सत्यअसत्याशी मन केले ग्वाही

 सत्यअसत्याशी मन केले ग्वाही

आज ' तुकाराम बीज ' त्यानिमित्त...

    वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराजांचे स्थान अनन्यसाधारण स्वरूपाचे आहे. या संप्रदायाची लोकप्रियताच संत तुकारामामुळे वाढली, हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही. एखादे दैवत व गुरूचा नावलौकिक  शिष्यामुळे होतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून संत तुकारामादी संतांचे देता येईल.संत तुकारामांचे व्यक्तिमत्व व साहित्य म्हणजे महाराष्ट्रातल्या वैचारिक, प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले एक महत्त्वाचे दस्तऐवज म्हणता येईल. तुकोबांनी लेखणीद्वारे प्रवाहाच्या विरोधात जाऊन वाटचाल केली.  'बुडती हे जन न देखवे डोळा ' या संवेदनेतून तुकोबांच्या अभंगाची निर्मिती झाली.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातच नाही, तर भारतात व परदेशात ही तुकोबांचे विचार पोहोचले. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल समजून कार्य करत राहण्याचा समंजसपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळेच तर तुकोबा आकाशाएवढे झाले. सज्जनांच्या संदर्भात मेणाहून मऊ होणारे तुकोबा दुर्जनांच्या संदर्भात मात्र वज्राहून कठोर होतात. एक संत, कवी, सुधारक,विचारवंत व लोकशिक्षक म्हणून तुकोबांचे विचार व कार्य अजर, अमर व अक्षर स्वरूपाचे आहे.

       संत तुकारामांनी सतराव्या शतकात विपूल प्रमाणात अभंगाची  निर्मिती केली. त्यांच्या नावावर जवळपास पाच हजार अभंग आहेत. कवी जन्मावा लागतो त्यांना घडविता येत नाही, असे जे म्हटले जाते ते तुकोबांच्या बाबतीत चुकीचे ठरते. तुकोबाकडे प्रतिभा होतीच, परंतु तुकोबांनी समाजाचे सूक्ष्म निरीक्षण करून प्रयत्नांची पराकाष्टा केली. लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वैचारिक क्रांतीला खऱ्या अर्थाने तुकोबापासून सुरुवात झाली. कारण चांगल्या सुखवस्तू कुटुंबातून बाहेर पडून तुकोबा संघर्षाचा रस्ता पकडतात. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण व अनुभवातून तुकोबांनी अभंगांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या अंगाला लोकोक्तीचे स्वरूप प्राप्त झाले. तुकोबांचे अभंग म्हणजे एका अर्थाने अनुभवाचे खडे बोलच आहेत. तुकोबांच्या पूर्वी चार पाचशे वर्षांपूर्वी अभंगाची रचना वारकरी संप्रदायात झाली. तरीही ' अभंग तुकयाची ' असेच म्हटले जाते. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचे मूल्यमापन करताना ' तुका झालासे कळस ' असा गौरव तुकोबांचा केला आहे. संत तुकारामांचे बालपणीचे मित्र संताजी जगनाडे यांनी तुकारामांचे लेखनिक म्हणून काम केल्याचा उल्लेख केला जातो. आधुनिक काळात तुकोबांचे चरित्र व कार्य यावर नाटक, कादंबरी, चित्रपट, बालनाट्य व समीक्षा मोठ्या प्रमाणात लिहिले गेले आहे. कीर्तनकार मोठ्या प्रमाणात आजही तुकोबांच्या अभंगावर कीर्तन करून समाजाचे प्रबोधन करीत आहेत. त्यांचे काही अभंग हिंदीबरोबरच इंग्रजीतही अनुवादित झाले आहेत.तुकोबांच्या अभंगात वेगवेगळ्या जाणिवा व्यक्त होतात. स्त्री, शेतकरी, दीनदुबळ्यांचे दुःख, ढोंगी, चंगळवादी, भोगवादी समाजाचे चित्रण दृष्टांतासह  तुकोबांनी केले आहे. उपदेश हा तर संत तुकोबांच्या अभंगांचा  आत्माच आहे. 

     तुकोबा इंद्रायणी काठावर असलेल्या देहू परिसरात ज्या ठिकाणी राहत होते, त्या परिसरात भंडाऱ्या (भंडारदरा), भामनाथ सारखी डोंगरे होती. याच परिसरात संत वांग्मयाची बालपणापासून त्यांनी साधना केली. तुकोबांनी ज्ञान व भक्तीला व्यवहाराचे अधिष्ठान दिले. तुकोबांचा एखादा अभंग किंवा एखादा चरण माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. सापडलाच तर त्याला मराठी माणूस तरी कसे म्हणता येईल? एकंदरीत आजच्या या धावपळीच्या काळात मानवतावादी मूल्य रूजविण्यासाठी पुन्हा तुकोबांच्या अभंगाचे चिंतन करणे काळाची गरज वाटते.

         तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला.त्यांचे घराणे(कूळ,वंश)मोरे क्षत्रिय तर आडनाव अंबिले. तुकोबांचा काळ इसवीसन सोळाशे आठ ते सोळाशे पन्नास असा मानला जातो. तुकोबांचे निर्वाण दिन हा ' तुकाराम बीज ' या नावाने ओळखला जातो. तीनशे वर्षापूर्वी तुकारामांची पूर्वज विश्वंभरबुवा देहू या गावी स्थाईक झाले. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई (कन्हाबाई). तुकोबांचे मोठे भाऊ सावजी तर छोटे भाऊ कान्होबा. तुकोबांची पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाई (आवली). तुकोबांना चार अपत्य होते. महादेव, विठोबा, नारायण व भागूबाई. तुकारामांचे घराणे सात्विक होते. वारकरी संप्रदायाची भक्ती परंपरा सुरुवातीपासूनच त्यांच्या घराण्यात होती. विठ्ठल हा या घराण्याचा आराध्य दैवत होय.

           तुकोबा सोळा ते वीस वर्षाची झाले असताना त्यापूर्वीच तुकोबांचे आई-वडील कालवश झाले. मोठ्या भावाच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांचा वाण्याचा व्यवसाय हळूहळू बंद झाला. त्याच काळात मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला. देहू येथील मंबाजी सारख्या बुवांनी तुकोबांना त्रास द्यायला सुरुवात केली. तुकोबांनी 'वेदांचा तो अर्थ आम्हासीस ठावा… ' असे सांगत तत्कालीन पंडिताना एक प्रकारचे आव्हाणचं दिले होते. तुकोबांच्या पूर्वी देखील अनेक संतांनी अभंगाची रचना केली होती त्यांचे अभंग मात्र बूडविण्याचा प्रयत्न कोणी केला नव्हता. असे सांगितले जाते की, रामेश्वर भट्टनी तुकोबांच्या अभंगाच्या वह्या इंद्रायणीत बुडविल्या. पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा त्यांनी शिष्यत्व पत्करले.अभंग व कृतीद्वारे तुकोबांनी पंडित व दूर्जनावर आसूड ओढले होते, त्यामुळे त्याचा त्रासही त्यांना झाला. कारण तुकोबा परिवर्तनवादी व बंडखोर संत होते.

            संत तुकारामांचे जीवनच संघर्षमय होते. दुष्काळात पत्नी पाठोपाठ तुकोबांच्या मुलाचा मृत्यू झाला. दुष्काळ भयंकर होता.इंद्रायणीत पाणी नव्हते.गुर ढोरच नाही, तर माणसे देखील मरत होती. त्यातच पटकीची साथ आली. अशाप्रकारे अंतर्बाह्य संघर्ष तुकोबांना करावा लागला. तुकोबांचा संघर्ष हा कुटुंबाशी,समाजाशी, काही व्यक्तीशी व वेगळ्या विचारसरणीतील लोकांशी होता. 

      संत तुकाराम कालांतराने भजन, कीर्तन व लेखन याकडे वळले.असे म्हटले जाते की,  त्यांना स्वप्नदृष्टांत झाला. स्वप्नात गुरूने बाबाजी नाव सांगितले व तुकोबांना ' रामकृष्णहरी ' हा मंत्र दिला. तुकारामांचे गुरू केशवचैतन्य (बाबाजीचैतन्य) तर शिष्य संत निळोबा, संत बहिणाबाई. वारकरी संप्रदायातीलच नव्हे, तर मराठी साहित्यातील कोहिनूर म्हणून तुकोबाकडे पहावे लागेल. वारकरी संप्रदायात ' जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ' या ओळीचा जयघोष केला जातो. तुकोबांच्या अभंगात विविध क्षेत्रातील लोकांना प्रेरणा बळ देण्याची सामर्थ्य आहे. विशेषतः व्यवहारातील व विचारातील सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे तुकोबांच्या अभंगात मिळतात.एका अर्थाने चिरंतन अशा मानवी मूल्यांचे दर्शन त्यांच्या अभंगातून घडते. तुकोबांचे विचार, चिंतन स्वतंत्र व वर्तमानकाळाशी सुसंगत आहेत.आजही ते विचार प्रासंगिक ठरतात.  तुकोबांच्या अभंगाला विवेकाचे अधिष्ठान आहे. मराठी भाषा व साहित्य,विचार व संस्काराचे वैभव म्हणून तुकोबांच्या अभंगाकडे पाहता येईल. तुकोबांची जडणघडण ज्या परिस्थितीत झाली, त्यावेळेसचे वास्तव काय होते? त्याचे प्रत्यक्ष  प्रतिबिंब त्यांच्याच खालील अभंगातून उमटलेले आहे.

    " याती शुद्ध वंश (वैश्य) केला वेवसाव l 

       आदि तो हा देव कुळपूज्य l l १ l l

       नये बोलो परी पाळीले वचन l l

       केलियाचा प्रश्न तुम्ही संती l l धृ.l l 

       संवसारे झालो अतिदु:खे दुखी l 

       मायबाप सेखी क्रमिलिया l l २ l l 

       दुष्काळे आटिले द्रव्य नेला मान l  

       स्त्री एकी अन्न अन्न करिता मेली l l ३ l l

       लज्जा वाटे जीवा त्रासलो या दु:खे l 

       वेवसाय देखे तुटी येता l l ४ l l

       देवांचे देऊळ होते ते भंगले l 

       चित्तासी जे आले करावसे l l ५ l l

       आरंभी कीर्तन करी एकादशी l 

       नव्हते अभ्यासी चित्त आधी l l ६ l l

       कांही पाठ केली संतांची उत्तरे l

       विश्वासे आदरे करोनिया l l ७ l l

       गाती पुढे त्यांचे धरावे धृपद l

      भावे चित्त शुद्ध करोनिया l l ८ l l

      संताचे सेविले तीर्थ पायवणी l

      लाज नाही मनी येऊ दिली l l ९ l l

      टाकला तो कांही केला उपकार l

      केले हे शरीर कष्टवूनि l l १० l l

      वचने मानिले नाही सुरुदांचे l 

      समूळ प्रपंचे वीट आला l l ११ l l

      सत्यअसत्याशी मन केले ग्वाही l

      मानियेले नाही बहुमता l l १२ l l

      मानियेला स्वप्नी गुरूंचा उपदेश l

      धरिला विश्वास दृढ नामी l l १३ l l

      यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ती l

      पाय धरिले चित्ती विठोबांचे l l १४ l l

     निषेधाचा काही  पडिला आघात l

     तेणे मध्ये चित्त दुखविले l l १५ l l

     बुडविल्या वह्या बैसलो धरणे l

     केले नारायणे समाधान l l १६ l l

     विस्तारी सांगता बहुत प्रकार l

     होईल उशीर आता पुरे l l १७ l l

    आता आहे तैसा दिसतो विचार l

    पुढील प्रकार देव जाणे l l १८ l l

    भक्ता नारायण नुपेक्षी सर्वथा l

    कृपावंत ऐसा कळो आले l l १९ l l

    तुका म्हणे माझे सर्व भांडवल l

    बोलविले बोले पांडुरंगे l l २० l l "

(अभंग संदर्भ : श्री तुकारामबाबांच्या अभंगाची गाथा, शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, १९७३,अभंग क्र.१३३३, पृ.२३३)

                           म.ई.तंगावार

            श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर जि.लातूर

                          भ्र.९८९००६५६९०

                        ईमेल: metangawar@gmail.com


Comments

  1. Replies
    1. सुंदर लेखनातून विनम्रपणे आदरांजली....
      संत तुकाराम बीज..। तुकोबांनी मानवसृष्टीतून बीजे केलेला दिवस.संत शिरोमणी, जगद्गुरु, महान विचारवंत,कवी, संत तुकाराम यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्रपणे आदरांजली प्रकट करणारा व आदरभाव व्यक्त करणारा अतिशय सुंदर लेख...

      विठ्ठल जंबाले

      Delete
  2. Jana subhash shelhale
    Khup
    Chan ahe sir mahiti
    Dhanyawad sir

    ReplyDelete
  3. संत तुकाराम बीज.
    निमित्ताने लिहिलेला उत्तम लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज