कृषी संस्कृतीचा उत्सव : वेळ अमावस्या

कृषी संस्कृतीचा उत्सव : वेळ अमावस्या

   भारतीय संस्कृतीत उत्सवांना अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. विशेषतः मातीसाठी अहर्निश काम करणारा शेतकरी,शेतमजूर(अलुतेदार-बलुतेदार) यांच्याकडून जे सण साजरे केले जातात, त्या सणाची ओळख राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र फारशी झाली नाही. विशिष्ट भागात, विशिष्ट दिवशी, विशिष्ट पद्धतीने व विशिष्ट आहारासह एकत्रितपणे आनंदाने साजरा केला जाणारा महाराष्‍ट्र-कर्नाटक व तेलंगण सीमावर्ती भागातील 'वेळ अमावस्या' हा केवळ सणचं नव्हे;तर एक प्रकारचा उत्सव आहे. हा उत्सव काही भागापुरता मर्यादित असला तरी शेजारधर्म पाळणारा आणि मातीशी नाळ घट्ट ठेवणारा आगळावेगला असा उत्सव आपणास इतरत्र कोठेही पाहायला मिळत नाही. कृषी संस्कृती ही मुळात मातीशी व भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेली आहे. त्यामुळे अशा  उत्सवाच्या माध्यमातून मातीविषयी व संस्कृतीविषयी शेतकरी कृतज्ञताचं व्यक्त करीत असतात.

विशेष संकल्पना: भज्जी,आंबिल,हेंडगा

  'वेळ अमावस्या' हा उत्सव (सण) ग्रामीण भागात 'येळवस' या नावाने देखील ओळखला जातो.पौष महिन्यात अमावस्या रोजी विशेषत: डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यात तर कधी जानेवारीच्या सुरुवातीच्या पंधरवड्यात हा सण येतो.जूनच्या पेरणीनंतर सातव्या अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. कन्नडमध्ये 'येळ' म्हणजे सात. त्यावरून 'येळवस' असे म्हटले जात असावे.कन्नडमध्ये तिळा ला 'येळू'(डब्बल 'ळ') म्हणतात. या दिवसापासून दिवस तिळातिळाने वाढतो. म्हणून या उत्सवाला 'येळवस' असे म्हटले जात असावे.येळ्ळू अमावस्येचा हा अपभ्रंश झाला आहे. मुळात 'वेळ अमावस्या' हा मराठीतला शब्दच नाही. या सणाला बोलीभाषेत 'वेळ अवस' 'येळ अमोशा' असे देखील म्हटले जाते. भारत हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जात असल्यामुळे या देशात शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे पोळा, रब्बीतील पेरणीचे मोडं वर आल्यानंतर दहा ते पंधरा दिवसात पांढरहिटू(कन्नड शब्द),संक्रांत व वेळ अमावस्या असे लहान-मोठे सण की जे मातीशी नाळ जोडणारे आहेत. जी काळी आई आपल्याला जगवते,त्या आईची पूजा करून ऋण व्यक्त करावे, या उद्देशाने हे सर्व उत्सव साजरे केले जातात.

        वेळ अमावस्या हा उत्सव महाराष्ट्रात विशेष करून लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.मुळात हा सण कर्नाटकातला असता तरी मराठवाड्यातील बीड,लातूर, उस्मानाबाद व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच तेलंगण सीमाभागातील जहिराबाद, निजामाबाद व आदिलाबाद  या परिसरात काही प्रमाणात वेळ अमावस्या साजरा केली जाते.तसे पाहिले तर संपूर्ण कर्नाटकात हा सण सीमावर्ती भागात ज्या प्रकारे साजरा केला जातो,तसा साजरा केला जात नाही. उत्तर कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर तसेच बिदर जिल्ह्यातच अधिक प्रमाणात हा सण साजरा केला जातो.लातूर जिल्ह्यात तर हा सण वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. अनेकदा स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी यांच्याद्वारे स्थानिक सुट्टी जाहीर केली जाते.

        सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत एका अर्थाने शहरात व ग्रामीण भागातही एकप्रकारे अघोषित बंदीचं असते. गाव आणि रस्ते निर्मनुष्य झालेली असतात.सर्व दुकाने व बाजार बंद असतो जवळपास दिवसभर कोणीही दुकाने उघडत नाहीत.पिकांच्या आणि माणसांच्या गर्दीने शेत-शिवारला बहर येतो. घरातील लोक शिक्षण, नोकरी व व्यापाराच्या निमित्ताने कितीही दूर असले, तरी ते गावाकडे येण्याचा प्रयत्न करीत असतात.

शेजारी,मित्रपरिवार,बलुतेदार आलुतेदार, व्यापारी,कामगार व काही ठिकाणी विध्यार्थी या सर्वांना निमंत्रण त्या दिवशी आग्रहाने,प्रेमाने दिले जाते. विशेषत: ज्यांच्याकडे शेती नाही, जे दुसऱ्या गावात स्थायिक झालेले आहेत,ज्यांचे गाव दूर आहेत अशांना तर आवर्जून शिवार भोजणासाठी निमंत्रण दिले जाते. एवढेच नाही तर रस्त्यांने जाणारे ट्रक व बसेस चालक व वाटसरू हे परिचयाचे नसले तरी त्यांनाही प्रेमाने भज्जी खाण्यासाठी आग्रह केला जातो. 'या आमच्या कोपीत भज्जी खायला' असे एकमेकांशी म्हणून बोलविले जाते. एकमेकांकडे हा उत्सव साजरा केला जात असला तरी एकमेकांना निमंत्रण देऊन शेतात बोलावले जाते. भोजनानंतर काही ठिकाणी पानाचा विडा देखील दिला जातो.लेकीला माय ज्या भावनेतून पाठविते,त्याच भावनेने भोजनानंतर आलेल्या मित्रांना, पाहुण्यांना पाठविले जाते. असे या सणाचे वेगळेपण म्हणून नोंदविता येईल.

       शेतात रब्बीची पिके जेव्हा बहरलेली असतात तेव्हा वेळ अमावस्या हा सण येतो. ज्वारी, हरभरा, गहू, मिरच्या वठाणे भाजीपाला इत्यादी पिके या दरम्यान आलेली असतात. एखाद्या वर्षी दुष्काळ असो, उत्पन्नामुळे फायदा किंवा तोटा होवो या परिसरात शेतकरी मात्र मोठ्या आनंदाने वनभोजनासाठी लोकांना निमंत्रण देतात. त्या दिवशीचा त्यांचा आनंद गगनात मावेनासा असाच  झालेला असतो.

    ज्या दिवशी हा सण असतो, त्या दिवशी सकाळी सात पासून नऊ पर्यंत शेतकरी साहित्य घेऊन शेतात जातात. पूर्वी सगळेच बैलगाडीने जायचे.आता वाहनामुळे,यंत्रयुगामुळे बैलगाडीचे प्रमाण कमी झाले आहे. आज बैलगाडीची जागा दुचाकी गाडी,ट्रॅक्टर,टेम्पो व कार इत्यादीने घेतली आहे.                    

         शेतात पाच कडब्याच्या पेंड्या उभे करून 'कोप' तयार केली जाते. ही कोप म्हणजे आधार व सावलीचे प्रतीक होय.पांडव लक्ष्मीला  दैवत मानून पूजा केली जाते. कोपीवर एखादी शाल किंवा स्त्रियांच्या वलीने झाकले जाते. कोपीच्या आत सारवून घेऊन मातीच्या लक्ष्मीची मूर्ती तयार करून बसविली जाते. पांडवाची मूर्ती मातीपासून करून किंवा दगडाचे ठेवले जाते. लक्ष्मीची व पांडवाची पूजा करण्यासाठी मातीचे पाच मडके, फुलं बोरं,पेरू,गाजर,केळी यांचा उपयोग करून नैसर्गिक पद्धतीने पूजाविधी केला जातो. बळीराजा जोडीने पूजा करून कोपीच्याभोवती 'ओलगे ओलगे सालम पलगे' म्हणत  फेऱ्या मारतो.  पुढे असणारा 'वलगे वलगे' तर मागील व्यक्ती 'सालम पलग्या' म्हणत दोन ते पाच फेऱ्या मारतो.काही परिसरात 'हर हर महादेव येळकोट येळकोट घे' 'घट्ट द्या पातळ घ्या'असे म्हणत कोपीच्या भोवती फेऱ्या मारले जाते. एकाच्या हातात पाणी तर दुसऱ्याच्या हातात आंबिल असते. या कानडी शब्दाचा अलीकडच्या काळात अपभ्रंश झालेला असावा. 'वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला चांगली पिकं द्यावीत व आम्हाला समृद्ध करावं' असा याचा भावार्थ आहे. यासंदर्भात महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगण सीमाभागातील काही वृद्ध व संस्कृतीच्या जाणकारांशी चर्चा केली.पण समाधानकारक उत्तर मात्र याचे मिळाले नाही. हे परंपरेने चालत आलेले आहे. म्हणून आम्ही देखील तसेच म्हणतो,असे अनेकांना वाटते. मुळात हे कानडी वाक्य आहे. रांग, ओळ व पातीला कन्नडमध्ये 'साल'(सालम) असे म्हणतात. म्हणजेच पातीला समृद्धी येऊ दे.तर शेतात मालाला बरकत येईल.अशा प्रकारची विनंती शेतकरी पांडवांना व लक्षुमीला करताना दिसतात. फेऱ्या मारल्यानंतर आंबिल व पाणी पिकावर शिंपडले जाते. कोंडलू किंवा मडक्यात तांदूळ व दूध टाकून शेणाच्या वाळलेल्या गौर्यावर ते दूध तापवले जाते. ते दूध ज्या दिशेने उतू जाईल त्या दिशेने पुढच्या वर्षी चांगला पाऊस पडेल, असा एक संकेत गृहीत धरला जातो. हे संक्रातीला देखील शेतात गेल्यावर करीत असतात. नैवेद्याच्या रूपात आहारातील सर्व पदार्थ कोपीत ठेवले जातात. लक्ष्मीची पूजा करण्याचे कारण म्हणजे लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते.परंतु मुळात शेतकऱ्याला कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो.शेतावरील लक्ष्मी घरात भरभरून येवू दे. अशी सर्वांची मनातील धारणा असते.

       कृषीसंस्कृतीत पांडव पूजेला महत्त्व आहे. ग्रामीण भागात पीक उगवल्यानंतरही पांडवाची पूजा केली जाते. वेळ अमावस्याला कोपीत पाच पांडव व द्रौपदी असे सहा दगड ठेवले जातात. त्या दगडांना पांढरा चुना लावला जातो. पांडवाचा संबंध कदाचित घडलेल्या महाभारताशी जोडला गेला असावा. पांडव हे क्षत्रीय होते.भूमीचे ते रक्षक आहेत. तसेच कौरवांनी पांडवांना सांगितले की सुईच्या टोकाएवढी जमिनीची जागा देखील देणार नाही. त्यासाठी युद्ध झालं.त्यात पांडवाचा विजय झाला.पांडव मातीसाठी लढले म्हणून पांडवाची पूजा करण्याचे कारण असावे. महाभारत व रामायण हे भारतीय संस्कृतीचे दोन डोळे मानले जातात. यातील नायक - नायिकांचा प्रभाव भारतीय माणूस व भारतीय साहित्यावर काही प्रमाणात पडलेला आहे. त्यामुळे पांडवाप्रति असलेल्या श्रद्धेतून पूजा होत असावी. काही ठिकाणी पांडव दगडाची तर काही ठिकाणी मातीचे बनविले जातात. हे घटक निसर्गातील महत्त्वाचे घटक आहेत. ते शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतात.याशिवाय दुसरा संदर्भ असा देता येईल की, पृथ्वी, आप, तेज,वायू व आकाश ही पंचमहाभूते शेतीच्या संदर्भात नव्हे, तर संपूर्ण मानवी जीवनासाठी व निसर्गातील घटकासाठी उपयुक्त आहेत. याचे प्रतीक म्हणून पांडवाची पूजा केली जात असावी.याबरोबरचं शेतात झाडाला झोका बांधून लहान मुलं मोठी माणसं झोका खेळत असतात.  काही जण पतंग उडवितात.एक प्रकारे आनंदमय वातावरण या दिवशी असते. या महिन्यात शिवारात हिवाळ्यामुळे कोवळं ऊन पडलेलं असतं.त्यामुळे उष्णता जाणवत नाही.

