हुंदका मनातला

 हुंदका मनातला

(आज जागतिक पुस्तक दिन)

          लेखक का लिहितो? हा मनाला पडलेला प्रश्न वरवरचा वाटत असला तरी तितकाच चिंतनाचा देखील आहे. का वाचावीत पुस्तकं? ग्रंथ हाच माणसाचा गुरू आहे. यासंबंधी नेहमी अनेकजण भाष्य करीत असतात. एखाद्या वेळी वाचण, ऐकण,पहाण,गप्पा मारण खूप सोप आहे, पण लिहिण मात्र तितकं सोपं नाही. लिहिण्यासाठी एक प्रकारची शिस्त लागते. साधना, त्याग, बैठक, एकाग्रता, संवेदनशीलता , निरीक्षण ,कळवळा  व काही प्रमाणात कल्पकता इत्यादी गुण असल्याशिवाय  लेखक लिहू शकत नाही. लेखक स्वतःचा शोध घेत घेत समाजाचा देखील शोध घेतो. मनात जे काही डबकं साचलेल असत त्याला वाट करून द्यावी, या हेतूने लेखक आपली लेखणी चालवितो. लेखनाची काही कार्यशाळा असते का? काहीजण कार्यशाळा घेत असतात. परंतु मला असं वाटत नाही की कार्यशाळेतून लेखक जन्माला येतं असतात. एखाद्या इंजिनियरला वाटलं की आपण आपल्या मुलाला इंजिनियर करावं, तर तो एखाद्या वेळेस करू शकतो. कुठल्याही व्यवसायातील माणसाला जर वाटलं आपण आपल्या मुलाला या व्यवसायात आणावं तर तो आणू शकतो. तो जरी  फार यशस्वी झाला नसला तरी. परंतु एखाद्या कवीला, कादंबरीकाराला व कोणत्याही कलावंतांना जर वाटल की आपण आपल्या मुलाला आता कवी व कादंबरीकार व कलावंत कराव. तर मला वाटते ते शक्य नाही. 

            जीवनात अनुभव सगळ्यांनाच येत असतात, परंतु सगळ्यांना लिहिता येत नाही. याचा अर्थ असा नाही की लिहिणारे ज्ञानी असतात न लिहिणारे संवेदनशील नसतात असे म्हणणे देखील चुकीचे आहे. लेखनाच्या विकासासाठी एक प्रकारचं वातावरण लागत. आणि काही माध्यम देखील लागतात. लेखक एकटा असला तरी तो एकलकोंडा नसतो. सतत आपुलाचि वाद आपणाशी, तुका म्हणे होय मनासी संवाद या वचनाप्रमाणे स्वतःशी संवाद साधत असतो.

        हजारो वर्षांपूर्वीपासून ललित साहित्य लिहिले गेले आहे. आजही तितक्याच मोठ्या प्रमाणात लिहिले जात आहे. प्रश्नाला ,समस्येला वाचा फोडण्याचे काम क्रांतिकारक व समाजसुधारक याप्रमाणे साहित्यिक देखील काही प्रमाणात करीत असतात. साहित्यिकसुद्धा समाज शिक्षकाची ,लोकशिक्षकाची, प्रबोधनकारांची भूमिका पार पाडत असतात. हे मध्ययुगीन काळातील संत साहित्य व स्वातंत्र्यपूर्व काळातील वैचारिक साहित्य पाहिल्यानंतर लक्षात येते. जागोजागी समीक्षकांनी असे लिहिलेले आढळून येते की, लेखक हा असामान्य असतो. हे खर आहे. सामान्य माणसं निसर्गाकडे स्वार्थी दृष्टिकोनातून पाहत असतात. साहित्यिकाचे मात्र तसे नसते. साहित्यिक त्या निसर्गात  सौंदर्याचा शोध घेत असतो. त्यातुनचं बालकवी, बहिणाबाई चौधरी, सुमित्रानंदन पंत, विल्यम वर्डसवर्थ यासारखे कवी जन्माला येतात.शब्दांना आकार देऊन रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे लेखक फार दुर्मीळ असतात.

         साहित्याची भारतीय व पाश्चिमात्य अभ्यासकांनी विविध प्रयोजने सांगितली आहेत. त्यात आत्माविष्कार हे प्रयोजन तरी मला अधिक महत्त्वाचे वाटते. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी ' संत तुकोबांच्या या उक्तीप्रमाणे स्वतःला आलेले अनुभव, विचार व भावना इत्यादीला वाट करून देण्यासाठी लेखक लिहीत असतो. उदरनिर्वाहासाठी अर्थार्जनासाठी देखील लिहिणारे लेखक आहेत, परंतु त्यांची संख्या पाच टक्के देखील नाही.लेखकाला आलेले अनुभव चांगले असतील किंवा वाईट असतील ते इतरांना सांगावेसे वाटते त्याशिवाय त्याला राहावत नाही. हा एक प्रत्येक माणसांचा नैसर्गिक स्वभाव आहे.असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या आनंदाचे, दुःखाचे वाटेकरी कुणीतरी झाले पाहिजेत, याच उद्देशाने माणूस विचारांची देवाणघेवाण करीत असतो.घरातील प्रिय माणसाच्या मृत्यूनंतर घरातील माणसं ,नातेवाईक त्यांच्याविषयीच्या आठवणी सांगत असतात. अश्रूंना वाट करून देतात तेव्हाच कुठेतरी त्यांना हलकं वाटायला लागत.लेखकाचं सुद्धा असंच असतं. अनुभव व निरीक्षणग्रहाच्या शक्तीवर लेखक लिहितो. हे अनुभवसुद्धा वैयक्तिक व सार्वजनिक असतात. श्रेष्ठ साहित्यातील आविष्काराचे नाते सार्वजनिक विश्वात्मक अनुभवाशी असते. भावनेला ,कल्पनेला लेखक कथा कादंबरी, नाटक, कविता  इत्यादी वांग्मय प्रकारातून तर चित्रकार चित्रातून व शिल्पकार शिल्पकलेत तून वाट करून देतो.

        पाश्चिमात्य देशांमध्ये जी क्रांती झाली जो बदल झाला त्याला त्या देशातील लेखक विचारवंत व संशोधक प्रामुख्याने कारणीभूत आहेत. याचा अनुभव भारतातील संत साहित्य व वैचारिक साहित्य अभ्यासल्यानंतर देखील आज लोकांना येत आहे.डॉक्टर जॉन्सन नावाच्या अभ्यासकांनी म्हटले आहे की, प्रत्येक राष्ट्रातील लेखक त्या राष्ट्राचे वैभव असतात. इंग्लंडमधील रसिक वाचकांनी असे म्हटले होते की, वेळप्रसंगी आम्ही आमचा देश विकू पण विल्यम शेक्सपियरची नाटके विकणार नाहीत व कोणाला विकू देणार नाही. ललित साहित्यावर माणसं किती प्रेम करतात याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणून पाहता येईल.

       लेखकाच्या संदर्भात एक मात्र नक्की आहे की लेखकाला प्रतिक्रिया लवकर मिळत नाहीत. वक्त्याच व मंचीय कलावंतांच मात्र तसं नसतं. त्याला तात्काळ प्रतिसाद मिळतो. वक्त्याचे भाषण जेव्हा श्रोत्यांना आवडतं तेव्हा श्रोते टाळ्या वाजून प्रतिक्रिया देतात,पण बोललेले शेवटी हवेत विरून जातं ते चिरकाल श्रोत्यांच्या लक्षात राहतच असं नाही. ते शब्द अक्षर म्हणजे नष्ट होणारे असतात. ते विचार अक्षर असावीत असे वाटत असेल तर लिहावं लागतं.अनेकजण आपल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांना हृदय कोशात ठेवत असतात. त्या पुस्तकाची पारायणे करीत असतात. परंतु लेखकाला पुस्तकाबद्दल अभिप्राय प्रतिक्रिया देत नाहीत. त्यामुळे आपण लिहिलेलं वाचकांना किती प्रमाणात आवडलेला आहे, हे लवकर  लेखकांना कळत नाही. सतराव्या शतकात संत तुकारामांनी मोठ्या प्रमाणात अभंग लिहिले. हे अभंग त्या काळातील लोकांना कळलेच होते असे नाही.उलट तुकोबांना लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला होता. आज त्याच अभंगांना प्रचंड अशी लोकप्रियता मिळाली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव ,संत एकनाथ, संत तुकाराम, संत चोखामेळा , संत जनाबाई आदी संत केवळ प्रवचन व कीर्तन करीत आजच्यासारखी सभा संमेलने घेतली असती तर ते आज विचाररूपाने जिवंत राहिले नसते.आपल्या वाणीला काही संत व समाजसुधारकांनी लेखणीची जोड दिली म्हणून ते शरीर रूपाने गेले असले तरी विचाररूपाने ,संस्काररूपाने आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत. एखाद्या शतकातला श्रीमंत माणूस कोण होता?  असे म्हटल्यानंतर आपल्याला चटकन त्याचे उत्तर देता येतं नाही. परंतु त्या शतकातला साहित्यिक, संत ,विचारवंत कोण होते असे विचारल्यानंतर मात्र आपण सहजपणे त्याचे उत्तर देतो.

        लेखकाला स्वतःबरोबरच इतरांशीही लढाया लढाव्या लागतात. या देशात अनेक लेखकाच्या पुस्तकावर बंदी आणली गेली होती. त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या.सीमाभागावर लढणारी सैनिक देशभक्त असतात हे खरे आहे, पण अनेक क्रांतिकारकांना लढण्याची प्रेरणा देखील लेखणीतून मिळालेली आहे. एकंदरीत विचार, चिंतन व मंथनाची भट्टी पेटल्याशिवाय लेखक लिहीत नाही. परंतु भट्टी पेटवने मात्र अवघड असते. त्यासाठी त्याग करावा लागतो. साधना करावी लागते. वेळ द्यावा लागतो.निबंधकार शिवराम महादेव परांजपे यांनी 'दगडी कोळसा ' या निबंधात भारतीय माणसाची कोळशासी रूपक साधले आहे. ते म्हणतात की, दगडी कोळसा लवकर सापडत नाही. सापडल्यावर लवकर पेटत नाही. एकदा पेटला तर मग लवकर विझत नाही. तसेच भारतीय माणसाचे, लेखकाचे असलेले दिसून येते. काही व्यक्ती खूप प्रतिभावान,कल्पक व संवेदनशील असतात. परंतु आपली आवड ते जोपासत नाहीत. म्हणून त्यांच्या हातून चांगले लेखन वाचकासमोर येते नाही. यामुळे समाजाचे देखील नुकसान होत असताना दिसून येते.

           माणसाला केवळ पोटाची भूक असते असे नाही. तर त्याला ज्ञानाची सुद्धा भूक असते. ही भूक तृष्णा भागवून वाचकांना तृप्त करण्यासाठी साहित्याची गरज आहे. आपण लिहिलेलं साहित्य सर्व वर्गातील लोकांची तृष्णा भागवते असे नाही. असा विचारही लेखकाला करता येणार नाही. माणूस हा स्वप्नाचा सौदागर आहे. जीवनात माणूस अनेक स्वप्न पाहतो त्याच्या पूर्ततेसाठी धडपडत राहतो. परंतु अनेकदा त्याच्या इच्छा-आकांक्षा स्वप्न पूर्ण होत नाहीत. अशा वेळी तो जेव्हा निराश होतो तेव्हा कलाकृती त्याच्या मदतीला धावून येते. एखाद्या कादंबरीतील पात्रासमोर असलेले संकट, दुःख, गरिबी वाचल्यानंतर वाचकालाही वाटत असते की या पात्रइतके संकट तरी आपल्यासमोर नाहीत. मग आपण दुखी का होतो? मला एका विद्यार्थ्याने असे विचारले की. सर मी पन्नास कादंबऱ्या, पंचवीस कथासंग्रह,पंचवीस कवितासंग्रह काही आत्मचरित्र वाचलेली आहेत. मला काय मिळालं?यापासून नोकरी,सत्ता ,संपत्ती, प्रसिद्धी काहीच नाही. मी म्हणालो साहित्य वाचल्यानंतर जे काही मिळतं त्याची तुलना वरील कुठल्याही घटकांशी करता येत नाही. पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर जीवन कसं जगावं ,जीवन प्रवासात संकटांना तोंड कसे द्यावे, हे साहित्य सांगते. 

        लेखकांनी आपण कुठल्या गटात , प्रवाहात मोडणारे साहित्यिक आहोत याचा विचार करू नये. याचे प्रमाण आज फार वाढले आहे.मानवतावादी गटाचा विचार करावा. मराठीत ना.सी.फडके, वि.स.खांडेकर यांच्यापासून कलावाद व जीवनवाद या वादाला सुरुवात झाली. तेव्हापासून त्यांचे अनुयायी निर्माण झाले. खरेतर या वादाला कारण नसताना महत्त्व देण्यात आले आहे. कलावादी समीक्षक म्हणून ओळखले जाणारे मराठीतील प्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक वा.ल.कुलकर्णी कलाकृतीविषयी लिहितात की, कलामूल्यातून कलाकृतीची कलात्मकता ठरविता येते. कलाकृतीचा चांगलेपणा लक्षात येऊ शकतो. पण कलाकृतीची श्रेष्ठत्व तिच्यातील जीवनमूल्यावर आधारित असते.साहित्यातील सखोल व उत्कट जीवनदर्शनातूनच साहित्यकृती श्रेष्ठ ठरत असते. कलावादाचा पुरस्कार करणारी ना.सी.फडके त्या काळात अतिशय लोकप्रिय झाले, हे सत्य नाकारता येत नाही. परंतु त्यांचे साहित्य आज फारसे कोणी वाचत नाही.जीवन आणि साहित्य यांच्यातील संबंध माता आणि तिच्या उदरात वाढणारे गर्भ यांच्यातील संबंधसारखा आहे. जीवनातील विविध कंगोरे पकडणारे, मूल्यावर भाष्य करणारे लेखकच खऱ्या अर्थाने अजर,  अमर, व अक्षर ठरत असतात.

         मनातला विचार दडपून टाकण्याऐवजी प्रकट करायला हवा. यामुळे  मानसिक आजार होणार नाही. यासाठी उत्तम साधन लेखणीच आहे. लिहिणार्‍यांनी डोकं भरविणारी विचार मांडण्याऐवजी मनपरिवर्तन, हृदय परिवर्तन व स्वाभिमान जागा करणारी विचार मांडावेत.नवोदितामध्ये अनेक प्रतिभावंत आहेत. सातत्य, त्याग व जिद्द नसल्यामुळे ते लिहू शकत नाहीत. लिहिलेच तर त्यांच्या साहित्याला मंच मिळत नाही. तसा विचार केला तर या विश्वात अतिशय दर्जेदार असं साहित्य लेखकांनी लिहिलेले आहे. कवी बा.भ.बोरकर यांनी म्हटल्याप्रमाणे 'अमृतघट भरले तुझ्या द्वारी का वणवण फिरशी बाजारी ' अशी अवस्था मात्र वाचकांची झालेली आहे. लेखकांनी खूप लिहिलेलं आहे.आपण डोळे असून आंधळे आहोत.आपल्याकडे दृष्टी नाही. या पुस्तक दिनाच्या निमित्ताने आपण लेखकांचा शोध घेवू ,त्यांचे पुस्तक विकत घेवू ,ते हयात असतील तर वाचल्यानंतर त्यांना आठवणीने प्रतिक्रिया देवू.एवढीच अपेक्षा!


                                       म.ई.तंगावार

                                       ९८९००६५६९०

                            metangawar@gmail.com

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज