विचारशील व्यक्तिमत्त्व : न्या.नरेंद्र चपळगावकर

       माजी न्यायमूर्ती नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा मूळ पिंड हा वैचारिकतेचा आहे. साहित्याची आवड असल्यामुळे एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. लातूर व औरंगाबाद येथे काही काळ मराठी विषयाचे  अध्यापन करून इ. स.१९६२ साली वकिली व्यवसायाला सुरूवात केली. १९९० साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली व १९९९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या  आई - वडिलांवर लहानपणीच स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार झाले होते. वडील स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी होते. त्यामुळे अनंत भालेरावांच्या सहवासात काही काळ नरेंद्र चपळगावकरांना राहता आले. स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक लेखकात न्या.नरेंद्र चपळगावकर हे एक महत्त्वाचे नाव आहे. चपळगावकरांनी संयमितपणे समन्वयवादी भूमिका घेऊन वैचारिक लेखन केले. जुन्या हैदराबाद संस्थानात न्या.कोरटकर, न्या.एकबोट आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर न्या.व्यंकटराव देशपांडे, न्या.कुर्डूकर व न्या.कानडे मराठवाड्यात होऊन गेले. परंतु वैचारिक लेखनात न्या.चपळगावकर यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला.

           वैचारिक लेखन करणारे मराठवाड्यातील एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून २००४ मध्ये माजलगाव येथे झालेल्या २६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. हा मान त्यांना वैचारिक लेखनामुळेच मिळाला. वकिली व्यवसाय करताना राष्ट्र सेवादल व लोकशाही समाजवादी चळवळीत काम करणारे न्या.चपळगावकर सामाजिक संस्थेच्या विविध पदावर कार्य केले. 

   'अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा', ' लॉ ऑफ इलेक्शन्स', 'निवडणुकीचा कायदा', 'भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर', 'कर्मयोगी संन्यासी', 'कहाणी हैदराबाद लढ्याची', 'राज्यघटनेचे अर्धशतक', 'तुझ्या माझ्या मनातलं', 'माहितीचा अधिकार' व 'कायदा आणि माणूस' अनंत भालेराव: काळ आणि कर्तुत्व, तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ, न्यायाची गोष्ट, संघर्ष आणि शहाणपण, आठवणीतले दिवस, महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना, संस्थानी माणसं, हरवलेले स्नेहबंध, दीपमाळ,मनातली माणसं, नामदार गोखले यांचे शहाणपण, राज्यघटनेचे अर्धशतक, सावलीचा शोध, कर्मयोगी संन्यासी तसेच अगदी अलीकडे २०२२ मध्ये आलेले पंतप्रधान नेहरू नावाचे पुस्तक इत्यादी पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. त्यांचे बहुतांश लेखन जवळपास  १९९० नंतरचे आहे. याशिवाय विविध मान्यताप्राप्त नियतकालिके व वर्तमानपत्रातून ते सातत्याने लेखन करीत आहेत. 

    स्वातंत्र्य, समता, बंधुता, नैतिकता, उदारमतवाद व संविधान इत्यादींचा प्रत्यय त्यांच्या वैचारिक लेखनातून येतो. साहित्य व संस्कृती यावरही त्यांनी भाष्य केले. त्यांच्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणावरून साहित्याकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टी लक्षात येईल. प्रत्येक जातीची संस्कृती वेगळी नसते. अध्यक्षीय भाषणात चपळगावकर म्हणतात, "संस्कृती ही केव्हाही समाजातल्या एखाद्या छोट्या घटकाची नसते. संस्कृतीला जर बळ मिळावयाचे असेल, तर ती समाजाच्या सर्व वर्गाची मिळून बनलेली असावी लागते. तिचे सर्वसमावेशकत्व हाच तिचा प्राण असतो." (  नरेंद्र चपळगावकर, अध्यक्षीय भाषण, २६ वे मराठवाडा साहित्य संमेलन, माजलगाव, प्रतिष्ठान ,संपा. प्रकाश मेदककर, वर्ष ५१, अंक ७ ,४ व ५ डिसेंबर २००४, पृ.२१) आपल्या अध्यक्षीय भाषणातून नरेंद्र चपळगावकर यांनी मराठवाड्यातील मराठी साहित्याबरोबर नैतिक मूल्यांची चर्चा केली. 

      नरेंद्र चपळगावकर यांचे 'कर्मयोगी संन्यासी' हे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. हे चरित्रात्मक पुस्तक लिहिण्यासाठी जवळपास सहा वर्षे त्यांनी काम केले. हैदराबाद संस्थानाच्या विसर्जनात स्वामीजींचे योगदान  वस्तुनिष्ठपणे सांगण्याचा प्रयत्न लेखकानी या पुस्तकाद्वारे केला आहे. लेखकांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम जवळून पाहिला होता. त्यांचे वडील पुरुषोत्तमराव चपळगावकर हे देखील वकील होते. स्वामीजींचे राजकीय सहकारी होते. मराठी, उर्दू व इंग्रजी ग्रंथ अभ्यासून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलाखती घेऊन हा ग्रंथ त्यांनी लिहिला. स्वामीजींच्या व्यक्तिमत्त्वाबरोबरच मुक्तिसंग्रामातील घटनाप्रसंगावर चपळगावकर यांनी प्रकाश टाकला आहे.

          हैदराबाद मुक्तिसंग्रामावर मराठवाड्यातील अनेक लेखकांनी वैचारिक लेखन केले. यात न्या.चपळगावकर यांचा ' कहाणी हैदराबाद लढ्याची ' हा ग्रंथ तितकाच महत्त्वाचा आहे. हैदराबाद संस्थानातील धर्मांतर, आर्य समाजाची चळवळ, हिंदू व मुस्लिमाचे संबंध, उस्मानिया विद्यापीठ व निजाम शासन आदी विषयांवर पुराव्यांसह लिहिताना प्रसंगाचे व व्यक्तीचे मनोवेधक चित्रण लेखकांनी केले आहे. अनंत भालेराव यांचा ' हैदराबादचा स्वातंत्र्यसंग्राम आणि मराठवाडा ' नरहर कुरूंदकरांचे ' हैदराबाद विमोचन आणि विसर्जन ', सुधाकर डोईफोडे यांचे ' प्रतर्दनाचे दिवस ' या लेखन परंपरेत न्या. नरेंद्र चपळगावकरांचा उल्लेख करावा लागतो. चपळगावकर यांचे हे संशोधनात्मक लेखन आहे. हैदराबादच्या पुराभिलेखागारातील फायलींचा आधारही त्यांनी घेतला.

        सामाजिक प्रश्नांच्या दृष्टीने ' तुझ्या माझ्या मनातलं ' हे पुस्तक अभ्यासण्यासारखं आहे. यात वाचकांच्या सद्सदविवेकबुद्धीला ते आवाहन  करतात. राज्य घटनेवरील चिंतनावरून सर्वसामान्य माणसाबद्दलचा कळवळा लक्षात येतो. नरेंद्र चपळगावकर स्वत: न्यायाशीध असल्यामुळे त्यांच्या लेखनाला सत्यता प्राप्त झाली आहे.'

           राज्यघटनेचे अर्धशतक ' व ' कायदा आणि माणूस ' यात संविधानाचे महत्त्व व आवश्यकता विविध अंगाने लेखकांनी विशद केले आहे. सामाजिक न्यायावर त्यांचा विशेष भर होता. ' भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर ' हे पुस्तक त्यांच्या अभ्यासाची साक्ष देते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचा विचार करणारे नव्हते, तर अस्पृश्यांना माणूसकीचे हक्क प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केल्याचे चपळगावकर नमूद करतात. " बहुसंख्य दलितेतर जनतेने बाबासाहेबांना आयुष्यभर केवळ दलितांचा नेता मानले. त्यांचे जीवितकार्य दलितांना माणुसकीचे हक्क मिळवून देणे हेच होते, यात शंका नाही. मात्र त्यांच्या मनात या देशाच्या भवितव्याविषयी जी चिंता सलत असे ही त्यांच्या कृतीतून आणि विचारांतून वेळोवेळी प्रगट झाली आहे." ( नरेंद्र चपळगावकर, भारतीय संविधान आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, द्वितीय आवृत्ती १९९४ )

   डॉ.बाबासाहेबांचे चिंतन काळाच्या पुढचे होते. त्यांच्या चिंतनात देशहित सामावलेले होते. केवळ दलितांचे नेते माणून बाबासाहेबांना मर्यादित करता येणार नाही, असे चपळगावकर यांना वाटते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे हे ज्या महापुरुष व विचारवंतानी सांगितले, त्यात बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. भारतीय अस्पृश्य समाजातील अस्मिता जागविण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तन व मनाने केले. गोंधळलेल्या अवस्थेत संविधानच माणसाला व देशाला तारू शकते. संविधानाची कास प्रत्येकाने धरायला हवी. तरच माणूसकीचे राज्य निर्माण होईल न्या.चपळगावकर यांचे वरील पुस्तक नवोदितांना संविधानांबद्दल जिज्ञासा वाढविणारे आहे.

    मराठी भाषा व साहित्य हा देखील नरेंद्र चपळगावकर यांच्या चिंतनाचा विषय राहिलेला आहे. नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या  समारोप प्रसंगी मार्गदर्शन करताना ते म्हणाले," मातृभाषेत शिक्षण व विचार केल्यामुळे माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यामुळे ज्ञान हे मातृभाषेत उपलब्ध असले पाहिजे. चीन व रशिया सारख्या देशात मातृभाषेतूनच शिक्षण दिले जाते. या देशाने विकासाच्या बाबतीत उत्तुंग अशी भरारी घेतलेली आहे. निजाम काळात देखील विज्ञान उर्दूमध्ये शिकवले जात होते. गोव्यात मराठीची अवस्था वाईट झालेली आहे. कर्नाटकातील सीमाभागात मराठी भाषिकांची कोंडी होत आहे. तेलंगणा व कर्नाटक या राज्यामध्ये मराठी भाषा ही सक्तीची केली गेली. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची केली गेली नसली, तरी मराठीला अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे."  एकंदरीत मराठी शाळेत साधनसामुग्रीची कमतरता आहे.  महाराष्ट्रात अनेक बोली भाषा बोलल्या जातात, पण त्याकडे दुर्लक्ष व्हायला नको. एकच संस्कृती, एकच भाषा असे राज्यघटनेला सुद्धा अपेक्षित नाही असे सांगत त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरू व यशवंतराव चव्हाण यांचे संदर्भही दिले. प्रत्यक्ष कृती न करता मराठी भाषेचा गोडवा गाणाऱ्या राज्यकर्त्यांनी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे भाषण बारकाईने ऐकायला हवे. साहित्य व संस्कृतीशी निगडित  संस्थेत राजकीय लोकांनी हस्तक्षेप करायला नको. त्यांना स्वातंत्र्य द्यायला हवे. एकीकडे अशा संस्थेला स्वायत्तता दिले जाते , परंतु स्वातंत्र्य फारसे दिले जात नाही. याविषयीची खंत या भाषणातून  त्यांनी व्यक्त केली. 

        विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी मराठी साहित्य, राज्यघटना व मुक्तीसंग्राम या क्षेत्राबरोबरच ललित व चरित्रात्मक लेखन करून मराठी साहित्यात महत्त्वाची भर घातलेली आहे. आजवरच्या त्यांच्या एकूण साहित्याची नोंद घेत २०२३ मध्ये वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड झाली. मराठी भाषा, माणूस,साहित्य, संस्कृती व राष्ट्र याविषयी चिंतन करणाऱ्या निष्ठावंत, चारित्र्यसंपन्न, चिकित्सक व जीवन मूल्यांची जोपासना करणाऱ्या ऋषीतुल्य अशा लेखकांची ही निवड म्हणजे प्रामाणिक लेखकांचा गौरव आहे. पद, प्रतिष्ठा व प्रसिद्धीपासून दूर असलेल्या अशा लेखकांविषयीची कृतज्ञता व्यक्त करणे मराठी साहित्य व संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचेच आहे.

                                          

                                            म.ई. तंगावार

                                          ९८९००६५६९०

                                       metangawar@gmail.com

      

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज