सारे काही स्वतःसाठी

       सारे काही स्वतःसाठी

     या सृष्टीत खरे पाहिले तर बरेच काही निसर्गाचेचं आहे. सृष्टीच्या जडणघडणीत माणसापेक्षा निसर्गाचा सिंहाचा वाटा आहे. स्वतःचे काही नसताना जे माझे आहे ते तर माझे आहेचं, परंतु जे दुसऱ्याचे आहे, तेही माझेचं. अशी माणसाची प्रवृत्ती झाली आहे. निस्वार्थपणे विचार मांडून कृती करणाऱ्या माणसांचा बाजार भरलेला कुठेच पहावयास मिळत नाही. काही व्यक्ती व संघटना आजही निस्वार्थपणे काम करीत असले तरी त्याचे प्रमाण खूप कमी आहे. स्वार्थाच्या बाजारात स्वतःसाठी जगणारी, मरणारी, लढणारी, स्वतःभोवती फिरणारी माणसं पहावयास मिळतात. माणसासाठी, मातीसाठी जगत देशासाठी लढणारी माणसं शोधून सापडणे कठीण होत आहे. 'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग…' असे संत तुकारामांनी सतराव्या शतकात म्हटले होते. त्या शतकात संत तुकारामांनी केलेला संघर्ष व एकविसाव्या शतकातील माणसांचा संघर्ष यात फार मोठा फरक आहे. तुकोबांचे अहिंसात्मक युद्ध हे लोकसेवेसाठी होते.स्वतः तरुण इतरांना तारून न्यावे, असे तुकोबांदी संतांना वाटत होते. सामाजिक मूल्ये पायदळी तुडवून चालत असलेल्या आजच्या चालू माणसांचं हिंसात्मक युद्ध हे स्वतःसाठी आहे.

         'एकच ध्यास स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विकास' हे भारतीय माणसाचे ब्रीद वाक्य बनत चालले आहे. गुळाभोवती माशा घुंगाव्यात तसा माणूस सत्ता, संपत्ती, प्रसिद्धी, पुरस्कार व मानसन्मान या भोवती घुटमळत आहे. अरेरावीपणा, अर्थकारण व राजकारण यांचा वापर करून माणसं वाटेल त्या दिशेने कानात वारं शिरलेल्या जनावरांप्रमाणे धावत आहेत. कुठल्याही ध्येयाचा पत्ता नाही, कशाचेही भान नाही व माणुसकी तर मुळीच नाही, परंतु वाटचाल मात्र चालू आहे. स्वार्थ, अज्ञान, अंधश्रद्धा, आळशीवृत्ती प्रमाणेच अर्थकारण व राजकारणाच्या अतिरेकामुळे समाजकारण संपुष्टात येत आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण सारख्या सुसंस्कृत राजकारणी व्यक्तींनी समाज, साहित्य आणि संस्कृती याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. राजकारण करत असताना समाजकारणाची बोटे त्यांनी सोडले नाहीत. त्यामुळे आजही आपण आदराने त्यांच्या नावाचा जागोजागी उल्लेख करीत असतो.

    स्वातंत्र्यपूर्व काळातील आपले क्रांतिकारक, समाजसुधारक आज राहिले असते, तर ही परिस्थिती पाहून त्यांना वाईट वाटलं असतं. खरचं आमचं चुकलं की काय? असे ते नक्कीचं म्हणाले असते.मान व धनासाठी आसूरलेला माणूस समाजासाठी व देशासाठी काही करू शकत नाही.  परिश्रम न करता मिळालेला मोठेपणा अपघात असतो. सद्य:परिस्थितीत तरी आळशी माणूस हा सुखी दिसत आहे. परिश्रम व संघर्ष करणाऱ्या माणसासमोर मात्र जागोजागी अनेक आव्हाने उभी केली जात आहेत. त्यामुळे श्रम करणारा माणूस हा खचला जात आहे. सध्यातरी दुर्जनांची सक्रीयता व सज्जनांची निष्क्रियता वाढत आहे. हे चित्र समाजाच्या हितासाठी अतिशय घातक आहे. एखाद्या चांगल्या माणसाच्या हातून कळत नकळत चूक झाली असेल तर लोक त्याला सतत बोलत असतात. समाजात ऐंशी टक्के गुणावर न बोलता वीस टक्के दोषावर अधिक बोलले जाते. काही वर्षापूर्वी एका पंजाबी कवीची माझी भेट झाली होती. दिल्लीमध्ये प्रवास करताना ते कवी त्यांच्या कविता कोणत्या विषयावर आहेत ते मला सांगत होते. त्यात एक कवितेचा आशय असा होता की, त्या कवितेत एका लहान मुलाच्या हातून काचेचा ग्लास खाली पडतो आणि फुटतो. तेव्हा त्याची आई त्याला खूप मारते. त्यावेळी रडत असताना मुलगा आईला म्हणतो, 'लोक तो दील तोडते है l उसे कोई भी कुछ नही कहते है l मैने तो ग्लास नही तोडा मेरे हाथ से निकल पडा l तो तु मुझे इतना  मारती है l 

असचं समाजात अवतीभोवती दिसू लागलेले आहे.

     गांडूळ, मांडूळ व ऑक्टोपससारखी चालणारी, कावळ्यासारखी काकदृष्टी असलेली, सरड्याप्रमाणे सातत्याने रंग बदलणारी, डुकरा-मांजराप्रमाणे वेळप्रसंगी स्वतःचीच पिलं खाणारी तसेच खेकड्याच्या वृत्तीची जोपासना करणाऱ्या माणसांची संख्या कमी नाही. माणसाचा असा स्वार्थी दृष्टीकोन असेल तर माणुसकी तरी शिल्लक कशी राहणार? एखाद्याच्या चरणावर नतमस्तक व्हावे, असे पवित्र चरण कुठे आहेत? असा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला नेहमी पडत असतो.

       'जे जे आपणासी ठावे l ते ते इतरांसी सांगावे' असे समर्थ रामदासांनी लिहिले आहे, पण कुणाला काय हवं आहे? हे कळण्यासाठी सम्यकदृष्टी, सामाजिक भान, जिवंत संवेदना व माणुसकीचा गहिवर असायला हवा. 'जे जे आपणासी ठावे l ते ते इतरांसी विचारून घ्यावे' असे वाटल्यानंतर जेव्हा आपण समोरच्या माणसाकडे जातो, तेव्हा तिथेही मदतीसाठी स्वार्थाचे दर्शन होते. आज प्रेम, ज्ञान, आपुलकी व भावनेच्या पाठीमागे  स्वार्थाचा विचार दडलेला जागोजागी पाहायला मिळतो. नारायण कवठेकर नावाच्या कवीने असे म्हटले आहे की, 'मेहरबानी करून माझ्या पाठीवरून हात फिरवू नका; माझ्या पाठीचा कणा गायब होऊन जाईल. तुम्ही ज्याच्या डोक्याला स्पर्श करता आशीर्वादाच्या हाताने त्याचा मेंदू एकारतो.' सांगण्याचे तात्पर्य असे की, स्वार्थी माणसाच्या या जगात आपण शिकार बनता कामा नये. परंतु स्वार्थी माणसं कळणार तरी कसे? पोपटासारखी गोड बोलणारे, कारण नसताना कुठेही लोटांगण घालणारे अशी माणसं आपल्याला खूप चांगली वाटतात. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नसते. त्याचं अंतर्मन नेमकं कसं आहे? हे जाणून घेणे फार कठीण असते. काही माणसांचं 'ओठात एक आणि पोटात एक' असते. या माणसाचं दुसरं मन आपणास कळत नाही. जिथे स्वार्थ दडलेला असतो तिथे त्यांचं ते मन उफाळून येते.

       समाजाचे एक विद्यापीठ असते. त्या विद्यापीठात काम करत असतांना नोकरी मिळणार नाही, प्रमाणपत्र नाही निवृत्ती तर मुळीच नाही, परंतु जे काही मिळते त्याचे मूल्यमापन कशाशीही करता येत नाही. अशा या विद्यापीठात काम करताना अनेक समाजसुधारकांना कधी एका व्यक्तीशी, कधी कुटुंबाशी तर कधी समूहाशी संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी आपले कार्य 'बुडती हे जन न देखवे डोळा l येतो कळवळा म्हणूनिया' संतांच्या या उक्तीप्रमाणे चालू ठेवले. संत व समाजसुधारकांनी समाजसुधारणेसाठी व प्रबोधनासाठी निस्वार्थपणे जी तुतारी फुंकली होती, ती तुतारी आज तार सप्तककामध्ये (उंच स्वरात) स्वार्थासाठी फुंकली जात आहे. कवी केशवसुतांनी 'एक तुतारी द्या मज आणुनी फुंकीन जी मी स्वप्राणाने भेदुनि टाकीन तिन्ही गगणे' असे जे काही म्हटले होते, त्यामध्ये सामाजिक बांधिलकीचा जयघोष होता. 'नाचू कीर्तनाचे रंगी l ज्ञानदीप लावू जगी' असे सांगत पंढरपूरपासून पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकाविणाऱ्या  संत नामदेवांच्या प्रबोधना मागची भूमिका ही निस्वार्थ होती.ज्या समाजाच्या विद्यापीठात आपण वावरतो त्याचे आपण काहीतरी देणे लागतो, याचा विसर पडल्यामुळे सर्वच क्षेत्रात विचित्र अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरोखरच जे केवळ स्वार्थासाठी जगतात ते जिवंत असूनही कायमचे मरतात. समुद्राच्या बीचवरच्या वाळूवर जी काही चित्रे काढली जातात, नाव लिहिली जातात ती दीर्घ काळ टिकून राहत नाहीत. समुद्राची लाट आल्यानंतर लागलीचं ते पुसून जाते. तसेच अशा वृत्तीच्या माणसाचे होत असते. जे इतरासाठी चंदनाप्रमाणे झिझतात ते शरीररूपाने गेले तरी विचार व कार्य रूपाने जिवंत राहतात. हे सत्य कोणालाही नाकारता येत नाही.

       माणूस आज जातीसाठी व स्वार्थासाठी लढत आहे. पण माणुसकीच्या जातीसाठी कोण लढतो का? एका कवीने म्हटले आहे की, 'लोक जातीसाठी माती खातात मातीसाठी कोणी लढतच नाहीत बंधुता तरी कशी जोपासावी जातीशिवाय पान हालतचं नाही' जेव्हा एखादा साप चिमण्याच्या घरट्याकडे जातो तेव्हा सर्वच चिमण्या एक मनाने एक दिलाने व एकत्रितपणे सापाला चोच मारून त्याचे अस्तित्व संपवून टाकतात. एखादा कावळा मृत्युमुखी पडल्यानंतर  कावळे काॅंव काॅंव करीत एकत्र जमा होतात. रोडवर अपघाताने किंवा इतर कारणामुळे एखादा माणूस पडलेला असेल किंवा त्याचा मृत्यू झालेला असेल तर त्या माणसाला बाजूला करून पुढे जाणाऱ्या माणसाची हीच का भारतीय संस्कृती? कुत्रे जेव्हा आपापसात भुंकत असतात तेव्हा कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगता येत नाही. एकत्रित भुंकणारे कुत्रे कधीकधी एकमेकावर भुंकायला लागतात तसेच माणसाचे स्वार्थापोटी झाले आहे. कमीत कमी कुत्रा तरी आपल्या मालकाशी इमान राखून राहतो.

      मधमाशाप्रमाणे कणाकणाने ज्ञान व प्रेम एकत्र करण्याऐवजी माणूस मनामणाने (एक मण:१६पायली महणजेचं ८०किलो) टनाटणाने वाटेल त्या मार्गाने जात संपत्ती जमा करीत आहे. जेव्हा कुत्र्याला भाकरी जास्त होते, तेव्हा शिल्लक राहिलेली भाकरी तो लपून ठेवतो. काही वेळानंतर त्या ठिकाणी येऊन ती भाकरी दुसरा कुत्रा खाऊन जातो. नंतर आधीचा कुत्रा पायाने माती काढून अस्वस्थ होतो, पण भाकरी काही मिळत नाही. तसेच केवळ स्वतःचा विचार करणाऱ्या व स्वतःसाठी जगणार्‍या माणसाचे आयुष्याच्या संध्याकाळी होत असते. कावळ्याला कोकिळा म्हनत माणसं वेळप्रसंगी गाढवाला बढती देत आहेत. गुणवत्ता, दृष्टी, सामंजस्यपणा, अनुभव,

तळमळ, निष्ठा नसताना माणसाला पदावर बसवले जात आहे. प्रसिद्धीला हपापलेल्या, स्वार्थाने बटबटलेल्या माणसांचा उदोउदो समाज करतो. त्यामुळे समाजाचं संतुलन ढासळत चालले आहे.

        निसर्ग सुद्धा अद्वैत शिकवते. फुले, फळे व सावली देणाऱ्या झाडामध्ये कुठला स्वार्थ असतो का? एकदा मन सुन्न करणारी वास्तव घटना मी ऐकली. रांगत्या बालकाला गावातील डुक्कर ओढत होते. तेव्हा गाईने धाव घेऊन डुकराला पिटवून लावले. अशा गाईला कोणते बक्षीस द्यावे? जे काही दिले जाईल ते निश्चितच 'नोबेल' च्याही पुढचे राहील. माणूस तर मन व बुद्धी असलेला एक विचारशील प्राणी म्हणून ओळखला जातो. परंतु तो विचाराचा वापर केवळ स्वार्थासाठी करीत आहे. महात्मा गौतम बुद्धांनी प्रज्ञा, शील व करुणा हे क्रांतिकारी तत्त्वज्ञान जगाला दिले. ते तत्त्वज्ञान कृतीत आणणे काळाची गरज आहे. प्रज्ञा म्हणजे नुसते ज्ञान नाही, ज्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी होत असतो त्याला खऱ्या अर्थाने प्रज्ञावंत असे म्हटले जाते.एका कवीने म्हटले आहे की, 'तुझी ममता तुझी समता या जगाला तारणारी. तुझी प्रज्ञा तुझी करुणा मानवाला तारणारी.'

      राजर्षी शाहू महाराजांच्या संदर्भातली एक घटना आहे. एकदा एका श्रीमंत नवाबाने राजर्षी शाहू महाराजांकडे आचारी पाठवून रुचकर भोजन तयार करण्यास सांगितले. महाराज दोन घास खाल्यावर ताट बाजूला ठेवून म्हणतात, 'राजविलासी भोजन घेणे अपराध आहे. माझी प्रजा चटणी भाकरी खाऊन राहते. शाही जेवण घशाखाली उतरत नाही. कारण मी गरीब प्रजेचा राजा आहे.' शाहू महाराजांचा हा विचार व कृती डोळ्यासमोर ठेवून वाट तुडविण्याची  गरज नाही का?

     'प्रपंच करावा नेटका l परमार्थ साधेल विवेका' असे संतांनी म्हटले आहे. प्रपंच नीट करावा फाटका नाही खरे आहे. पैसा अवश्य मिळवावा परंतु 'जोडूनिया धन उत्तम व्यवहारे…' या संत तुकारामांच्या उक्तीचा विसर पडता कामा नये. लेखक, शिक्षक व राजकारणी मंडळी यांच्याकडून समाजाच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. एखादी काच दगडावर पडल्यानंतर त्याचे असंख्य तुकडे व्हावेत, तसेच सामान्य माणसाच्या अपेक्षा या वर्गाकडून भंग होत आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी म्हटल्याप्रमाणे 'जो जनतेची कदर करतो त्याचीच जनता कदर करीत असते' संत ज्ञानेश्वरांनी 'दुरितांचे तिमिर जावो…' असे म्हटले संत नामदेवांनी 'अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदास भाविकाशी' असे म्हणून गेले. संत तुकारामानी 'लहानपण देगा देवा…' अशी प्रार्थना केली, तर संत तुकडोजी महाराजांनी 'या भारतात बंधुभाव नित्य वसू दे…'अशी मागणीपर प्रार्थना केली. सामान्य माणसाची मागणी ही स्वार्थासाठी असते. त्यात व्यापक असा दृष्टिकोन नसतो.'मी माणूस आहे' याचा विसर पडलेल्या माणसाला 'माणसा माणूस होशील का? 'माणसा माणसा कधी होशील रे माणूस?' असे म्हणण्याची वेळ सध्या तरी आलेली आहे.

                                         म.ई.तंगावार 

                           श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर

                                     भ्र.९८९००६५६९०

                            ईमेल: metangawar@gmail.com

                      

Comments

  1. खुप छान व प्रेरणादायी लेखन.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज