पर्यावरण आणि युवक
विश्वात सर्व क्षेत्रात ज्या काही क्रांत्या झालेल्या आहेत, त्यात युवकांचा खूप मोठा वाटा राहिलेला आहे. ज्येष्ठांकडून असे बोलले जाते की, आजची तरुणाई बिघडलेली आहे. यात काही तथ्य असले तरी परिवर्तनात, चळवळीत युवकांचा जो सहभाग राहिलेला आहे, त्याला देखील नाकारता येत नाही. कोणत्याही चळवळीत बहुतांश ज्येष्ठ मार्गदर्शन करतात. युवक मात्र प्रत्यक्ष कृती करतात. दहा वर्षांपूर्वी महाविद्यालयीन युवक-युवती जेव्हा कविता लिहायचे तेव्हा त्यांच्या बहुतांशा कवितेचा विषय प्रेम, विनोद असायचा. आज मात्र युवाशक्ती संवेदनशीलतेने पर्यावरण, शेतकरी आत्महत्या, समाजात एखादी घडलेली विदारक घटना या विषयावर गांभीर्याने लेखन करीत आहे.
भारतातील ऐंशी ते नव्वद टक्के वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. ‘पर्यावरण आणि नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन आणि युवक’ यासारख्या शीर्षकाखाली महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागात सात दिवसाचे शिबीर घेतले जाते. युवक तिथे मुक्कामी राहतात. कृती, व्याख्यान, प्रयोग या माध्यमातून प्रत्यक्ष विद्यार्थी सहभागी होतात. सामाजिक बांधिलकी, राष्ट्रवाद आणि पर्यावरणाचे महत्त्व यासंबंधी शिबीरात प्रबोधन केले जाते.
झाडं लावणे, शोषखड्डे तयार करणे, स्वच्छता राबविणे हे कार्य युवक जेव्हा मनापासून आनंदाने करतात तेव्हा ख-या अर्थाने श्रमसंस्कृतीचे दर्शन घडते. आपण समाजासाठी कार्य केले पाहिजे.‘मी माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी आहे’ या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ब्रीदवाक्याप्रमाणे युवक निःस्वार्थपणे, जिद्दीने, तन्मयतेने, मनात आशावाद उराशी बाळगून काम करतात. ज्या गावात शोषखड्डे काय असतात, माहीतही नव्हते. अशा गावात शोषखड्डे तयार करुन युवकांनी पाणी जिरवून घाणीचे साम्राज्य कमी केले. त्यामुळे त्या गावातील आरोग्य चांगले झाले. राष्ट्रीय सेवा योजना ही पर्यावरणपूरक अशी युवकांची एक महत्त्वपूर्ण चळवळच आहे. शिबीरास स्वयंसेवकांनी काही गावात शौचालय देखील बांधून दिले. उन्हाळ्यात पशूंना नरम चारा मिळावा म्हणून गावात तशी प्रक्रिया युवकांनी राबविली. पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केली.
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयातील स्वयंसेवक तरुणांनी एक गाव धूरमुक्त केले. आजही ग्रामीण भागातील महिला चूल फुकूंन फुकूंन आरोग्य धोक्यात घालविते. चूलीतील लाकडांचा धूर हे एक सुध्दा प्रदूषणच आहे. चूलीवरचा स्वयंपाक बंद झाला तर लाकडं फोडण्याची, झाडं तोडण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच वृक्षाचे संवर्धन होईल. याशिवाय जळतनासाठी कापूस व तुरीच्या लाकडाचा उपयोग केला जातो. ही जर शेतातच कूजली तर उत्तम खत तयार होते. त्यामुळे चुलीचा वापर करु नये, यासाठी या महाविद्यालयातील युवकांनी गाव धुरमूक्त केलं. प्रत्येक घरात चुलीऐवजी गॅस आला. शिबीरातून युवकांनी केलेले हे प्रबोधन आणि प्रत्यक्ष कार्य निश्चितच प्रेरणादायी कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे.
महाविद्यालयातील रासेयोचे स्वयंसेवक युवक घरटे तयार करुन झाडांना बांधतात. उन्हाळ्यात झाडांना जागोजागी प्लॅस्टिकच्या वाट्या बांधून पाणी टाकलं जातं. कॅरीबॅगमुक्तीचा प्रचार आणि प्रसार केलं जातं. गावातील कचरा संकलन करुन कंपोस्ट खत बनविलं जातं. दुष्काळात धरणातील गाळ काढला जातो, छोटी तळे काढली जातात. वनराई बंधारे बांधले जातात. या सर्व दृष्टीने विचार केल्यास पर्यावरणाच्या चळवळीत युवकांचे किती योगदान आहे, हे लक्षात येईल.
मेळघाटात, आनंदवनात, हिवरेबाजार येथे युवकांचे अनेक शिबीर झाले. आज पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार या गावचा देशातील एक आदर्श गाव म्हणून जो उल्लेख केला जातो, त्यात रासेयोच्या युवकांचा वाटा आहे. गावोगावी अनेक यात्रा भरतात, दिंड्या निघतात, आठवडी बाजार भरतात. ते सर्व स्वच्छ करण्याचे काम सातत्याने युवकच करतात.
पर्यावरणाशी निगडित विद्यापीठ, राज्य पातळीवर वक्तृत्त्व, वादविवाद, निबंध यासारख्या स्पर्धा होतात. मागे एकदा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात वक्तृत्वासाठी ‘वसुंधरेची कैफियत’ हा विषय ठेवण्यात आला आहे. अशा ठिकाणी अभ्यासपूर्ण बोलणारे युवकच असतात. शासकीय परिपत्रक आणि त्या-त्या दिनाचे औचित्य साधून शहरात महाविद्यालयातील युवक रॅली काढतात. इंधनमुक्त रॅली, पाणी वाचवा, आरोग्य सांभाळा अशा कितीतरी पर्यावरणाला अनुसरुन विषय घेवून रॅली काढल्या जातात. या विषयाशी सुसगंत पथनाट्याद्वारे युवक समाजाचे प्रबोधन करीत असतात.
विशेषतः गणेशोत्सवामध्ये पर्यावरणपूरक जे उपक्रम राबविले जातात त्यात युवकांचा सहभाग अधिक असतो. कारण गणेश मंडळात सत्तर ते ऐंशी टक्के पदाधिकारी युवकच असतात. २०१६ सली महाराष्ट्र शासनाच्या वतीने पर्यावरणपूरक देखावे, कार्य करणा-या गणपती मंडळांना तालुका पातळीवर पुरस्कार दिले गेले. परीक्षक म्हणून उदगीर तालुक्यातील गणेश मंडळाचे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली होती. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातही पर्यावरणपूरक कार्य मंडळाच्या वतीने करण्यात आले. उदगीर तालुक्यात कोदळी नावाचे गाव आहे. तेथील गणेश मंडळाचा प्रमुख युवकच आहे. त्यांनी ठिबक सिंचन, पाणी आडवा, पाणी जिरवा यासारखे देखावे केले होते. डी.जे. मुक्त, गुलाल मुक्त चळवळ उभी केली. एकच गणपती त्या गावात अनेक वर्षे बसविले जाते. पाण्यात गणपतींचे विसर्जन केले जात नाही.गणपतींच्या मूर्तीचा रंग रसायनयुक्त असतो. ते जेव्हा पाण्यात पसरते तेव्हा प्रदूषण निर्माण होते. ज्या ठिकाणी गणपती बसविले जाते. त्याठिकाणी कोदळीत झाडे लावली गेली होती. पर्यावरण, आरोग्य आणि व्यसनमुक्ती संदर्भात त्या काळात प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली गेली. यात युवकांचाच पूर्ण वाटा होता.
सद्यःस्थितीत पितळ्याचे गणपती बसविले जात आहेत. तरुण जागृत झाल्यामुळे धातूच्या मूर्तीचे प्रमाण वाढले आहे. मंडळांकडून वृक्षांचे वाटप केले जाते. पर्यावरणपूरक स्पर्धा घेतल्या जातात. भोवताली पर्यावरणपूरक ‘घोषवाक्य’ लिहिली जातात. गणेश मंडळांकडून सार्वजनिक बोअरच्या बाजूला मोठा शोषखड्डा तयार केला जातो. गावातील छतावरील पाणी खड्डयात सोडले जाते, जिलेटीनच्या कागदाऐवजी पाना-फूलांचा वापर केला जातो. स्पर्धा घेवून उत्कृष्ट पशू-प्राण्यांची निवड करुन बक्षीस दिलं जातं. एकंदरीत जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात युवक जागृत झालेला आहे. हे सर्व काम संवेदनशील मनाने युवक करीत आहेत.
होळीच्या दिवशी लाकडाची होळी न करता कच-याची होळी करणारे युवक आज जागोजागी पहायला मिळतात. भविष्यात पर्यावरणाची चळवळ सक्षम बनावी असे वाटत असेल तर काम करणा-या युवकांना बळ, प्रेरणा देण्याची गरज आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दोन कोटी, चार कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प यशस्वी झाला. त्यात शाळा-महाविद्यालयातील युवक-युवतींनी जागोजागी झाडं लावली.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे ‘विश्व परिवार’ नावाची युवकांची चळवळ आहे. कैलास येसगे हे या चळवळीचे प्रमुख आहेत. चाळीस ते पन्नास युवक या चळवळीशी जोडलेले आहेत. या चळवळीच्या वतीने ‘शेती, ग्रामीण विकास आणि पर्यावरण’ या शीर्षकाखाली अंक काढण्यात आला. पी.साईनाथाच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. २०१६ साली युवकांनी एकत्र येऊन ‘दुष्काळ निवारण परिषद’ घेतली. या परिषदेस जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा उपस्थित होते. परिषदेपूर्वी एक महिना युवकांनी गावोगावी जावून भेटी दिल्या. शेततळे, जलयुक्त शिवार यासारख्या विषयांवर परिषदेत मंथन झाले. ‘दुष्काळ’ नावाचा विशेषांक काढण्यात आला. पर्यावरण हाच या अंकाचा विषय आहे. शेतकरी साहित्य संमेलन घेवून ‘हाक शिवाराची’ हा अंक प्रकाशित करण्यात आला. पर्यावरण शिकविणे ही काही शासनाचीच जबाबदारी आहे असे नाही तर ती सामूहिक जबाबदारी आहे, असे या चळवळीचे तत्त्वज्ञान आहे. यासारख्या अनेक चळवळी आहेत की, तिथे युवक व्यसनमुक्त सप्ताह चालवतात. सायकलींचे वाटप करतात. पर्यावरणासंबंधी कार्य करणारे असे अनेक युवक आहेत. या युवकांची नोंद मात्र फारशी घेतली जात नाही.
नुकतेच महाराष्ट्रात ‘वॉटर कप स्पर्धा’ घेवून पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गावातील लोक रात्रंदिवस कष्ट करुन पाणी अडवण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. याची माध्यमांवर चर्चा देखील झाली. या चळवळीचे मार्गदर्शक नायक, उद्योजक असले तरी गावात काम करणारे पन्नास टक्के युवकच आहेत.
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार व कार्य तसेच ग्रेटा थनबर्ग, जाधव पायेंग अशी कितीतरी उदाहरणे देता येतील की ज्यांनी तारूण्यात पर्यावरणासंदर्भात महत्त्वाचे कार्य केले. आजही अनेक युवक पर्यावरणाच्या संदर्भात संशोधन व कार्य करीत आहेत. एकंदरीत युवकांमध्ये झालेली ही जागृती निश्चितच देशाला ‘सूजलाम् सुफलाम्’ बनवेल अशी खात्री वाटते.
- म. ई. तंगावार
९८९००६५६९०
खुप छान, अभिनंदन सर
ReplyDelete