छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण

 छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरण

          

      आरमारासाठी लाकूड असे वापरा की जे शेतकऱ्यांच्या हिताचे, उपयोगाचे नसले पाहिजेत, असे सांगत पर्यावरण संवर्धनाची काळजी घेणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने  पर्यावरणाचे रक्षण होते. जलसंवर्धन, वनसंवर्धन, तलाव, टाकी, विहिरी या संबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन मुळातच आजही प्रासंगिक वाटायला लागतो. असेही सांगितले जाते की, पुरंदरसारख्या किल्ल्यावर अवतीभोवती जी झाडे आहेत,ती औषधासाठी उपयुक्त आहेत. जखमी सैनिकांना इलाज करण्यासाठी त्यांनी तिथे  झाडपाल्याचे वैद्य ठेवले होते. गडावर त्या काळात त्यांनी शौचालये बांधली होती. प्रासंगिक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी जी पत्रे लिहिलेली आहेत, त्यात पर्यावरणाचा फार मोठा संदेश दडलेला आहे. डॉ.प्र.न.देशपांडे यांचा 'छत्रपती शिवाजी महाराजांची पत्रे' हा ग्रंथ इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात एकूण दोनशे तीन पत्रे आहेत. त्यातील काही पत्रात प्राणीमात्रांचा - पर्यावरणाचा संदर्भ आलेला आहे.

            मध्ययुगीन काळात प्रवासाची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे घोड्यावरुन कधी बैलगाडीतून लोक प्रवास करीत होते.  घोड्यांची काळजी घेणे काळाची गरज होती. घरातल्या पेटत्या दिव्याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. उंदीर वात घेऊन जाईल, गवत पेटेल आणि पावसाळ्यात घोड्यांना चारा मिळणार नाही. अशा प्रकारची काळजी शिवाजी महाराज घेतात. पत्रात ते लिहितात," वैशाखाचे वीस दिवस, उनाळा, हेही पागेस अधिक बैठी पडली. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसी तैसी पागेची बेगमी केली आहे. तुम्ही मनास ऐसा दाणा, रातीब, गवत मागाल, असेल तोवरी धुंदी करून चाराल,नाहीसें जालें म्हणजे मग काही पडत्या पावसात मिळणार नाही, उपास पडतील घोडी मरायास लागतील."(पत्र क्र.१३५) आपल्या गैरसोयींमुळे जर जनावरं मरत असतील, तर त्यापेक्षा मोठे पाप कोणते असू शकत नाही. याचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही. गवताचे खण, रानातील लव्हाळी सर्वांनी जपली पाहिजेत. अशा प्रकारची सूक्ष्म सूचना पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराज करतात. एकंदरीत पशू-प्राणी मोठ्या प्रमाणात असतील तर पर्यावरण स्थिर राहील. याची काळजी सतराव्या शतकात शिवाजी महाराजांनी घेतलेली होती.

           रयतेने फूलझाडे लावून चालणार नाही, तर त्यास सातत्याने पाणी टाकले पाहिजे. विहिरी व कालवे काढून बागाईत करावे. काही लोक धार्मिक असतात.त्यांना फुलझाडांची आवश्यकता असते.त्यामुळे जागोजागी फुलांची झाडं लावून त्याचे संवर्धन करायला हवे. ही झाडं एका अर्थानं त्या परिसराचा सौंदर्य देखील वाढवत असतात. आंबराई ही फळ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असते. आपल्या एका पत्रात ते लिहितात," विहीर हुडा आला वरी  वाढून ती खंडीयासि एईल ते देणे व इनामतीचे वावरामध्ये आंबे व चिचा व झाडझाडोरा आपण प्रजेकडून लावून त्याचा राजभाग हली व पेस्तर देणे आंबराई दर बनास पेडी जगाती.'(पत्र क्र. ५३)  शिवाजी महाराजांचे स्वराज्य ही लोककल्याणासाठी होते. सामान्य माणूस व निसर्गाविषयी ते किती दक्ष होते, याची प्रचिती यासारख्या पत्रातून येते. पुणे परिसरातील जनतेला महाराजांनी त्या काळात आंबराई लावण्यासाठी कटिबद्ध केले होते.असे सांगितले जाते की, साडेतीनशे किल्ल्यांपैंकी सर्वसाधारणपणे दोनशे पनास आदीची किल्ले तर एकशे अकरा किल्ले महाराजांनी स्वतःच्या काळात बांधली.  जिथे पाणी आहे तिथे त्यांनी किल्ला बांधला. विहीर खोदायची, त्या विहिरीतला दगड किल्ल्यासाठी वापरायचा. असे त्यांचे नियोजन होते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने  एक योजना राबविली होती. 'शिवकालीन पाणी साठवण योजना' असे त्या योजनेचे नाव होते. योजना जाहीर करून चालत नाही, तर त्याचे त्याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी लागते.

           वडगाव नावाच्या गावातील मोरया गोसावी यांनी तीन रूके गायरानची जमीन दिली होती.त्या जमिनीचा वापर कसा झाला पाहिजे, तिथे चांगल्या प्रकारे गवत येत असेल तर गुरंढोरं जगतील. या आशयाच्या एका पत्रात ते लिहितात," गाईस चारावयास रान नाही. हमशाई गा... गेलीया गुराची निगा होत नाही. अतीत ब्राह्मणास पावणार नाही. महाराज गोब्राह्मणाचे प्रतिपालक आहेती.  गाईचा प्रतिपाल केलिया बहुत पुण्य आहे यासीयास आपला."( पत्र क्र. २१)

        ग्रामीण असो वा शहरी गायरान जमीन कोणाच्या मालकीची नसते. आजही नाही,पण कुठल्यातरी योजनेच्या माध्यमातून ती जमीन मोठ्या प्रमाणात हडप केली जात आहे.ग्रामीण भागात शेतकरी वैयक्तिक काही एकर जमीन लाकूड व जनावरांच्या चाऱ्यासाठी पडीक ठेवत होते. अशा जमिनी पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त होत्या. पडीक जमिनीत कुरण पडत असल्यामुळे जनावर चरायची व जगायची. त्या जमिनीचा शेतीसाठी वापर होत नसल्यामुळे तिथं झाडं वाढायची. या आशयाचा संदर्भ शिवाजी महाराजांच्या एका पत्रात आलेला आहे. ते लिहितात," गोसावी यांची गुरे पडीमधेच चरतील त्यास पाल माफ सालाबाद असे तुम्ही यास येक जरीयाची तसवीस न देणे व त्या क्षेत्री ब्राह्मणस्थायी व आगातुक यापाशी गुराचे पाल मागतासी  म्हणून मालूम केले तरी तुम्ही मौजे मजकुरी रदे हुदेदारास व मोकदमास  लिहिजे की पाल माफ असे सालाबाद यास न घणे. (पत्र क्र.२८) 'पडीक रानावरचा कर घेवू नका. कारण तिथे गुरे चरतात.'  हा प्राणीमात्रांविषयी व्यापक दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा होता. ग्रामीण भागात आज पडीक जमीन , जनावर राहिली नाहीत. त्यामुळे वृक्षांचे प्रमाण कमी झालेले आहे. तंत्रज्ञानाचा, भौतिक सुखाचा अतिरेक हेच पर्यावरण विनाशाचे व प्रदूषणाचे कारण आहे. हे सत्य नाकारता येत नाही.

          रामचंद्रपंत अमात्य यांच्या आज्ञापत्राततील आरमार या प्रकरणात पर्यावरणविषयी महाराजांचा दृष्टिकोन प्रकट झालेला आहे."आरमारास तक्ते, सोंट, डोलाच्या काठ्या आदिकरून थोर लाकडे असावी लागतात.आपले राज्यात अरण्यात सागवानादी वृक्ष आहेत. त्यांचे जे अनुकुल पडेल ते हुजूरचे परवानगीने तोडून न्यावे. याविरहित जे लागेल ते परमुलखीहून  खरेदी करून आणवीत जावे. स्वराज्यातील आंबे, फणस आदीकरून हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची, परंतु त्यास हात लावू नये. काय म्हणून की, ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात असे नाही. रयतानी ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढविली. ती झाडे तोडील्यावर त्यांचे दुःखास पारावर काय?"  एखादं झाड जीर्ण अवस्थेत असेल तरच ते तोडावे.' बलात्कार सर्वथैव न करावा' असे विधान आरमारविषय प्रकरणात आले आहे. वृक्षांचे जतन करण्यासंदर्भात कळकळीने अनेक सूचना शिवाजी महाराजांनी त्या काळात दिलेल्या होत्या.

        एकंदरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृषीविषयक धोरण व लेखनात पर्यावरणाचा मोठा संदेश दडलेला आहे. प्रजेच्या व पर्यावरणाच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी अनेक बारकावे सांगितले आहेत. पर्यावरणाची समस्या सतराव्या शतकात नसली तरी महाराजांचे धोरण एकविसाव्या शतकाच्या समस्यावर मात करणारे रामबाण उपाय ठरू शकते. रयतेच्या संरक्षणासाठी महाराजानी काही सूचना दिलेल्या असल्या तरी त्यात पर्यावरण संरक्षणाची बीजे देखील दडलेली आहेत. विशेषत: जमीन हा महाराजांच्या चिंतनाचा विषय होता. माती, मुक्की जनावर,पाणी, झाड इत्यादी पर्यावरणपूरक संदर्भ शिवाजी महाराजांच्या अनेक पत्रात आलेले आहेत. या सर्व घटकांची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, ही शिवाजी महाराजांची जशी विनंती होती, तसा आदेशही होता. पर्यावरणसंबंधी शिवाजी महाराज किती जागरूक व संवेदनशील होते, हे त्यांच्या विचार व कार्यावरून लक्षात येते. शिवरायांनी सामान्यातल्या सामान्य माणसा बरोबरच वृक्ष - पशू-प्राणी यांची काळजी घेतली, त्यामुळेच ते रयतेचे राजे होऊ शकले.

                                              म.ई.तंगावार

                                            ९८९००६५६९०

                                   metangawar@gmail.com

                     

                

Comments

  1. पर्यावरणाविषयी छत्रपती शिवाजी महाराज किती संवेदनशील होते . हे आज आपला लेख वाचून समजले.....thank you.

    ReplyDelete
  2. सर अभ्यासक आणि उपयुक्त असा लेख.., अभिनंदन

    ReplyDelete
  3. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रातील पर्यावरणीय शोध आणि मीमांसा अतिशय मार्मिकपणे केली आहे.. राजांच्या जयंतीदिनी उत्तम अभिवादन।।।

    ReplyDelete
  4. पर्यावरणाविषयी आणि प्रवासाचे साधन असलेल्या घोड्यांविषयी छत्रपतींचा दूरदर्शीपणा आपल्या लेखात उत्तमरितीने मांडलेला आहे.

    ReplyDelete
  5. Nice Sir so useful information for New Generation

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज