सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिक : आव्हाणे व उपाय - योजना
सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिक : आव्हाणे व उपाय - योजना
भाषावार प्रांतरचनेमुळे सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिक गावांची विभागणी झाली.बिदर जिल्ह्यातील नारायणखेड,जयराबाद हे तालुके आजच्या तेलंगणाशी तर अहमदपूर निलंगा व उदगीर हे तालुके महाराष्ट्राची जोडण्यात आले.बिदर जिल्ह्यातील भालकी, बसवकल्याण, औराद व हुमनाबाद ,गुलबर्गा जिल्ह्यातील आळंद, अफजलपूर, चिंचोली, चित्तापूर,जेवरगी, सेडम, कारवार मधील सुपा, हळ्याळ तर बेळगाव जिल्ह्यातील अथणी,खानापूर,चिकोडी,हुकेरी या तालुक्यातील प्रत्येक गावात मराठी भाषिकांची संख्या आहे. मुळात कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ८६५ गावाची यादी आहे.त्यात कानडीपेक्षा मराठी बोलणार्यांची संख्या कितीतरी पटीने अधिक आहे. गुलबर्गा - बिदर प्रमाणेच बेळगाव-कारवार या जिल्ह्यातही असंख्य गावे अशी आहेत की, ज्यांनी मराठी भाषा व संस्कृती निष्ठेने जपलेली आहे. परंतु भळभळती जखम घेऊन मागच्या साठ वर्षापासून अनेक आव्हाणाना तोंड देत मराठी भाषिक कर्नाटकात जीवन जगत आहेत. ८६५ गावांमध्ये बेळगाव जिल्ह्यात ३८५ गावे आहेत. कारवार मध्ये २९९ तर बिदर जिल्ह्यातील १८१ गावे आहेत.१९५१ च्या जणगणणेनुसार भालकी तालुक्यातील ५९ टक्के व औराद तालुक्यातील एकूण ६९ टक्के लोक मराठी भाषिक आहेत.सद्य:परिस्थितीत कमलनगर जवळील होळसमुद्र या गावाची लोकसंख्या ६००० इतकी आहे.येथे सत्तर ते ऐंशी टक्के लोक मराठी भाषिक आहेत.येथील हरिनाथ महाराजांच्या समाधीवर सातशे वर्षापूर्वीचा शीलालेख आहे. ८६५ गावा व्यतिरिक्त देखील इतरही असंख्य अशी गावे आहेत की, ज्या गावात काही अंशी मराठी बोलली जाते. बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७० टक्के पेक्षा अधिक लोक हे मराठी भाषिक आहेत. तिथे मराठी भाषेबरोबरच कन्नड व कोकणी भाषा देखील बोलली जाते. महाराष्ट्र राज्याची जेंव्हा निर्मिती झाली तेव्हा कर्नाटक सीमाभागात जवळपास पंधरा ते वीस लाख मराठी भाषिक लोक होते.
१७ जानेवारी १९५६ रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी फार मोठे आंदोलन झाले. त्यात अनेक मराठी भाषिक शहीद झाले. अशा सर्व हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून या दिवशी पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते व राजकीय लोक एकत्र येत असतात.त्याठिकाणी काहीतरी आश्वासन मराठी भाषिकांना दिले जाते. वर्षभर मात्र याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. पुन्हा दुसऱ्या वर्षी १७ जानेवारीला या विषयावर भाष्य केले जाते, हे वास्तव परिस्थिती आहे. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सीमाभागातील समन्वयमंत्री यांनी सीमालढा अंतःकरणाचा विषय असल्याचे सांगितले. त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ असे म्हटल्यानंतर बेळगाव मध्ये कानडी भाषिकांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आंदोलन केले. खरं तर हा प्रश्न राष्ट्रीय पातळीवरचा आहे. केंद्रांनी हस्तक्षेप करून असे प्रश्न कायमचेच मिटवले पाहिजेत. परंतु तसे होत असताना दिसत नाही. महाराष्ट्र एकीकरण समिती' च्या माध्यमातून मागच्या अर्ध शतकापासून हा प्रयत्न केला जात आहे. परंतु अजूनही महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सातत्याने धुमसत असताना दिसतो. बेळगावमध्ये याचा प्रत्यय तर वारंवार येतो. यासाठी तिसरी-चौथी पिढी या प्रश्नासाठी लढा देत आहे. मागचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की, बेळगाव मध्ये अनेक आमदार व महापौर मराठी भाषिक झालेले आहेत. परंतु या जनमताचा आदर फारसा केला जात नाही. सीमाप्रश्न म्हणजे बेळगाव असे चित्र सध्या उभे झालेले आहे. हा लढा यशस्वीपणे पुढे न्यायचा असेल तर गुलबर्गा, कारवार व बिदर या परिसरातील लोकांना देखील सामावून घेणे गरजेचे आहे. त्यांचं मत जाणून घेणे काळाची गरज आहे. बिदर, गुलबर्गा (कलबुर्गी) या जिल्ह्यातील काही व्यक्तीशी संवाद साधून भालकी, औराद,कमलनगर या परिसरातील लोकांशी जेव्हा मी चर्चा केली तेव्हा असे लक्षात आले की,सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिक अनेक अडचणीतून सामोरे जात आहेत. त्यांचा कैवारी सध्या तरी कोणीच नाही आहे.' इकडे आड तिकडे विहीर' अशी त्यांची अवस्था झालेली आहे. या परिसरातील यशवंतराव सायगावकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. काही महिन्यापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली. एक वर्षापूर्वी मी जेव्हा सायगावला जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळेस तब्येतीच्या कारणामुळे त्यांना फारसा वेळ देता आला नाही. यासंबंधी आवडीने त्यांनी मला आपल्या पुस्तकाच्या खोलीत नेऊन काही महत्त्वाची पुस्तके दिली.पुन्हा आपण या विषयावर विस्ताराने बोलू असे ते म्हणाले होते, परंतु दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत.
कर्नाटकातील मराठी भाषिकांचे असंख्य प्रश्न दीर्घकाळापासून लटकत आहेत. चित्र असे आहे की, कर्नाटक सरकारने मराठी शिक्षणाचे ८० ते ९० टक्के कानडीकरण केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्यात देखील कर्नाटकाच्या राजकीय लोकांना यश मिळालेले आहे. सद्य:परिस्थितीत तरी सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषकांची अवस्था 'घर का ना घाट का' अशी झालेली आहे. पत्रकार किरण ठाकूर सारखे लोक आपल्या लेखणीच्या व वाणीच्या माध्यमातून पुढाकार घेऊन आंदोलन सुरू ठेवलेला आहे. परंतु त्यांनाही अनेक समस्यांना झगडावे लागत आहे. यापूर्वी बापूसाहेब पाटील एकंबेकर, एन.डी. पाटील, नवनाथ वासरे अशा अनेक व्यक्तींनी सीमा भागासाठी लढा दिला. बिदर - गुलबर्गा या परिसरातील महाराष्ट्र एकीकरण समिती सध्यातरी नावालाच आहे. हा लढा सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांनी उभा करावा, अशी अपेक्षा न करता लातूर, नांदेड, सोलापूर,कोल्हापूर व उस्मानाबाद सीमाभागातील कार्यकर्त्यांनी देखील संघटनात्मक कार्य करणे गरजेचे आहे. परंतु तसे होत असताना दिसत नाही.
सीमावर्ती कर्नाटकात शैक्षणिक व कार्यालय पातळीवर अनेक समस्या भाषेमुळे निर्माण झाल्यामुळे मराठी माणसांची एक प्रकारे कुचंबणा होत आहे. सीमावर्ती मराठी साहित्य व साहित्यिक समोरील आव्हाणे दिवसेंदिवस तीव्र स्वरूप धारण करीत आहेत. उदगीर शहरातील ज्या महाविद्यालयात मी कार्यरत आहे. त्या महाविद्यालयात कर्नाटक, आंध्रप्रदेश आजचा तेलंगणा तसेच सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिक विद्यार्थी मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी येतात. जेव्हा मी त्यांच्याशी या भागातील समस्येविषयी अनेकदा संवाद साधला. तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, समस्या खूप गंभीर आहेत. सीमाभागातील मराठी भाषिक हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात शिक्षण घेतात, परंतु त्यांची कागदोपत्री नोंद मात्र कर्नाटकात आहे. ते कर्नाटकातील सीमाभागात असले तरी मनाने मात्र महाराष्ट्रात आहेत. हे आपल्याला विसरता येणार नाही. ग्रामीण भागातील लोकांना माहीत असते खुरूप काय आहे?पायात काटा मोडल्यानंतर तो नाही काढला किंवा राहून गेला तर कालांतराने त्याचे रूपांतर खुरूपमध्ये होते. खूरूप हे एक कायमस्वरूपी दुःखणे असते.एक जुनाट असं दुःख. वरवर हे दिसत नाही, परंतु त्याच्या वेदना मात्र तीव्र असतात. तशी अवस्था सीमाभागातील मराठी भाषिकांची झालेली आहे. आजघडीला मराठी संस्कृतीवरती जिवापाड प्रेम करणारे मराठी भाषिक अनेक समस्याचे खुरूप पायात घेऊन जगत आहेत.
सीमावर्ती महाराष्ट्र व कर्नाटकातील भौगोलिक भाषिक संरचना तसे पाहिले तर अतिशय गुंतागुंतीची आहे. भारत हा बहुभाषिक देश आहे. विविध भाषा बोलणारे जाणणारे लोक भारतात राहतात. तरीही त्या त्या राज्यात भाषेची सक्ती केली जात असल्यामुळे सर्व क्षेत्रात लोकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मुळात केंद्र सरकारचं तीन भाषेचे जे सूत्र आहे.त्यात पहिल्या भाषेला म्हणजेच मातृभाषा/ स्थानिक भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. परंतु आज असे चित्र आहे की, दक्षिण भारतातील लोक हिंदी भाषा स्वीकारत नाहीत. उत्तर भारतातील लोक काही प्रमाणात इंग्रजी स्वीकारायला तयार नाहीत. कर्नाटकातील सीमावर्ती भागात मराठी भाषिकांची शैक्षणिकदृष्ट्या काही प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठी शाळांमधून महाराष्ट्राचा इतिहास विस्ताराने शिकता येत नाही. आजही शालेय पुस्तकातील पाठ मराठीत असले तरी मलपृष्ठावर राष्ट्रीयगीत मात्र कानडीत लिहिलेले आहे. कर्नाटकात नोकरी करायची असेल तर प्रथम कन्नड शिका कन्नड मधील परीक्षा उत्तीर्ण व्हा असा आग्रह कर्नाटक सरकारचा आहे. त्यामुळे मराठी भाषिकांमध्ये एक प्रकारे भीतीचे व संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. मराठी भाषिक विद्यार्थ्यांना मराठी, कानडी, हिंदी व इंग्रजी अशा चार भाषेतून शिक्षण घ्यावे लागते. या परिसरात काही शिक्षकांशी व मुख्याध्यापकांची प्रत्यक्ष भेटून जेव्हा मी चर्चा केली तेव्हा असे निदर्शनास आले की,मराठी शिक्षकांना महत्त्वाच्या पदावर बढती दिली जात नाही. मराठी भाषिक शाळेवर कानडी भाषिक मुख्याध्यापक नेमला जातो. मराठी शाळेचा अहवाल कन्नड मध्ये द्यावा लागतो. त्यामुळे मराठी भाषिक लोक कानडी भाषिक लोकांची मदत घेतात. या मदतीमुळे त्यांना अनेकदा गुलामीचे जीवन देखील जावे लागते. एवढेच नाही तर कर्नाटकात मराठी भाषिक लोकांना नोकरी करायची असेल तर त्यांना एक कन्नडचा पेपर द्यावा लागतो. या पेपर मधला अभ्यासक्रम हा पदवी स्तरावरचा असल्यामुळे मराठी भाषिकांना पास होणे कठीण जाते. त्यामुळे नोकरीत मराठी भाषिकांना फारसे स्थान मिळत नाही. या भीतीपोटीच मराठी भाषिक कर्नाटकातील सीमाभागात कानडी व इंग्रजी भाषेकडे अधिक लक्ष देत आहेत. नव्हे तर त्या भाषेत शिक्षण घेत असताना दिसतात.बेळगाव,गुलबर्गा,धारवाड,औराद भालकी तसेच विविध ग्रामीण भागात असंख्य मराठी शाळा या तग धरून उभ्या आहेत. कर्नाटकातील सीमाभागात लखनगाव, सायगाव, जवळगा, संगमेश्वर मेहकर, निटुर यासारख्या परिसरात सातवी ते दहावीपर्यंत मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. कर्नाटक सीमा भागातील गुलबर्गा,धारवाड व बेळगाव या तिन्ही ठिकाणी असलेल्या विद्यापीठांमध्ये एम.ए.मराठी चे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. याकडे दुर्लक्ष झाले तर मराठी भाषिक शाळा या पत्याप्रमाणे कोसळायला वेळ लागणार नाही. सीमावर्ती मराठी भाषिकांना कर्नाटक सरकार समजावून घ्यायला कमी पडतो असे नाही, तर महाराष्ट्रातील सरकार व इतर संस्थेचे देखील मराठी भाषिक लोकांकडे दुर्लक्ष झालेले आहे, हे सत्य नाकारता येत नाही. कर्नाटकातील नागरिक म्हणून महाराष्ट्रातही त्यांना फारसे समजून घेतले जात नाही. अशी सीमावर्ती मराठी भाषिकांची खंत आहे.
सीमावर्ती कर्नाटकातील ८६५ गावाकरिता MBBS - ०८, BAMS - ०५, BE - २५, Dental - ०२ जागा मराठी भाषिकांसाठी महाराष्ट्रात आरक्षित आहेत.परंतु मराठी भाषिकांची संख्या पाहिल्यास त्या जागा खूप कमी वाटतात .त्यासाठी त्यांना मातृभाषा प्रमाणपत्र (मदर टँक) परीक्षा तसेच एक बोर्डाची परीक्षा मराठी माध्यमातून द्यावीच लागते. अशा विविध कारणांमुळे सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिकांच्या समोर शिक्षण व रोजगाराचा प्रश्न उभा आहे. विद्यार्थी हतबल तर पालक संभ्रमावस्थेत आहेत.
सीमावर्ती कर्नाटकात मराठी साहित्यिकांची संख्या जसे मोठ्या प्रमाणात आहे, तसे साहित्य देखील तितक्याच प्रमाणात लिहिले गेले आहे. परंतु कर्नाटकात त्यांचे साहित्य दुय्यम दर्जाचे मानले जाते. साहित्यिक म्हणून आमच्याकडे कोणी पाहत नाही, ही त्यांची खंत आहे. मराठी भाषिक सीमावर्ती कर्नाटकाच्या गावातील ग्रंथालय व वाचनालयात मराठी ग्रंथ, नियतकालिक, दैनिक खरेदीस मान्यता किंवा अनुदान दिले जात नाही. सीमावर्ती मराठी भाषिकांचा महाराष्ट्राच्या संदर्भातही आक्षेप असा आहे की, आम्ही मराठी दैनिक वाचतो, पण आमच्या उपक्रमांस प्रसिद्धी मात्र फारशी दिली जात नाही. काही वर्षांपूर्वी औरादमध्ये दीड हजार पेक्षा अधिक मराठी दैनिक विकली जात होती. आता त्याची संख्या दीडशेवर आलेली आहे. हे चित्र सीमाभागातील इतरही गावात आहे.जाहिरातीची मागणी केली जाते. त्यामुळे आमच्या परिसरातील बातम्यांना फारशी प्रसिद्धी दिली जात नाही. असे या परिसरातील नागरिक खंत व्यक्त करतात.
सीमावर्ती परिसरात मराठी साहित्यिकांसाठी विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सीमावर्ती कर्नाटकात मराठी लोकधन मोठ्या प्रमाणात दडलेले आहे. त्याचे संकलन करून त्यावर समीक्षा करणे हे मराठी साहित्य व संस्कृतीच्या दृष्टीने हिताचे वाटते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन, साहित्य परिषदा यांच्या कडून सीमावर्ती कर्नाटकात विविध संमेलने, कार्यशाळा होत असताना दिसत नाही. खरे पाहिले तर यासाठी महाराष्ट्राच्या बजेटमध्ये विशेष निधी देखील ठेवायला हवे. मराठीतील स्वतंत्र वांग्मय प्रकारावर प्रकल्प राबवून शासनातर्फे तो प्रकाशित करायला हवा. सीमावर्ती मराठी लेखकांना प्रोत्साहनपर महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देखील द्यायला हवे. सीमावर्ती कर्नाटकात परिपत्रके कन्नड, मराठीत,हिंदी किंवा इंग्रजीत काढायला हवेत. सरकारी अधिकारी हा मराठी, कानडी व हिंदी जाणारा नेमायला हवा. मराठी साहित्य कन्नडमध्ये देखील अनुवादित करण्यासाठी यंत्रणा उभी करायला हवी. यासंदर्भात सीमावर्ती कर्नाटकातील भालकी येथील हिरेमठ संस्थांच्यावतीने अतिशय स्तुत्य उपक्रम राबविले जात आहे. या संस्थेच्या वतीने दीडशेपेक्षा अधिक ग्रंथ मराठीमध्ये प्रकाशित केले गेलेले आहेत. त्यातील बहुतांशी लेखक हे महाराष्ट्रातील आहेत.
यशवंतराव सायगावकर सारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी सीमाप्रश्नावर रस्त्यावर आले. मराठीत लेखन केले. परंतु महाराष्ट्रातील साहित्यिक, पत्रकार, कार्यकर्ते, राजकारणी यांच्याकडून मात्र समाधानकारक असे कार्य झालेले नाही.यशवंतराव सायगावकर व रघुनाथराव सायगावकर यांनी 'मुंबईसह महाराष्ट्र कर्नाटक सीमा लढ्याचा इतिहास' हा ग्रंथ लिहिला आहे.या ग्रंथात सीमावर्ती गावाच्या समावेश याविषयी विस्तृत माहिती त्यांनी विशद केली आहे. मात्र मराठी भाषिकांच्या समस्याविषयी ग्रंथात विस्ताराने भाष्य आलेले नाही. माधव कदम यांनी खूरूप नावाची कादंबरी लिहिली. या कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी सीमाभागातील समस्येला हात घातला. या कादंबरीवर आधारित आम्ही २०१० मध्ये 'खूरूप: सीमालढा आणि मीमांसा' या ग्रंथाचे संपादन केलो. या ग्रंथात सूर्यनारायण रणसुभे, किशोर सानप, प्रकाश मेदककर, रवींद्र ठाकूर, दिनकरराव कुलकर्णी,शेषराव मोहिते, बाबू बिरादार, यशवंतराव सायगावकर, रघुनाथ सायगावकर अशा मान्यवर अभ्यासकांचे लेख आहेत.
सीमावर्ती मराठी भाषिकांच्या संदर्भात खऱ्या अर्थाने न्यायालयीन पातळीवर इंजिनियर हरिहरराव जाधव यांनी लढा दिलेला आहे. 'Sloving Karnataka-Maharashtra Border dispute on the battle of village as a Unit,Majority Language Spoken,Geography Contiguity and Social Affinity' या शीर्षकाखाली त्यांनी जवळपास शंभर ते दीडशे पानांमध्ये बिदर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील कानडी- मराठी भाषिकांची संख्या भाषावर प्रांतरचनेच्या पूर्वी किती होती? याचे नकाशे व आकडेवारीसहित मांडणी केलेली आहे. हरिहरराव सदाशिवराव जाधव हे कर्नाटक सरकार मध्ये इंजिनियर होते. त्यांच्या या संशोधनाचा खरंतर बारकाईने विचार करणे गरजेचे आहे. मुळात हा सगळा प्रस्ताव त्यांनी इंग्रजीमध्ये तयार केलेला आहे. त्यांचे संशोधन हे अप्रकाशित आहे. त्यांच्याशी काही तास संवाद साधल्यानंतर माझ्या लक्षात आले की,त्यांच्या अंत:करणात सीमा भागातील मराठी बांधवाविषयी तळमळ आहे. यासंदर्भात अनेक असे पुरावे त्यांनी संकलित केलेल्या आहेत. भालकीचे पत्रकार मोरे यांनी असे म्हटले आहे की, आम्ही स्वाक्षरी मराठीत करतो, आमचा फोन नंबर देखील आम्ही मराठीत लिहितो. इतकं मराठी भाषेवर आम्ही मनापासून प्रेम करतो. कारण आमची जडणघडणच मराठी संस्कृतीत झालेली आहे.
सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिकांना कार्यालयीन पातळीवर कानडीमध्ये पत्रव्यवहार करावा लागतो. ही एक फार मोठी समस्या आहे. कारण कानडीत ते चांगल्या प्रकारे मत मांडू शकत नाहीत. सीमावर्ती कर्नाटकात बहुतांशी मराठी भाषिक कानडीत संवाद साधतात, पण त्यांना लिहिता वाचता येत नाही. कार्यालयीन पातळीवर दुभाषिकद्वारे अनुवाद करून पत्रव्यवहार केला जातो. यामुळे मराठी भाषिकांची एका अर्थाने आर्थिक शोषण देखील होते. ऑनलाईन सातबारा, जातप्रमाणपत्र, रहिवासी, सिमकार्ड, लायसन इत्यादी अनेक कागदपत्रंविषयी त्यांच्यासमोर समस्या निर्माण होतात. मराठी भाषिक अल्पसंख्यांक असल्यामुळे त्यांना फारशा सुविधा सीमावर्ती कर्नाटकात दिल्या जात नाहीत. एका अर्थाने त्यांची गळचेपी होते. सीमावर्ती कर्नाटकात रोटी-बेटी तसेच सांस्कृतिक संदर्भात समस्या तीव्र नसल्या तरी रोजगाराच्या संदर्भात मात्र समस्या आहेत, हे नाकारता येत नाही.
एकंदरीत सीमावर्ती कर्नाटकातील मराठी भाषिकांचे सृजनात्मक साहित्य,अनुवादित साहित्य,लोकसाहित्य या साहित्याचा मराठीच्या इतिहासात नोंद केल्यास मराठीतील आधुनिक मराठी वांग्मयाचा इतिहास अजून विस्तारेल. मराठी साहित्यात मोलाची भर पडेल. सीमावर्ती कर्नाटकातील शासकीय वाचनालयात पुस्तकाच्या मागणीवर बंदी आहे. मराठीतील ग्रंथ वेळेवर मिळत नाहीत. मराठी वृत्तपत्रांनी फारसा प्रतिसाद दिला जात नाही. कर्नाटकातील मराठी भाषिकांना प्रकाशक मिळत नाहीत. एका अर्थाने त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असताना देखील जाणवतो.आजही मराठी भाषिकांच्या व कानडी भाषिकांच्या संघटना सीमाभागावर एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. याचे स्वरूप तीव्र होता कामा नये. त्यांच्यात एकोपा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक सरकारला एकत्र बसून काही सकारात्मक पाऊले उचलणे गरजेचे आहे. त्यांच्यातील हा संघर्ष कमी झाला पाहिजे. सीमावर्ती कर्नाटकातील मराठी लोकांनी देखील मराठी भाषा, साहित्य व संस्कृती समृद्ध केले आहे. त्यांच्या रोमारोमात मराठी भाषेविषयी अभिमान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रातील लोकांनी त्यांच्या भावना व समस्या लक्षात घेऊन त्यांना मदत करीत मार्ग काढणे गरजेचे वाटते.
( दि.१७ जानेवारी हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आंदोलन करीत ज्यांनी आपले प्राण गमावले. त्यांना या दिवशी आदरांजली वाहिली जाते. 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' निमित्त हा लेख. या लेखात काही कमी जास्त असल्यास वाचकांनी स्पष्टपणे कळवावे, त्यांचे स्वागतचं आहे.)
म.ई.तंगावार
मराठी विभाग
श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर
जि.लातूर-४१३५१७
९८९००६५६९०
metangawar@gmail.com
खूप छान सर
ReplyDeleteअत्यंत सखोल,अभ्यासपूर्ण लेख.सरजी, आपले संबंध माय मराठी बांधवांतर्फे मनःपूर्वक अभिनंदन!💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteखूप छान.
ReplyDeleteBest sir
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteअतिशय सखोल आणि व्यासंगपूर्ण मांडणी..
ReplyDeleteअथक परिश्रमाने संकलन आणि
संपादन .. मराठी भाषा आणि महाराष्ट्र यातील सीमावर्ती अनुबध उत्तम पणे साकार केला आपले मनापासून स्वागत.
महाराष्ट्र बाहेर मराठी माणसाच्या रूपाने महाराष्ट्र नांदतो. त्यांच्या व्यथा वेदनांंचा वास्तव आलेख येथे अधोरेखित केला आहे..
अभिनंदन
खूप छान अभ्यासपूर्ण लेख आहे आपण सिमा भागाची व्यथा व कथा स्पष्ट शब्दात मांडली आहे सर आपले हार्दिक स्वागत
ReplyDeleteधन्यवाद
Deleteधन्यवाद सर खरचं खुप छान आहे.💐💐💐💐💐💐💐💐
ReplyDeleteछान सर
ReplyDeleteखूप छान लेख सरजी
ReplyDeleteSir sima bagtil Marathi badhikache Hal sarkar darbari asch mahiti Det Raha tari mharshtra sarkar Marathi sati kahi karnatakatil Marathi bashkasti paule uchalal vidhansbed ya parshnawar awaz udwel
ReplyDelete