मूकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो

 मूकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो

       महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे असे एक महापुरूष आहेत की, ज्यांच्यावर अनेक लेखकांनी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्य लिहिले. ज्यात चरित्र, कविता व समीक्षा इत्यादीचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये आहे.    महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्माआधी लायक असलेल्या नायकाकडे खलनायक, अतिशूद्र म्हणून पाहिले जात होते. खलनायक हे नायकाप्रमाणे जगत होते. जे खरोखरच नायक होते ते अज्ञान व अंधश्रद्धेमुळे किंवा नाईलाजाने पशुतुल्य जीवन जगत होते. तशी परिस्थिती निर्माण केली गेली होती. अशा माणसाचा स्वाभिमान, अस्मिता व तेजस्विता जागृत करण्याचे महान कार्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले. आंबेडकरांमुळेच शोषित वर्गातील लोकांचा मूकस्वर मुक्तस्वर झाला. व मूकनायक असलेले मुक्तनायक झाले. विश्वात असे मोजकेच समाजसुधारक, महापुरुष व विचारवंत आहेत की, ज्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. डॉ. बाबासाहेबांची विचारधारा डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व विशेष करून साहित्याच्या क्षेत्रात दलित साहित्य व समीक्षकांनी जी भरारी घेतलेली आहे, ते पाहिल्यास असे वाटते की, खरोखरच डॉ.बाबासाहेबांना अगदी मनातून लोकांनी स्वीकारले.

      डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुद्ध भारत ही नियतकालिके सुरू करून सर्वसामान्य माणसांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम केले. तार्किकता, रोखठोकपणा व विज्ञाननिष्ठा तसेच सर्वसामान्य माणसाविषयी कळवळा हे बाबासाहेबांच्या लेखनाचे व कार्याची बलस्थान होते. बाबासाहेब आंबेडकरावर अनेकांनी ग्रंथ लिहिले आहेत. विविध भाषेत लाखो ग्रंथ बाबासाहेबावर लिहिले गेले. मराठी भाषेतसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशा ग्रंथांची निर्मिती झाली, परंतु डॉ.गंगाधर पानतावणे यांनी मूकनायक नावाचे एकोणसाठ पृष्ठांचे  जे चरित्र लिहिले,ते मुळात वाचण्यासारखे आहे.

       डॉ. गंगाधर पानतावणे हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे साहित्यिक व समीक्षक म्हणून ओळखले जातात. अमेरिका येथील सनहोजे येथे झालेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पत्रकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर या विषयावर त्यांनी आपले संशोधन केले. वादळाचे वंशज, विद्रोहाचे पाणी पेटले आहे, लेणी, मूल्यवेध, चैत्य, दलित वैचारिक वांग्मय इत्यादी अनेक ग्रंथ त्यांचे प्रकाशित आहेत. एक विचारवंत, अस्मितादर्श चळवळीचे सर्वेसर्वा म्हणून गंगाधर पानतावणे हे ओळखले जातात. जवळपास पन्नास वर्षे अस्मितादर्श नियतकालिक गंगाधर पानतावणे यांनी चालविले. यात अनेक दलित ग्रामीण  लेखकांची जडण-घडण झाली. अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या माध्यमातून गंगाधर पानतावणे यांनी परिवर्तनवादी साहित्य लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. गंगाधर पानतावणे यांनी १९७८ झाली मूकनायक नावाचे छोटे पुस्तक लिहिले. खरे तर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक पातळीवरचे चरित्र आहे. एखादे चरित्र वैचारिक असूनही प्रासादिक असू शकते,याचे उत्तम उदाहरण म्हणून या चरित्राकडे पाहता येईल. कमी शब्दांमध्ये सर्वांना समजेल अशा भाषेत परिपूर्ण असे विवेचन करण्याचा प्रयत्न गंगाधर पानतावणे यांनी मूकनायक या चरित्रात्मक पुस्तकांच्या माध्यमातून केलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे क्रांतिकारी तत्वज्ञान अहर्निशपणे रुजविण्याचे काम गंगाधर पानतावणे यांनी केले. अतिशय कमी शब्दात चिकित्सकपणे अनेक संदर्भ देत पुराव्यासहित हे पुस्तक लिहिले. एकदा वाचल्यानंतर कदाचित भूक भागणार नाही. हे पुस्तक अनेकदा वाचावेसे वाटते, इतके ते मौलिक आहे.

     डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा  नागपूरच्या भूमीवर दीक्षा घेतली, तेव्हा तेथील वातावरण कसे होते, याचे वर्णन डॉ. गंगाधर पानतावणे यांनी केले आहे ते वाचूनच खरंतर मी दसऱ्याच्या दिवशी पवित्र अशा दीक्षाभूमीवर जाऊन तेथील आनंदमय चैतन्यमय सोहळा डोळे भरून पाहिलो. या दीक्षाभूमीवर जिकडे पाहावे तिकडे ग्रंथाचे स्टॉल प्रत्येकाच्या हातांमध्ये ग्रंथ दिसत होते. हा संपूर्ण दिवसभराचा सोहळा खरोखरच मला प्रेरणादायी वाटला. तो संपूर्ण दिवस आजही माझ्या डोळ्यासमोर उभा आहे. मुळात तिथे जाण्याचीच जी प्रेरणा आहे, ती मला या ग्रंथामुळे मिळाली. म्हणून या ग्रंथाविषयी आपल्याशी संवाद साधावा या उद्देशाने केलेले  थोडेसे चिंतन.

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे समर्पक मूल्यमापन औचित्याची हानी होऊ न देता डॉ.पानतावणे यांनी साधक-बाधक पद्धतीने मूकनायक या ग्रंथाद्वारे केले.  मनोगतात डॉ. पानतावणे दुसऱ्या,तिसऱ्या व चौथ्या आवृत्तीच्या निमित्ताने पुस्तकाच्या व महामानवा संदर्भात लिहितात, "मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व विचारांचे दर्शन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुन्हापुन्हा अभ्यासावा म्हणजे खूप काही नवनवे गवसते. अहंकार गळून पडतो. जीवनाला भक्कम अशी दिशा येते.मानवी स्वातंत्र्याचा अर्थपूर्ण व पूर्ण विचार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या महापुरुषांचे संघर्ष हे दुसरे नाव. हा संघर्ष परिवर्तनाचा, नव्या मानसिकतेचा दास्यमुक्ततेचा,प्रबळ इच्छाशक्तीचा, मूल्यधारणेचा वाहक आहे.मानवी स्वातंत्र्याचा नवा इतिहास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावापासून सुरू होतो. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा मूकनायक हा एक आलेख आहे. डॉ. बाबासाहेबांच्या जीवन चरित्राबरोबरच विचारचरित्राचा आलेख मूकनायक मध्ये आहे. "

      मूकनायक हा चरित्रात्मक ग्रंथ आधी कळस मग पाया या वचनाप्रमाणे लिहिला गेला की काय असे सुरुवातीला वाटायला लागते. कारण सुरुवातीलाच डॉ. पानतावणे यांनी डॉ.आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा कशामुळे घेतली, याचे वर्णन केले आहे. मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. अशी प्रतिज्ञा करुन त्याची पूर्तता जी बाबासाहेबांनी केली. त्याचे उत्तर त्यांच्याच भाषेत सांगावयाचे झाल्यास आम्हाला सन्मानाने जगायचे आहे. बुद्ध धम्माने आम्हाला सन्मान दिला आहे.जीवनाचा सत्यार्थ सांगितलेला आहे आणि म्हणून माणसांना गुलाम म्हणून वागविणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करीत आहोत.  हिंदू धर्मात जातीयता, श्रेष्ठ-कनिष्ठता इत्यादी मानवनिर्मित विषमता निर्माण झाली. सामान्य माणूस ऊस चरखातून पिळुन बाहेर पडावा तसा पिळला जात होता.त्यामुळे चौदा ऑक्टोबरची क्रांतिकारी सकाळ दलितांच्या जीवनात उगवली होती. हा दिवस म्हणजे नवे जीवनगाणे व मानवतावादाने दिलेली हाक असल्याचे डॉ.पानतावणे सांगतात. स्वातंत्र्य,समता व बंधुता ही तत्त्वे फ्रेंच राज्यक्रांतीने नाही, तर महात्मा गौतम बुद्धाची ती देणगी आहे. जगाला शांतीचा संदेश देण्याचे सामर्थ्य गौतम बुद्धांच्या विचारात आहे. त्यामुळे आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. कारण आंबेडकरांना युद्ध नको बुद्ध हवा होता. बुद्धांच्या विचारांचा प्रचार झाल्यानंतर युद्धाचा प्रश्नच येत नाही.

       ज्ञानसत्ता ही फार मोठी सत्ता असते. ज्ञानामुळे माणसाची सुटका कशी होते, माणूस स्वाभिमानाने कसा जगायला लागतो हे आंबेडकर व त्यांच्या अनुयायांयाकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. डॉ.आंबेडकर शिक्षणप्रेमी व पुस्तकप्रेमी कसे होते. या वरील भाष्य लेखकानी उदाहरणादाखल त्यांचेच विचार देऊन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आजच्या तरुणासारखे अमेरिकेत शिक्षण घेऊन अमेरिकेचे गुणगान करण्यासाठी अमेरिकेला गेले नव्हते. चैन करण्यासाठी , त्यांचे अनुकरण करण्यासाठी,  केवळ पदवीसाठी बाबासाहेब गेले नव्हते. तर ज्ञानाचा काठोकाठ भरलेला प्याला प्राशन करून पूर्वजांचे ऋण फेडण्यासाठी ते गेले होते. तेव्हा त्याने बोटीत पाय ठेवला तेव्हा तो दिवस तरी दलितांच्या जीवनाचा सोने  करणारा असल्याचे पानतावणे नमूद करतात. जातीयता हा तर भारताला लागलेला कलंक आहे. भारतीय मन विषमताग्रस्त आहे. येथील माणूस त्या माणसांचा मन क्षणाक्षणाला विषमता जपते. नव्हे तर भारतातील हिंदू लोकांचा पायाच विषमतेवर आधारलेला आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.महाविद्यालयातील ग्रंथाच्या राशीनी ज्यांनी ज्ञानतृष्णा भागविली,त्यांना निसर्गाने निर्मिलेली पाणी पिता येत नाही. ही खंत चरित्रकारांनी व्यक्त केली आहे. हिंदू समाजव्यवस्थेत अस्पृश्यता टोकाची आहे. उच्चवर्णीयांच्या मक्तेदारीमुळे व्यवस्थेमुळे इथला दलित भरडला जात आहे. पात्रता असूनही पायरीवर बसावे लागते. शिखरावर जाता येत नाही. यासंदर्भात डॉ.आंबेडकर यांनी इसवी सन १९२० मध्ये मूकनायक हे पाक्षिक सुरु केले. त्यातील ३१ जानेवारीच्या अंकातील त्यांचे विचार पानतावणे उद्धृत् करतात.

  " हिंदू समाज हा एक मनोरा आहे व एक एक जात म्हणजे एक एक मजलाच होय. पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की मनोर्‍यात शिर्डी नाही आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाही. ज्या मजल्यावर त्यांनी जन्मावे त्याच मजल्यावर त्यांनी मरावे. खालच्या मजल्यावर इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यावर प्रवेश नाही व वरच्या मजल्यावर माणूस मग तो कितीही नालायक असो त्याला खालच्या मजल्यावर लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाही. "  स्वार्थी माणूस वरच्या मजल्यावर वेगळ्या मार्गाने जाऊन जागा निर्माण करतात खालच्या माणसाचा कधीच विचार करीत नाहीत. परंतु महामानव आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी या उक्तीप्रमाणे खाली येऊन तेथील माणसाला वरच्या मजल्यावर घेऊन जातात. गावात एखादं वानर जेव्हा झाडावर उंच जाऊन बसतो तेव्हा त्याला हाकलायला अवघड जाते. वरच्या मजल्यावरची माणसं याच वृर्तीची आहेत की काय?या देशात ज्ञानवंत, गुणवंत व किर्तीवंत यांचा विचार होत नाही.  धनवंताचा  विचार होतो. हे  अमानवी नाही का? ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले त्यांच्याशी लढताना तितका त्रास झाला नाही. भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटून गेली अजूनही येथील माणसासोबत लढणे अवघड जात आहे. प्रज्ञासूर्य या संपादित पुस्तकाच्या मनोगतात डॉ.शरणकुमार लिंबाळे लिहितात, " परकीयांविरुद्ध लढण खूप सोप असतं. कारण सर्व स्वकीय पाठीशी असतात. पण स्वकियाविरूध लढणं खूप अवघड असतं. चले जाव ची घोषणा केल्यानंतर उभा भारत महात्मा गांधीच्या पाठीशी उभा राहिला. पण याच महात्म्याने जेव्हा स्वकीयांना सूनवायला सुरुवात केली तेव्हा एका भारतीय माणसानेच गांधींचा वध केला. "

      डॉ. गंगाधर पानतावणे यांनी मनुस्मृती दहन, हिंदू कोड बिल, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, स्वतंत्र मतदारसंघ, महाड सत्याग्रह, नियतकालिका चालू करण्यामागची त्यांची भूमिका, एक अर्थशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब कसे होते, इत्यादी सर्व विषय वस्तुनिष्ठपणे तितक्याच सक्षमपणे हाताळले आहेत. बाबासाहेबांची सर्वच लढ्यामागची भूमिका ही एक हक्क संघर्षाची कशी होती, हे पानतावणे यांनी दाखले देत दाखवून दिले आहे. या ग्रंथाची भाषा वाचकांना सहज लक्षात येण्यासारखी आहे.' यात्रेला यावे तसा माणसांचा समूह दीक्षाभूमीवर उसळत होता. ' अशा प्रासादिक वर्णन कौशल्यामुळे हा ग्रंथ चित्तवेधून घेतो.

       चरित्र लेखनामध्ये व्यक्तिचित्रण, प्रसंगचित्रण, संवाद, आटोपशीरपणा, सत्यता विश्वसनीयता, साधीसरळभाषा , नाट्यमय कलाटणी,वर्णन कौशल्याची शैली, वास्तव समाजचित्रण, सुसंगतता, सूक्ष्म मार्मिकदृष्टी इत्यादी हे गुण महत्त्वाचे असतात. चरित्र लेखनासाठी आवश्यक असलेले गुण डॉ. पानतावणे यांच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळतात. वस्तुनिष्ठता ,चिंतनशीलता ,समतोलपणा अल्पाक्षररमणीयता, उत्कंठा वाढविणारी अवतरणे , औचित्यपूर्ण मांडणी,  कळवळा,आंबेडकरावरील निष्ठा, संयमशील विद्रोह इत्यादी वैशिष्ट्य या चरित्रात्मक ग्रंथाचे सामर्थ्य आहे.  ' थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. ' असे एका कवीने म्हटले आहे. महामानवांची चरित्रे राष्ट्राची संपत्ती असतात.

      डॉ. बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रात्रंदिवस साधना केली.संपूर्ण जीवनच त्यांनी बाबासाहेबांच्या विचारासाठी दिले.  अशा विचारवंतानी लिहिलेले चरित्र असल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला तरी या ग्रंथात कुठे दोष दिसून येत नाहीत. कंटाळवाणा होईल असे वर्णन कुठेच नाही. हा ग्रंथ वाचत असताना प्रत्येक माणूस अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही. हा ग्रंथ म्हणजे चिंतनरुपी मंथनाचा सार आहे. डॉ.गंगाधर पानतावणे यांचे समाजशास्त्र, धर्म, संस्कृती, इतिहास, मानसशास्त्र व वर्तमानकाळाचे सम्यक आकलन असल्यामुळे हा ग्रंथ प्रभावी वाटतो. पाण्याच्या लाटावर लाटा यावेत अशी सहजपणे संदर्भ पुरावे देत चरित्रकार पुढे निघून जातात. अर्धसत्य माहिती सांगत सोयीचे पुरावे चरित्रकारांनी निवडले नाहीत.घटनेतील बाह्यरंगापेक्षा पानतावणे अंतरंगावर प्रकाश टाकतात.डॉ.बाबासाहेबांविषयी असलेली आत्मीयता, जिव्हाळा व कृतज्ञतेची भावना या ग्रंथात पानापानावर पहावयास मिळते. आज अशा ग्रंथांची पारायणे करण्याची खरी गरज आहे.महावृक्ष कोसळल्यावर त्याच्या आश्रयाने राहणाऱ्या अगणित पक्ष्यांची रानभेदी अवस्था व्हावी तसे  बाबासाहेबांच्या निर्वाणाने झाले. असे पृष्ठ क्रमांक ४० वर गंगाधर पानतावणे लिहितात. परंतु रानभूल पडलेल्या  माणसाला मूकनायक सारखे ग्रंथ निश्चितच दिशा व विसावा देतात ,यात तिळमात्र शंका नाही. बाबासाहेब जन्माला आले नसते तर काय झाले असते, हे सांगत त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतांना ग्रंथाच्या शेवटी लिहितात,

     बाबासाहेब नसते तर

     कुणी संघर्षाची बीजे रुजविले असते 

     कुणी वेदनेवर फुंकर घातली असती

    धेयाचा तारा कोणी दाखविला असता 

    कुणी आयुष्याला मोल दिले असते

    कुणी मुक्त श्वास दिले असते

    मानवी स्वातंत्र्याचा अर्थ 

    कोणी सांगितला असता       

    विद्रोहाचा सूर् कुणी दिला असता

    कुणी जोडले असते मानवी संस्कृतीला

   इतिहासाचे नवे पान 

   १४ऑक्टोबर १९५६ ची सुंदर प्रसन्न सकाळ 

   दलितांच्या जीवनात कुणी निर्माण केली असती

   बुद्ध धम्म आणि संघाचा पावनघोष

    या भूमीत कुणी निनादित केला असता

   मूकनायक युगायुगातून एकदाच जन्माला येतो

   कारुणिक युगायुगातून एकदाच जन्माला येतो

   डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव 

   युग एकदाच धारण करते.

         

                                   म.ई.तंगावार

                                  ९८९००६५६९०

                           metangawar@gmail.com

Comments

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज