आई मला फुलू दे !

आई मला फुलू दे !


पथनाटय संहिता - म.ई.तंगावार


गर्भ :    मला वाचवा ! वाचवा !!

वाचवा !!! (दोन वेळा)डॉक्‍टर साहेब, आई, बाबा, महाराज मला वाचवा ! वाचवा ! ! वाचवा ! ! !

भारूडकार : ये काय झालं गं? का ओरडतेस तू  ?

गर्भ : महाराज  मी स्‍त्री आहे म्‍हणून मला उमलू, फुलू द्यायचं नाही, असं सर्वांनी ठरवलं आहे. फक्‍त माझे बाबा तेवढं सहकार्य  करतात मला. तुम्‍ही सांगा ना समजावून  त्‍यांना. (सगळेजण येतात)

भारूडकार    : अहो सगळयांचं  तुमचं  काय चालू आहे ? थांबा... थांबा... थांबा....

पहिले नमन माझे जनाईला (कोरस)

दुसरे नमन माझे मुक्‍ताईला (कोरस)

तिसरे नमन माझे सावित्रीला (कोरस)

चौथे नमन माझे रमाईला (कोरस)

पाचवे नमन माझे बहिणाबाईला (कोरस)

या सा-यांनी फुलविला मळा 

चला हो वंदन  करूया त्‍यांना.(दोन वेळा)

ऐका,(तीन वेळा) स्‍त्री पूर्वीही कमी नव्‍हती, आजही नाही. ‘डोईचा पदर आला खांद्यावरी/ भरल्‍या बाजारी जाईन मी’ अशा प्रकारचं  बंड मध्‍ययुगीन काळात जनाईनं पुकारलं होतं. लहान असूनही मुक्‍ताबाईने ‘तुम्‍ही तारूनि  विश्‍व तारा| ताटी उघडा  ज्ञानेश्‍वरा’असा उपदेश  संत  ज्ञानेश्‍वराला केला होता. सर्व हाल अपेष्‍टा सहन करून सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं. स्‍वतः चंदनाप्रमाणे झिजून बाबासाहेबांना ध्‍येय गाठण्‍यासाठी हातभार लावणारी रमाई.  कुठल्‍याच शाळेत न जाता जीवनाचं क्रांतिकारक तत्‍वज्ञान सांगणारी बहिणाबाई चौधरी. यासारख्‍या अनेक स्‍त्रीयांचा समाजाच्‍या जडणघडणीत  वाटा आहे.

    आधुनिक  काळातील मुक्‍ता साळवे, राणी लक्ष्‍मीबाई, आनंदीबाई  जोशी, मदर तेरेसा, कल्‍पना चावला,सिंधूताई सपकाळ, मेघाताई पाटकर, पी.टी.उषा, लता मंगेशकर, किरण बेदी अशा कितीतरी स्‍त्रीयांची नावं  सांगता येतील की, ज्‍यांनी जीवन जगताना स्‍वतःचं अस्तित्‍व निर्माण केलेलं आहे. यांनी आपल्या कुटुंबाचं व देशाचं मान उंचावलेल आहे.थांबा स्‍त्रीला फुलण्‍यापूर्वीच खुडू नका.

गर्भ : आई ! स्‍त्री असून,तू असा विचार का करतेस?हे विश्व किती सुंदर असेल गं आई ! या रोपटयाचं काही महिन्‍यातच  वटवृक्षात  रूपांतर  होईल. त्‍यामुळे  आई  मला उमलू दे, फुलू दे. मला या विश्‍वाचं दर्शनं  घ्‍यायचं  आहे. डोळे भरून विश्‍वाला पहायचं आहे. किती विविधतेने नटलेले असेल ग आई हे विश्‍व ?

आई    : नाही पोरी तुला मी फुलू देणार नाही. मुलगी म्‍हटलं की, आली जबाबदारी, परक्‍याचं धन, डोक्‍यावरचं ओझं, यात काय खोटं आहे.

गर्भ : आई ! असा विचार तुझ्या आईनं केला असता तर तू जन्‍माला आली असतीस का ? अगं स्‍त्री आहोत म्‍हणून काय झालं ?  आपल्‍यालाही भावना, इच्‍छा, आकांक्षा, स्‍वप्‍न आहेतच ना ! नको करू माझ्या स्‍वप्‍नांचा चुराडा. मला उमलण्‍याआधीच खुडू नकोस, बाबा सांगा ना समजावून आईला तुम्‍ही ! तुमची पत्‍नी आहे ना ती!

बाबा    : पोरी, माझ्या  व तुझ्या आईला काय सांगावं ? स्‍त्रीचं आज स्‍त्रीला स्‍वीकारायला तयार नाही. यापेक्षा मोठी  शोकांतिका काय असू शकते? स्‍त्री स्‍त्रीचा सन्‍मान तरी कुठे  करीत आहे ? शहरातील सुशिक्षित  महिला तर भ्रूणहत्‍या करण्‍यात  आघाडीवर आहेत. ग्रामीण भागात हे चित्र दिसत नाही. बरं झालं शासनाने कडक कायदा केला. आज मुलींच्‍या टक्‍केवारीत वाढ होत आहे.

गर्भ :डॉक्‍टर साहेब, तुम्‍ही तर सांगा माझ्या आईला समजावून. तुमच्‍या हातून  हे वाईट कृत्‍य, पाप करू नका.

डॉक्‍टर : नाही पोरी, हा दोष कोणाचा ? लिंग चाचणी करणा-या डॉक्‍टरांचा, मातेचा, नव-याचा,आई-वडिलांचा, सासू-सास-यांचा की समाजातील मानसिकतेचा ? मूल अपंग होऊ नये याची काळजी घेण्‍यासाठी  सोनोग्राफी आहे. असतील काही डॉक्‍टर कंसासारखे मी त्‍यापैकी नाही. पोरी आता कायदा फार कडक झालाय. असं झाल्‍यास डॉक्‍टरांना तुरुंगात जावं लागेल. अनेकजण  गेले देखील आहेत.

भारूडकार    -    अरे रे रे रे विज्ञानाने जेवढे सुख निर्माण केले तेवढे दुःखही दिले. वैद्यकशास्‍त्रातील शोध जसे उपकारक ठरले तसे अपायकारकही ठरले. लक्ष देवून ऐका विज्ञानयुग वाईट नाही, पण या युगात वस्‍तुचा अयोग्‍य वापर करणारे वाईट आहेत. श्रोतेहो, मित्रहो, डॉक्‍टर साहेब बोलतात ते बरोबर आहे. शेवटी यंत्र यंत्रचं असते. कुठे असतात त्‍यास भावना? साहेब डॉक्‍टर असले तरी शेवटी तेही माणूसचं आहेत. तेही माणूसचं!

गर्भ    : खरं आहे महाराज, नका विचार करू मला मारण्‍याचा.सांगा ना त्यांना तुम्ही काय असते अहिंसा व मानवता? कुठे गेला ‘जगा आणि जगू द्या’ हा वर्धमान महावीरांचा  संदेश ? अशा महामानवांचे  तत्‍त्‍वज्ञान कोण आणते  आचरणात ? तत्‍त्‍वज्ञान केवळ    बोलण्‍याची गोष्‍ट नाही ते आचरणात आणणे तितकेच महत्‍वाचे आहे.  कुठे गेली महात्‍मा  गौतम  बुध्‍दाची करुणा ? तुम्‍हाला  भाऊबीजाला, रक्षाबंधनाच्‍या ओवाळणीला बहीण लागते ना ? सर्व काही सहन करत अतिशय जिद्दीने कुटुंबाचा गाडा ओढणारी तर स्त्रीचं आहे.

इतर पात्रे : हो बरोबर आहे.

गर्भ :तुम्‍हाला पत्नी,आई हवी का नाही ? लहान मुलांना चिऊ-काऊची गोष्ट सांगणारी आजीही नको आहे का? माझा जन्मच तुम्हाला संकट वाटत असेल तर कुटुंबातील या सर्व भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रिया तरी कशा दिसतील?

पात्रे    : हो हो हो खरं आहे.

गर्भ    :तुमच्‍या मुलांना बायको लागते का नाही ?

पात्रे    : हो लागते

गर्भ    : विचार करा सगळयांनी. कशाला करता आम्‍हाला देव व दासी? माणूस म्‍हणून जगू द्या आम्‍हाला, माणूस  म्हणूनच. नका करू उल्‍लेख आमचा देवता म्‍हणून (म्‍यूझिक, सायलेन्‍ट करूणरस) अरे !  जन्‍मल्‍यापासून तिच्‍या मरेपर्यंत तिचा छळ  चालूच आहे. आजच्‍या विज्ञानयुगात, परिवर्तनवादी काळात मुलगी जन्‍मने  अशुभ मानले जाते. समतेच्‍या गप्‍पा मारणा-या भारतीय  लोकशाहीचा  हा पराभव नाही का ?

बाबा    : पोरी हे सगळं मला माहीत आहे. जगाच्‍या इतिहासात महिला सक्षमीकरणाचं काम सगळयात जास्‍त पुरुषांनीच  केलेले आहे. माझी काही चूक नाही. सांग  तू तुझ्या आईला समजावून.

गर्भ    : आई आज अनेक  मूलं सर्व काही असतानाही  आपल्या आई-वडिलांना वृध्‍दाश्रमात ठेवत आहेत.

आई    : अगं भविष्‍यात सासरी होणारा तुझा छळ मला पहायचा नाही. स्‍त्री संकटात आहे. तोंड असून तिला बोलता येत नाही. कान असून ऐकता येत नाही. ती डोळे असून आंधळी वाटत आहे. पाय असून लंगडी झाली आहे. ती पण माणूसच आहे. पण असं का ?

गर्भ    : अगं , आई  सगळयाच मुलींना सासरी छळ केला जातोच असे नाही.  तू पण स्‍त्रीच आहेस. काय केला स्‍त्री जातीनं गुन्‍हा, काय केलं पाप. लहानपणी आई-वडिलांची, तरुणपणी पतीची, मोठी  झाल्‍यावर मुलांची, सासू-सास-यांची सेवा करणा-या मुलीला हाच न्‍याय का ? पाच पांडवांनी द्रोपदीशी संसार केला असे सांगितले जाते. असं होत असेल तर ही वेळ यायला फार काळ लागणार नाही.

बाबा    : पोरी लेकराएवढं लेकही महत्‍वाची आहे. नाही होवू देणार मी तुझ्यावर अन्‍याय. कायद्यात मुलीलाही संपत्‍तीचा समान वाटा आहे. आज आपण मुलगी नको म्‍हणत असू तर उद्याची जिजाऊ  तरी कशी निर्माण होणार ?

भारूडकार    : उदो उदो ग जिजाऊ  (२ वेळा) (कोरस २ वेळा)

भारूडकर    : उदो उदो ग ताराबाई (२ वेळा) (कोरस २ वेळा)

भारूडकार    : उदो उदो ग अहिल्‍याबाई (२ वेळा) (कोरस २ वेळा)

भारूडकार    -    ऐका ऐका ऐका ऐका, ऐका हो ऐका !या भ्रूणहत्‍येस हुंडा पध्‍दत तितकीच कारणीभूत आहे.हुंडयामुळेच अनेक मुलींचे  बाप देशोधडीला लागले. शेती विकले. कर्ज  काढून  आत्‍महत्‍या केले. बापहो नको  लागू प्रतिष्‍ठेच्‍या नादी. प्रत्‍येक मुलीनी ठरविलं पाहिजे मी हुंडा घेणा-या मुलाशी लग्‍न करणार नाही.

पात्रे    : हो हुंडा घेणा-या मुलाशी  लग्‍न करू नका. ( 3 वेळा)

भारूडकार    : अरे माणसापेक्षा इतर जनावरं बरी ‘कळ’ नावाच्‍या कथेत एक प्रसंग आहे. गाईच्‍या पोटात कळा सुरू असताना रानात विजेचा कडकडाट चालू असतो. सोसाटयाचा वारा, सगळीकडे काळाकुट्ट अंधार. झुडूपाच्‍या बाजूला पावसाच्‍या मारा व गारा चुकविण्‍यासाठी आसरा घेण्‍याचा प्रयत्‍न गाय करते. दुसरीकडे गाईला वेदना पुढे जावू देत नाही. एकीकडे वासरू जन्‍म घेवू इचिछते, तर दुसरीकडे पावसाचा थयथयाट. कळ दाबू पाहणा-या गाईला वाटते की, मला मृत्‍यू आला तरी चालेल पण माझं वासरू वाचलं पाहिजे. श्रोतेहो, एकीकडे वासरू जगलं पाहिजे म्‍हणून जीव धोक्‍यात आणणारी मुकी गाय तर दुसरीकडे जीवाला मारू पाहणारी  बोलकी माय. कुणाला श्रेष्‍ठ म्‍हणावं ?  अरे ! काय चालू आहे या समाजात कळत नाही. कळत नाही, कळत नाही. या मानसिकतेच्‍या सगळयाच स्‍त्रीया  आहेत  असे नाही, परंतु हे प्रमाण  अधिक  आहे. हे सत्य नाकारता येत नाही.

गर्भ : आई ! नको करू असं तू (२ वेळा) ‘प्रेम स्‍वरूप आई वात्‍सल्‍यसिंधू आई’, ‘स्‍वामी तिन्‍ही जगाचा आईविना भिकारी’ या ओळी  मुलांसाठीच  महत्‍वाच्‍या  आहेत मुलींसाठी नाहीत  असे  आहे  का ?  प्रस्‍तुत ओळी पुस्‍तकापुरतचं मर्यादीत आहेत का ? एखाद्याला दु:खवण ही देखील  हिंसाच आहे. तुम्‍ही तर चक्‍क मारताय  मला ,मारताय मला. स्‍त्री भ्रूणहत्‍या म्‍हणजे अहिंसावादी महापुरुषांच्‍या विचाराला लागलेला कलंक आहे. नव्‍हे, तर  माणूसकीला  काळीमा  फासणारेचं आहे. आई ऐकूण घेणा. माझ्या अंतःकरणातल्‍या भावना! आई मला पोटातून ओटीत आण गं (३ वेळा) मला उमलू दे ! मला फुलू दे ! ! मला बहरू दे ! ! !


(टीप: आज जागतिक महिला दिन त्यानिमित्त... हे पथनाटय कोणालाही सादर करता येईल. यासाठी परवानगी घेण्‍याची आवश्‍यकता  नाही. सहज कळवता आले तर कळवावे.)


                     म. ई. तंगावार

   श्री हावगीस्‍वामी महाविद्यालय,उदगीर    जि.लातूर-४१३५१७              

              ९८९००६५६९०

           metanagawar@gmail.com











Comments

  1. बहुत बढिया पथनाट्य... हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  2. Replies
    1. खूप छान सर.
      पथनाट्य सादर करताना पाहिले ,तर पाहणाऱ्याच्या डोळयात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
      आई: मुलगी परक्याचं धन......... असे म्हणते तेव्हा. गर्भ: असा विचार तुझ्या आईने केला असता ,तर... तू जन्माला आली असती का?
      हा संवाद ऐकल्यावर डोळे भरून येतात.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज