.

          लेखकाच्‍या लेखनावर संस्‍कार करून समर्पित भावनेने काम करणारे संपादक ज्‍या वाङ्मयीन नियतकालिकांना लाभले, ती वाङ्मयीन नियतकालिके  वाचकांचा  -हदयात  घर करून  आहेत. ललित, अस्मितादर्श, अंतर्नाद,विचारशलाका, कवितारती, भाषा आणि जीवन, पंचधारा  या नियतकालिकांचे संपादक हे काम आजही चोखपणे पार पाडीत आहेत. दर्जा आणि सातत्‍य ठेवल्‍यामुळे अनेक वर्षापासून ही नियतकालिके यशस्‍वीपणे चालू  आहेत. अशा प्रकारे स्‍वातंत्र्यपूर्वकाळातही काही नियतकालिके चालू होती. नियतकालिकाच्‍या रोपटयाने वटवृक्षात रुपांतर व्‍हावे,असे वाटत असेल तर संपादकाला लहान मुलाची जशी काळजी घेतली जाते तशी काळजी घ्‍यावी लागते. बीज तसा वृक्ष तद्वतच संपादक तसे नियतकालिक असे म्‍हटल्‍यास चुकीचे ठरणार नाही.

          वाङ्मयीन, सृजनात्‍मक व वैचारिक मंथनाचे विचारमंच म्‍हणजे वाङ्मयीन नियतकालिके  होत. लिहिणा-या लेखकांचा व वाचक वर्गाचा परीघ वाढविणे  हे आजच्‍या संपादकासमोरील आव्‍हाण  आहे. माहिती तंत्रज्ञानाच्‍या काळातही काही नियतकालिके  हजाराच्‍या संख्‍येने  निघतात. हे त्‍या संपादकाचे यशच म्‍हणावे लागेल. तसे तर नियतकालिकांच्‍या जडणघडणीत मुद्रितशोधक, चित्रकार,सहाय्यक , कार्यकारी संपादक, वितरक व वाचक इत्‍यादींचे  योगदान  असते. पण महत्‍वाचा रोल संपादकाचाच असतो.

          सामाजिक बांधिलकी, कल्‍पकता, व्‍यासंग,नेतृत्‍व,प्रशासक, गुणग्राहकता, वास्‍तवाचे भान, बहुश्रुतता, दूरदृष्‍टीपणा, संयम, चिकाटी, व प्रतिभा हे गुण वाङ्मयीन नियतकालिकाच्‍या संपादकाच्‍या अंगी असावी लागतात, तरच कुठेतरी ती नियतकालिके तग धरू शकतात. संपादक एखादया वेळेस नसला तरी चालेल, मात्र तो समीक्षक, उत्‍तम वाचक व प्रशासक असणे गरजेचे  आहे. संपादक व्‍याकरणाचा जाणकार  असेल तर शुध्‍दलेखनाच्‍या बाबतीत व वाक्‍यरचनेच्‍या बाबतीत जागरूक राहतो. जुन्‍या व नवोदित लेखकांना हेरून त्‍यांच्‍यातील  प्रतिभेचे  स्‍फुल्लिंग  फुलविणे हे वाङ्मयीन नियतकालिकांच्‍या संपादकाचे महत्‍वाचे  कार्य आहे. नवीन उपक्रम  राबविण्‍यासाठी संपादकाकडे कल्‍पकता असावीच लागते. आपल्‍या कल्‍पनाविषयी संपादकामध्‍ये पूर्ण आत्‍मविश्‍वास असणे  देखील  गरजेचे  आहे.

          वाङ्मयीन नियतकालिकांच्‍या संपादकांना  अनेकदा एकाकी लढत द्यावी लागते. कारण स्‍वतःहून वर्गणीदार होणा-यांची संख्‍या फार कमी आहे. वाईट याचे वाटते की, शैक्षणिक  क्षेत्रातील शिक्षक, प्राध्‍यापक वर्गणीकडे दुर्लक्ष करतात. अंक भेट द्यावी अशी काहीची अपेक्षा असते. पण भेट एकदाच  द्यावयाची असते हे समजून घ्‍यायला हवे. वाङ्मयीन नियतकालिकाचे जे  काही वर्गणीदार  आहेत  त्‍यात  पन्‍नास टक्‍के वर्गणीदार मित्राचा अंक म्‍हणून वर्गणीदार होतात  हेही दुर्देव म्‍हणावे  लागेल . काही वाङ्मयीन नियतकालिकात जाहीरातीचे पीक आलेले दिसून येते. काही संपादक आर्थिक  उठाठेव वेगळया पध्‍दतीने  करतात. कुठल्‍याही  क्षेत्रातील जाहिराती  घेणे  चुकीचे आहे. वाङ्मयीन नियतकालिकात ग्रंथ, प्रकाशक  जमलेच तर शैक्षणिक  संस्‍थेच्‍या  जाहिराती असल्‍या पाहिजेत. निवडणूकीच्‍या, सोसायटीच्‍या,वाढदिवसाच्‍या जाहिराती अशा नियतकालिकातून अपेक्षित नाहीत . शासनाचे अल्‍पसे अनुदान, वर्गणीदारांचा निष्‍काळजीपणा यामुळे  काही संपादकांना  नियतकालिक  चालविताना पदरमोड करावी लागते.  त्‍यागी वृत्‍तीचे संपादक  आजही आहेत. कुटुंबाकडे फारसे  वेळ  न देता नियतकालिके चालवितात. त्‍यांना समजून घेऊन  मदत  करणे  गरजेचे नाही  का ?  आजही नागोराव कुंभार सारखे संपादक निष्‍ठेने, सेवाभावीवृत्‍तीने अनेकदा पदरमोड  करुन  नियतकालिक चालवितात महाराष्‍ट्राच्‍या वैचारिक मंथनात व काही प्रमाणात मराठीच्‍या समीक्षेच्‍या जडणघडणीत  विचारशलाकाचे योगदान तितकेच महत्‍वाचे आहे.  दर्जेदार  अंकाच्‍या संपादकाकडे काही  लेखक  मानधनाची अपेक्षा करतात (मानधन घेऊ  नये यातला भाग  नाही कारण चांगल्‍या अभ्‍यासकांना अनेक ग्रंथ खरेदी करावे लागतात) मानधन शक्‍य नाही झाले, तरी लेखकाला  कमीत  कमी  आभार/कृतज्ञता  पत्र पाठविणे  संपादकाचे कर्तव्‍य आहे.

          वाङ्मयीन नियतकालिकांचा संपादक आंतराष्‍ट्रीय साहित्‍याची  जाण  असणारा असावा. बहुभाषिक  असल्‍यास उत्‍तमच, त्‍यामुळे  इतर भाषेतील  अंक  वाचता  येतील. अनुवादासाठी त्‍याचा फायदा  होईल. संपादकाची ध्‍येय धोरणे  अंकासंदर्भात निश्चित  असावीत. सर्व साहित्‍य प्रकाराचा  परिचय संपादकाला  असावा. ज्‍या प्रवाहाला नियतकालिक  वाहिलेले आहे. त्‍याचे संपादकाला विशेष  ज्ञान असावे. अलिकडील  बहुतांश  संपादक अंकातील लेखाविषयी  भाष्‍य करीत  आहेत. संपादकांनी स्‍वतंत्र  विषय निवडून,वर्तमानकाळ  लक्षात  घेऊन लेखन करावे. भाषा आणि जीवन व साधना सारख्‍या  अंकाचे संपादक  हे कार्य करताना दिसतात. संपादकीयमध्‍ये स्‍वतःचा दृष्टिकोण असावा. संपादकीयमधून संपादकांनी  नवीन, उपेक्षित विषयाला स्‍पर्श करायला हवे. त्‍यातून लेखक  व समीक्षकाला देखील  प्रेरणा मिळेल. नवोदित लेखकाची  साहित्‍याविषयी तळमळ व विषयातील नाविण्‍यता  लक्षात घेऊन लेखनासाठी त्‍यांना संधी द्यायला  हवी. काही वाङ्मयीन नियतकालिकांत घराणेशाही  पहायला मिळते. यामुळे  नवोदित लेखकाची कुचंबना होत  आहे. नवोदितांमध्‍ये लेखनरुपी राजहंस  दडलेला आहे. त्‍यांना मुक्‍तपणे वावरण्‍यासाठी वाङ्मयीन नियतकालिकांनी सरोवराचे  काम  केले पाहिजे.

          वाङ्मयीन नियतकालिकांचा संपादक  हा वाङ्मयाची आवड असलेला असावा. नसेल तर नियतकालिकांना  व्‍यवसायाचे रूप प्राप्‍त होते. प्रमोशनच्‍या व सूटच्‍या नियमामुळे ISSN नंबर असलेले नियतकालिक जागोजागी पावसाळी छत्र्याप्रमाणे उगवल्‍या आहेत. वाङ्मयाची  कुठलीच  जाणीव नसलेल्‍या व्‍यक्‍तींला हा क्रमांक  दिला जातो. त्‍या संदर्भात संपादकासाठी कुठले  निकष आहेत ? अतिशय हीन दर्जाचे  लेखन अशा अंकातून होत आहे. संशोधन चालू आहे. शोध  मात्र लागत नाही. ही नियतकालिके  राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय  आहेत. केवळ बायोडाटा वाढविण्‍यासाठी हा खेळ  चालू आहे. बायोडाटा म्‍हणजे गुणवत्‍ता नव्‍हे, हे ही लक्षात  ठेवायला हवे. पैसे/डी.डी घेऊन जिथे संपादक लेख छापतात  तिथे निष्‍ठेचा  व दर्जाचा प्रश्‍नच  येत नाही. आज ISSN असलेल्‍या बहुतांश  वाङ्मयीन नियतकालिकांना बाजाराचे  स्‍वरुप प्राप्‍त झाले आहे.  जयदेव डोळे यांनी प्राध्‍यापक लिमिटेड या ग्रंथात शैक्षणिक क्षेत्रातील अशा सर्व विषयावर सुक्ष्‍मपणे व परखडपणे भाष्‍य केले आहे.  असंख्‍य नियतकालिकांना ISSN नंबर नाही, पण वाचक  त्‍यासमोर  विनम्रपणे  नतमस्‍तक  होतात.

          भाषा, साहित्‍य, संस्‍कृतीचे संवर्धन व संगोपन  करण्‍याच्‍या भूमिकेतून वाङ्मयीन नियतकालिके चालविणे  काळाची  गरज आहे. संपादकांनी  होकायंत्राची भूमिका पार पाडायला हवी. साहित्‍य,समाज व संस्‍कृतीच्‍या विकासात संपादकाचे  योगदान  दीपस्‍तंभासारखे  असायला हवे. चांगला संपादक नवीन लेखक  निर्माण करीत नसला तरी, लेखकाला  आकार देतो व घडवितो  हे  मात्र खरे आहे.

         -    डॉ.म.ई.तंगावार

          श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर 

               

 

Comments

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज