प्रयोगशील प्राचार्य : डॉ. ना.य.डोळे
समाजाचे सुद्धा एक विद्यापीठ असते. या विद्यापीठात जे काही मिळते त्याची तुलना कशासीही करता येत नाही. या विद्यापीठात काम केल्यास समाजात कायमची नोंद होते. शैक्षणिक क्षेत्रात व प्रशासनात काम करत असताना सामाजिक क्षेत्रात तळागाळातल्या माणसापर्यंत जाऊन काम करणे ही तारेवरची कसरत असते. समाजाचे प्रबोधन केवळ कार्यकर्त्यांनीच करावे असे म्हणणे देखील चुकीचे आहे.वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असताना विशेष करून शिक्षकी पेशा स्वीकारलेल्या लोकांचे कर्तव्य आहे की,त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.हे काम उदगीर परिसरात अतिशय तन्मयतेने प्राचार्य डॉ.ना.य.डोळे सरांनी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात केले होते.
शहरातील लोकांना खेड्यात येऊन काम करणे, तेथील वातावरणाशी व संस्कृतीशी जुळवून घेणे म्हणावे तितके सोपे नसते. मुंबई, पुण्यातील लोकांच्या दृष्टीने उदगीरसारखे ठिकाण त्याकाळी तर एक खेडेचं. शिकलेली पिढी आज साधारणपणे शहराकडे धावत आहे. कुठलीच सुविधा व भौतिक साधने ज्या ठिकाणी उपलब्ध नव्हते, अशा सीमाभागावर वसलेल्या उदगीरमध्ये इ.स.१९६२ साली डॉ.नारायण यशवंत डोळे आले. संपूर्ण शिक्षण पुण्यात झालेले असताना केवळ समाजवादी, डाव्या विचारसरणीच्या प्रेमामुळे एस.एम. जोशी यांच्या सूचनेमुळे नांदेडला व डॉ.बापूसाहेब काळदाते यांच्या सांगण्यावरुन उदगीरला येऊन महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीरच्या प्राचार्यपदी रूजू झाले. प्राचार्य म्हणून काम करत असताना आलेले वेगवेगळे अनुभव, विद्यार्थ्यांचे केलेले निरीक्षण आणि विविध उपक्रम यावर आधारित 'प्राचार्य' नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. हे पुस्तक त्यांनी एस.एम. जोशी यांना अर्पण केले आहे. ना.य. डोळे अर्पणपत्रिकेत लिहितात, "तुम्ही सांगितले म्हणून सत्तावन साली नांदेडला आलो. तुम्ही सांगितले म्हणून बासष्ट साली उदगीरला आलो. काय काम केले, त्याचा हा थोडक्यात अहवाल. आता घर उदगीरला बांधले, सुना मराठवाड्यातील, जावई ही मराठवाड्यातला. मी आता उदगीरचाच झालो. हे पुस्तक तुमच्या पवित्र स्मृतीला अर्पण..." मुलांना शिकविण्यासाठी माणसं शहरात जातात, परंतु बहुजनांच्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी तसेच शिकवण्यासाठी डॉ.ना.य.डोळे सर अतिग्रामीण भागाकडे आले होते. त्यांना वाटले असते तर ते मोठ्या शहरातही नाही, तर विदेशात देखील स्थाईक झाले असते. पुणे विद्यापीठात १९५१ साली पदव्युत्तर राज्यशास्त्र विषयात ते सर्वप्रथम आले होते. 'युनोतील भारताचे स्थान' या विषयावर १९५७ साली पुणे विद्यापीठात त्यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केली होती. प्रदेशातील अनेक देशात जाऊन आले. आठ ते दहा वैचारिक ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत.
जन्मभूमीइतकी कर्मभूमी देखील श्रेष्ठ असते. जीवनात 'ज्ञानक्षेत्रे' व 'कर्मक्षेत्रे' ही विशेष अंगे आहेत. याचे एक उत्तम उदाहरण म्हणून डॉ.ना.य. डोळे सर यांचे देता येईल.महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर म्हणजे डोळे सर व डोळे सर म्हणजेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर असे समीकरण तयार झाले आहे. नव्हे तर आजही 'डोळें' चेच उदगीर का? असे विचारले जाते. ना.ग. गोरे, गंगाप्रसाद अग्रवाल, एस.एम. जोशी, स्वामी रामानंद तीर्थ, अच्युतराव पटवर्धन व बापूसाहेब काळदाते यांच्या विचार व कार्यामुळे डॉ.डोळे यांचे व्यक्तिमत्त्व भारावलेले होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एस.एम. जोशी, गोविंदभाई श्रॉफ सारख्या ज्या व्यक्तींनी पुढाकार घेतला होता अशा व्यक्तींच्या कुशीत डॉ.डोळे सर वाढलेले होते. सामाजिक कार्यकर्ता, समाजवादी विचारवंत, प्रबोधनर्ता , शिक्षणप्रेमी, हाडाचा शिक्षक, उत्कृष्ट वक्ता त्याहूनही प्रयोगशील प्राचार्य म्हणून डॉ.ना.य.डोळे यांची प्रतिमा महाराष्ट्रात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या समस्या खूप वेगळ्या असतात. त्या समस्या समजावून घेऊन मार्ग काढणे म्हणावे तितके सोपे नसते.ग्रामीण भागाचा प्राचार्य कसा असावा याचा एक आदर्श २८ वर्षांच्या काळात (१९६२ ते १९९०) उदगीरमध्ये डॉ.ना.य.डोळे यांनी घालून दिला.
डॉ.ना.य डोळे यांचे 'प्राचार्य' नावाचे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक, शासक, प्रशासक, प्राचार्य, संस्थाचालक, राजकारणी, ग्रंथपाल,शिक्षकेतर कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वाचावे असेच आहे. प्राचार्यांचे स्थान कसे आहे? याविषयी 'प्राचार्य' पुस्तकात ते लिहितात, "प्राचार्य हा टीमच्या कॅप्टनप्रमाणे असतो. सहकारी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी या समूहाचे प्राचार्य नेतृत्व करतो. सर्व सहकाऱ्यांचा आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करण्यात प्राचार्य किती प्रमाणात यशस्वी होतो त्यावर प्राचार्य पदाचे यश अवलंबून असते." (प्राचार्य,पृ.१५) आज खुर्चीवर असलेले बहुतांश प्राचार्य विविध कारणाने अस्वस्थ आहेत. अशांना डॉ.ना. य. डोळे यांचे प्रशासन डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. कारण आज विद्यार्थी भयभीत झालेले आहेत. सोडल तर पळतय व धरल तर चावतय अशी अवस्था विद्यार्थ्यांची झालेली आहे.
'प्राचार्य' पुस्तकाच्या मलपृष्ठावर असे लिहिले गेले आहे, "प्रिन्सिपल' या इंग्रजी शब्दाचे दोन अर्थ आहेत.एक तत्त्व व सिद्धांत तर दुसरा प्राचार्य असा. डॉ.ना.य.डोळे हे नाव डोळ्यापुढे आले की, या शब्दाचे दोन्ही अर्थ मनात उमटतात." ना.य.डोळे यांनी त्या काळात प्राचार्य पदावर जे कार्य केले ते आज शक्य नाही. कारण त्या काळातील संस्थाचालकांची पिढी व आजचे संस्थाचालक यात तफावत आहे. असे असले तरी त्या काळात विद्यार्थ्यांसाठी विविध प्रयोग करणारे प्राचार्य महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकेचं होते. उच्च शिक्षणातील परिस्थिती आज दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. अशा अवस्थेत ना.य.डोळे यांची विचारसरणी व कृती निश्चितच सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे. प्रशासकीय कौशल्य व शैक्षणिक दूरदृष्टीमुळे संस्थाचालक, शिक्षक, पालक, विद्यार्थी व समाजामध्ये डोळे सरांबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले होते. ना.य.डोळे यांनी उदगीरमध्ये छात्रभारती, राष्ट्र सेवा दल व युवक क्रांती दलाची स्थापना त्यांनी केली. डॉ.डोळे हे पुरोगामी विचारवंत होते. उक्तीपेक्षा कृतीला महत्त्व देऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्यांपैकी ते एक होते. श्री.रंगा राचुरे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आजही या परिसरात काम करीत आहेत. त्यांच्या विचारांच्या तालमीत हजारो कार्यकर्ते निर्माण झाले. आजही डोळेंचा वारसा काहीजण निष्ठेने चालवताना दिसून येतात.
लेखणीबरोबर ग्रामीण भागात जाऊन वाणीद्वारे नि:स्वार्थपणे सामाजिक कार्य करीत त्यांनी धर्मनिरपेक्षता, लोकशाही, राष्ट्रीय एकात्मता व मानवता आदी मूल्यांचा हिरीरीने पुरस्कार केला. महात्मा बसवेश्वर, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे तसेच शिवजयंतीचे औचित्य साधून हजारो व्याख्याने ग्रामीण भागात डोळे सरांनी दिली. उदगीर तालुक्यात तसेच कर्नाटक मराठी भाषिक सीमाभागात शक्यतो असे गाव नसेल की ज्या गावात डोळे सर गेले नाहीत. ना.य.डोळे यांच्या डोळस दृष्टीमुळे अनेकजण जीवनात यशस्वी झाले. सहज व उगवत्या भाषेतून समाजाचे प्रबोधन करण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.त्यांच्या वक्तव्यात अलंकाराचा सोस, अहंकार नव्हता. त्याबरोबरच प्रसिद्धी, सत्ता व संपत्तीपासून डॉ.ना.य.डोळे चार पाऊले दूरच होते. पत्रकावर त्यांचा जास्तीचा भर नव्हता. त्रास सहन करून तोंडी म्हणजेच व्याख्यानाच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रचार ते करीत असत.
स्वामी विवेकानंदानी 'माणूस घडविणारे शिक्षण' असा शब्दप्रयोग केलेला होता. आजच्या शिक्षणाने डॉक्टर, इंजिनिअर, प्रशासक, वकील, कारखानदार दिले, परंतु मानवतेची तुतारी फुंकणारी, माणूसकीची जाण ठेवणारी माणसं या शिक्षणातून किती मिळाली हा संशोधनाचा, चिंतेचा व चिंतनाचा विषय नाही का? ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे, ही ना.य.डोळे यांची मनापासून तळमळ होती. बहुजन विद्यार्थ्यांबद्दल जिव्हाळा त्यांच्या मनामध्ये होता. बहुजन विद्यार्थ्यांबद्दल असलेली सहानुभूती, त्यांच्यात रममाण होण्याची वृत्ती, विविधांगी ज्ञान व अध्यापनाचे तंत्र यामुळे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक झाले. साधी राहणी, उच्च विचारसरणी असलेल्या ना.य.डोळे यांनी रंजल्या-गांजलेल्यांची सेवा केली. 'बुडती हे जण न देखवे डोळा,येतो कळवळा म्हणूनिया' या कळवळयातून विद्यार्थ्यांना सवलती देऊन, विद्यार्थ्यांची रूची लक्षात घेऊन त्यांच्या आवडीनुसार उपक्रम राबवित होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयीची आस्था निर्माण केली. अनेकदा 'दहा रुपये उडदावर भरा व परीक्षेची फीस कापसावर भरा पण शिका' असे ते विद्यार्थ्यांना आवाहन करीत आणि नाही जमल्यास मी फीस माफ करीन असे सांगायचे.
महाविद्यालय केवळ ज्ञानकेंद्र नाही,तर परिवर्तनाचे साधनकेंद्र बनले पाहिजे असे त्यांना नेहमी वाटायचे. नव्हे तर त्याच पद्धतीने त्यांची वाटचाल होती. विद्यार्थ्यांना चांगले व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून आंध्र, केरळ, कर्नाटक व पुणे या सारख्या ठिकाणाहून प्राध्यापकांना आणून त्यांची नियुक्ती केली. संस्थेनी देखील पूर्ण अधिकार त्यांना दिले होते. कारण संस्थाचालकही समाजवादी विचाराचे पाईक व निष्ठावंत होते. शिक्षणातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांना अपेक्षित होता. शिक्षक हा विद्यार्थी परायण असावा, विद्यार्थी हा ज्ञानपरायण असावा व ज्ञान हे वापरण्यासारखे असावे अशी त्यांची धारणा होती. विद्यार्थ्यांचे प्रेम व विश्वास हेच खऱ्या शिक्षकाचे भांडवल असते. हे चांगल्या व विषयानुरूप अध्यापनाशिवाय अशक्य आहे.
प्राचार्य असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेले उपक्रम अफलातून होते. पंचमीस विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील झाडाला झोका बांधून देणे, भाड्याने सायकल आणून विद्यार्थ्यांना चालवायला शिकविणे व विटी-दांडू खेळायला लावणे असे कितीतरी उपक्रम त्यांनी राबविले. गरीब विद्यार्थी ज्याच्याकडे शेती नाही, असा विद्यार्थी वेळाअमावस्या साजरी करू शकत नाही, तेव्हा अशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात डॉ.ना.य.डोळे हे वेळाअमावस्या साजरी करत होते. समता, बंधुत्व व मानवतावादी दृष्टिकोन या सारख्या माध्यमातून रुजविण्याचे काम त्यांनी केले. काचा फुटल्या तरी चालतील, पण मुलांची मन तुटू नयेत याची काळजी त्यांनी घेतली. इमारतीच्या उंचीपेक्षा विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची उंची त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची होती. त्यामुळेच तर एखाद्या विषयाचा प्राध्यापक रजेवर असेल, तर ते स्वत: तास घ्यायचे.
प्राध्यापकांविषयी डोळे यांचे मत असे होते की, "प्राध्यापकांनी आपले अध्यापनाचे कार्य वर्गापुरते, अभ्यासक्रम पूर्ण करण्यापुरते मर्यादित न ठेवता सामाजिक ऋण फेडण्याचा यथाशक्ती प्रयत्न करावा. ग्रामीण भागात शैक्षणिक, सांस्कृतिक पुढाकाराची गरज असते." (प्राचार्य,पृ.३९) डॉ.ना.य. डोळे यांनी विद्यार्थ्यांचे हीत लक्षात घेऊन अनेक योजना राबविल्या. प्राध्यापकांच्या नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सोयीचे वेळापत्रक ते बनवित असत. 'पालक-प्राध्यापक' योजना, प्रवेश मार्गदर्शन समिती, तक्रार पेटी, वाडे भाड्याने घेऊन वसतिगृह, विद्यार्थ्यांसाठी पुस्तक बाईडिंग, फर्निचर दुरूस्ती, रंगरंगोटी, कमवा आणि शिका, नोटीस बोर्डावर साहित्य लेखन, महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, मुलींना वर्षभर रिक्षाचे भाडे असे कितीतरी उपक्रम डॉ.ना.य.डोळे यांनी यशस्वीपणे राबविले होते. गरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी शिकल्या पाहिजेत, हाच यामागचा मूळ हेतू होता.
समाजसुधारकांच्या कर्तृत्वाचा सांस्कृतिक वारसा डोळ्यांसमोर ठेवूनच लोकशाहीच्या मूल्यांचे जतन करण्यासाठी ज्या विचारवंतांची एक साखळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली त्यात डॉ.डोळे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. लोकशाही ही जीवन जगण्याची पद्धत आहे, नव्हे तर जीवनाचा एक भागच आहे असे डॉ.डोळे यांना वाटायचे. अनुभव,चिंतन, व्यासंग व निरीक्षण आदींचा सुरेख संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला होता. डॉ.ना.य.डोळे हे केवळ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर प्रबोधनकार शिक्षणतज्ज्ञ होते."शिक्षण संस्थेचे सुयोग्य नियोजन, प्रशासकाचे कुशल व कल्पक प्रशासन, अध्यापकांचे व्यावहारिक उपयोगितेवर आधारित अध्यापन, विद्यार्थ्यांचे नीटसे अध्ययन, समाजाचे व व्यवस्थेचे निरीक्षण यामध्ये योग्य सांगड घातली गेली तर उच्च शिक्षणाची उद्दिष्टे साध्य होऊ शकतात." असे शिक्षणतज्ज्ञ जॉन डयुई यांचे मत होते. हे सर्व कुशलतेने महाविद्यालयाच्या कार्यकाळात डॉ.डोळेंनी करून दाखविले. जॉन डयुईंच्या वरील मताची अनुभूती डॉ.डोळें सरांच्या कार्यकर्तृत्वातून येते. शैक्षणिक गुणवत्ता प्रक्रियेत शिक्षकाचे अध्यापन, विद्यार्थ्यांचे अध्ययन, संस्थाचालकांचे व्यवस्थापन, प्राचार्यांचे प्रशासन व पालकांचे पर्यवेक्षण इत्यादीला महत्त्व असते. याचा समतोल डॉ.डोळे यांनी प्राचार्य असताना साधलेला होता.
राजकारण हाही तसा डॉ.ना.य.डोळे यांचा आवडता विषय होता. निवडणुकीच्या प्रचारात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. प्रचारात मतदानाचा हक्क, मतदान कसे व कुणाला करावे, संविधान काय सांगते, राष्ट्राचा विकास व समाजवाद यावरच ते अधिक करून बोलत असत. राजकारणी लोकांनी समाजकारणाची बोटं हातात पकडली पाहिजेत यासाठीच त्यांचा अट्टाहास होता. डॉ.ना.य.डोळे लाचार होऊन कधी जीवन जगले नाहीत.ते डाव्या विचारसरणीचे असल्यामुळे कदाचित कुलगुरू, राज्यपाल होण्याची क्षमता असून देखील ते झाले नाहीत. हे शैक्षणिक व राजकीय क्षेत्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. कारण अशी माणसं ज्याठिकाणी जातात त्याठिकाणी नंदनवन तयार करीत असतात. उदगीरसारख्या उजाड माळरानावर डोळे सरांनी शिक्षणाचा मळा फुलविला. सर्वच क्षेत्रातील लोकांना त्यांच्याविषयी आदरयुक्त भीती होती. आजही अनेकांच्या हृदयात डॉ.ना.य.डोळे सर घर करून आहेत. म्हणूनच नेहमी त्यांच्या नावाचा व कार्याचा उल्लेख सातत्याने विचारमंचावरून व जागोजागी होतो.
दंगली, संप, दुष्काळ व एकमेकांत निर्माण झालेले कलह अशावेळी निर्णय घेण्याची जबरदस्त क्षमता त्यांच्यात होती. हे त्यांचे प्रशासकीय कार्य अभ्यासल्यास लक्षात येते. पदाचा, खुर्चीचा, संपत्तीचा मोह नसलेल्या डॉ.ना.य.डोळे यांनी शैक्षणिक व राजकीय जागृती केली. महाविद्यालयीन विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदू होता.केवळ शैक्षणिकच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक समस्या देखील ते सोडवित असत. त्यामुळे डॉ.ना.य.डोळे सर विद्यार्थ्यांना पितृसमान व मातृसमान वाटायचे. विद्यार्थ्यांच्या संदर्भात डॉ.ना.य.डोळे लिहितात, "उदगीरला २८ वर्षांत गरीब, ग्रामीण व दलित विद्यार्थ्यांसाठी मी जे थोडे बहुत काम केले तेवढे मला पुण्यात करता आले नसते. मुलांचे इतके प्रेम मी संपादन केले, इतका विश्वास मिळविला की, परमेश्वरालाही हेवा वाटावा." (प्राचार्य,पृ.११) किती जगावे यापेक्षा कसे जगावे हेच महत्त्वाचे आहे. जगण्याचा कुठला तरी धर्म असावा, जगण्यात जीवन व मानुष्यता असावी. इतरांना मदत करण्याची, इतरांवर प्रेम करण्याची उत्कटता असावी, याचा प्रत्यय डॉ.ना.य.डोळे सर यांच्या कृतीतून येतो.
'अवघाचि संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोक|' हे भव्य स्वप्न उरी बाळगून उदगीर परिसरातीलच नव्हे,तर महाराष्ट्रतील सर्वच क्षेत्रातील लोकांना दीर्घकाळ पुरेल इतका शैक्षणिक क्षेत्रातील प्रयोग व माणूसकीचा सुगंध डॉ.ना.य.डोळे यांनी देऊन गेले. आदरणीय डोळेंचा डोळसपणा खरोखरच अनुकरणीय व वंदनीय आहे. ज्ञानाचे पूजारी, निष्काम कर्मयोगी व निरपेक्ष वृत्तीचे समाजसेवक असलेले डॉ.ना.य. डोळे केवळ विद्यार्थ्यांचे नव्हे, तर समाजाचे, मित्र-परिवारांचे व चळवळीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. ज्या महाविद्यालयात व परिसरात परिस्थिती प्रतिकूल असताना पहिले प्राचार्य म्हणून डॉ. ना.य. डोळे यांनी यशस्वीपणे कार्य केले. त्या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मनस्वी आनंद होणे साहजिक आहे.
- म. ई. तंगावार उदगीर ९८९००६५६९०
खूप छान, अभिनंदन सर.
ReplyDeleteधन्यवाद!
ReplyDeleteछान लेख
ReplyDeleteप्रेरक व्यक्तिमत्व
ReplyDelete