      वेळ अमावस्याच्या स्वयंपाकातील पदार्थाची पूर्वतयारी दोन ते तीन दिवस आधीपासून केली जाते. वेळ अमावस्याच्या पहिल्या दिवसाला 'भाजीपाला दिवस' असे म्हटले जाते. हा एकमेव असा उत्सव,सण आहे की, स्वयंपाक आदल्या दिवशी केला जातो व जेवण दुसऱ्या दिवशी केले जाते. या निमित्त जे काही पदार्थ भोजणासाठी बनविले जातात,त्यात 'भज्जी' नावाच्या भाजीचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.कारण ही भाजी महाराष्ट्रात लातूर जिल्ह्यात विशेष करून बनविले जाते. तुरीच्या शेंगा, हरभऱ्याची भाजी,वाटाणे मिरची,मेथी, शेंगदाणे,कोथिंबीर,कडीपत्ता, कांद्याची पात, आवऱ्याच्या

शेंगा,दुधीभोपळा,गाजर,वाळकं, लसूण,कांदे, आलपेस्ट,हिरवी चिंच,तेल,मीठ, हळद,जिरे,मोहरी,आद्रक अशा इतरही अनेक पदार्थापासून 'भज्जी' बनविली जाते. ज्वारीची व बाजरीची भाकरी तसेच पिवळा व कडक भाकरीसोबत भज्जी चविष्ट व स्वादिष्ट लागते. यापैकी बहुतांश पिके व भाजीपाला हिवाळ्यात येत असतात.भज्जीवर तेल टाकले जाते.तेलात लसूण व जिरे याचा समावेश असतो.तसेच भज्जीत दही मिसळून भाकरीसोबत देखील खाल्ली जाते. ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरीला 'रोडगे'  म्हणतात.भज्जी पाच ते सहा दिवस राहते. फ्रिजमध्ये नाही ठेवले तरी ते खराब होत नाही. आयुर्वेदानुसार भज्जी शरीरासाठी पोषक असते.

      या दिवशी आहारात 'आंबिल' नावाचा पेय पदार्थ असतो. हा देखील विशेष मेनू होय.ताक,दही, लसूण,कांदा पात,ज्वारी व बाजरीचे पीठ, लिंबू,चिंच व कोथिंबीर यापासून आंबिल बनविली जाते.आदल्या रात्री बनवून माठात/बिंदग्यात ठेवले जाते.आंबट ताकात ज्वारीचे पीठ रात्रभर भिजवून त्यामध्ये मीठ व गरम पाणी टाकून फोडणी दिली जाते. आंबिल कितीही प्राशन केले तरी शरीरास त्रास होत नाही. काही प्रमाणात मात्र झोपेची गुंगी येते.

    याबरोबरचं स्वयंपाकात गव्हाची खीर बनविली जाते. त्यात खोबर,बडीसोप, गूळ,साखर व इतरही पदार्थ असतात.तसेच गोड पोळी, उंडे, धपाटे तिळाची पोळी, वांग्याचे भरीत,चपाती, तांदळाची खीर, वरण-भात, शेंगदाण्याची चटणी, खिचडी आदी पदार्थही बनविले जातात. या दिवशी आंबट भात देखील बनविला जातो. ज्वारी, ताक, लसून,आद्रक, हिरवी मिरची कोथिंबीर हे सर्व कच्चे साहित्य एकत्र करून आंबट भात बनवतात. हा भात विशेष करून नैवेद्यासाठी वापरला जातो. हे पदार्थ मसाले युक्त नसल्यामुळे पोटदुखी व अपचन यासारखे कोणतेही आजार होत नाहीत. म्हणून अनेक जण चार ते पाच कोपीवर जाऊन जेवण करतात. तेव्हा 'भज्जी जेवा,आंबिल प्या,आज पोट वाढते'असे विनोदाने म्हटले जाते.'बाई बसना काम दिसना' याचा प्रत्यय अशा सणाच्या निमित्ताने स्त्रियांच्या बाबतीत येतो. गौरी पूजन व वेळ अमावस्या अशा सणांना स्त्रियांना भरपूर कामे करावी लागतात, परंतु उत्साह, आनंद, निष्ठा, श्रद्धा, भावभक्ती यामुळे स्त्रियांना त्याचा थकवा मात्र जाणवत नाही. वेळ अमावस्याच्या दिवशी काही ठिकाणी स्त्रिया आनंदाने गाणे म्हणतात. ती 'स्त्रीगीते' म्हणून लोकसाहित्यात प्रसिद्ध आहेत.

       'आली आली लक्ष्मी/सोन्याच्या पावलानं

       इळा आमोशाच्या दिसी/कोप चढे 'डोलानं

       येळ अमोश्याच्या दिशी/जाई जुईचा मांडव 

      तिथे लक्षुमी पांडव/राजे करी दोघेजण'

              सायंकाळी टोपलीत लक्षुमीला ठेवून,दिवा लावून तसेच ज्वारीचे धाट ठेवून टोपीलीला शाल पांघरून डोक्यावर घेऊन घराकडे जातात.गावातील मंदिरात टोपलं उतरून दिवा लावला जातो. नंतर स्त्रिया-पुरुष घराकडे जातात. काही भागात संक्रातीला देखील हीच प्रक्रिया केली जाते.

         रात्री गावात 'हेडंगा' पेटविला जातो. याचे कारण असे असावे की,दिवाळीच्या पाडव्याला थंडी येते व वेळ अमावस्येला थंडी जाते. थंडी निघून गेली पाहिजे म्हणून 'हेडंगा' पेटविण्याची प्रथा प्रचलित असावी.कदाचित गावातील लोकांमध्ये असलेले दुर्गुण जळून गेले पाहिजेत,अशी समजूत किंवा भावना देखील असावी. थंडीमुळे पिकं कडाडून जातात. हे खरे असले तरी हरभऱ्या सारख्या पिकांना मात्र थंडीची गरज असते. शेतातील थंडी गावात यावी,अशी प्रार्थना केली जात असत.पिकावर व माणसावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, हे देखील वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले असावे. हेडंगा पेटविणे म्हणजे थंडीला चटका देणे होय. सायंकाळी शेतात दिवटी फिरून लोक घरी जातात. थंडीमुळे पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही. थंडी निघून जावी ही सुद्धा यामागची धारणा असावी. येळवस पासून दिवस मोठा होत जातो. त्यामुळे 'येळवशीचा उंडा दिवस झाला धोंडा' या सारख्या म्हणी ग्रामीण भागात प्रचलित आहेत.

     एकंदरीत कर्नाटकातील सीमावर्ती महाराष्ट्रात,कर्नाटक व तेलंगणात वेळ अमावस्या हा सण आनंदाने,चैतन्याने,उत्साहाने साजरा केला जातो. एक सामाजिक व धार्मिक सलोखा जपणारा हा सण आहे. कुठल्याही जातीधर्माचा मनात विचार न आणता एकमेकांना भोजनाचे निमंत्रण दिले जाते. या काळात भोजनासाठी लागणारे बहुतांश साहित्य शेतशिवारात असते,त्यामुळे कमी खर्चात हा सण शेतकऱ्याला साजरा करता येतो. शेत-शिवार फुलू दे,शेतकऱ्यांचे आयुष्य सुख समृद्ध होऊ दे, अशी प्रार्थना या दिवशी सगळेच करतात.हा उत्सव म्हणजे शेतकरी नोकरदार व व्यापारी यांची ग्रामीण सहलचं होय. हा उत्सव नैसर्गिक बनण्याची प्रेरणा देते. (माणूस हा आज एकलकोंडा व कृत्रिम झालेला आहे) हा दिवस म्हणजे विशिष्ट अन्नपदार्थांचा व हिरवाईचा अपूर्व सोहळाचं असतो. ऐतिहासिक ग्रंथात या सणाची,उत्सवाची नोंद झाली नाही.परंतु या सणाला शेकडो वर्षाची परंपरा सीमाभागात आहे. हा सण सांस्कृतिक, सामाजिक आणि कौटुंबिकदृष्ट्या श्रीमंत असाचं आहे. अस्सल गावरान वनभोजनासाठी प्रचलित असलेला हा सण मातीशी नाळ जोडणारा आहे. या सणाच्या दिवशी रस्त्यावर, शेतात जणू  उत्सवाचे व जत्र्याचे स्वरूप प्राप्त झालेले असते. म्हणून वेळ अमावस्या हा सण असला,तरी याला उत्सव म्हणणे उचित ठरेल. आनंदाने व श्रद्धेने साजरा केला जाणारा हा उत्सव निसर्गाशी मैत्री जपणारा पर्यावरणपूरक असाच आहे.

                                  

*  म.ई.तंगावार 

मराठी विभाग

                     श्री हावगीस्वामी महाविद्यालय,उदगीर जि.लातूर

                                 भ्र.९८९००६५६९०


( 'युनेस्को'च्यावतीने पुणे येथे 'My Cultural Identity - My Sustainable Development' या विषयावर आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात दि.२१ फेब्रुवारी २०२० रोजी वाचलेला हा शोधनिबंध.

'वेळ अमावस्या.' निमित्त...

या लेखाविषयी आपल्या प्रतिक्रिया, सूचना व नवीन माहिती असेल,तर कमेंट बॉक्समध्ये कळवावे,ही विनंती.)

Comments

  1. अभिनंदन सर, छान मांडणी आणि संदर्भ ही

    ReplyDelete
  2. खूप छान सर अभिनंदन 💐💐💐💐👌👌👌👍👍👍

    ReplyDelete
  3. अप्रतिम आणि परिपुर्ण मांडणी...खूप छान सर

    ReplyDelete
  4. छान लिहिलतं सर.

    ReplyDelete
  5. वेळा अमावस्या या शब्दांचा अपभ्रंश होऊन येळवस हा शब्द तयार झाला असावा खुप छान सर लेख

    ReplyDelete
  6. वेळअमावस्याचा ठेवा अतिशय सुंदररित्या शब्दबध्द केला....अभिनंदन सरजी....!

    ReplyDelete
  7. अतिशय सुंदर माहिती

    ReplyDelete
  8. अभिनंदन सर.. आपण वेळ अमावस्या या सणा विषयी सविस्तर रित्या उत्तम अशी माहिती दिल आहे

    ReplyDelete
  9. अभिनंदन सर.. आपण वेळ अमावस्या या सणा विषयी सविस्तर रित्या उत्तम अशी माहिती दिल आहे

    ReplyDelete
  10. अभिनंदन सर.. आपण वेळ अमावस्या या सणा विषयी सविस्तर रित्या उत्तम अशी माहिती दिल आहे

    ReplyDelete
  11. खूप छान माहिती आहे.... काही प्रमाणात महाराष्ट्राबाहेर वेळ अमवस्या कशी साजरी करतात हे आज माहिती झाली

    ReplyDelete
  12. सुंदर लेख, अप्रतिम सर. धन्यवाद. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला

    ReplyDelete
  13. सुंदर लेख, अप्रतिम सर. धन्यवाद. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला.
    आरीफ बेग औरंगाबाद

    ReplyDelete
  14. खूप छान सर...आपला संशोधनपर लेख वाचत असताना लहानपणीच्या अनेक आठवणी डोळ्यासमोरून सहज तरळून गेल्या...

    ReplyDelete
  15. हा लेख इंग्रजी आणि हिंदी व अन्य कोणत्याही भाषेत वाचता येत आहे.

    ReplyDelete
  16. अप्रतिम.....💐💐 हा प्रामुख्याने उत्तर कर्नाटकात साजरा होतो

    ReplyDelete
  17. खुप छान लेख आहे सर मला खुप आवडलं 💐💐

    ReplyDelete
  18. दादा अतिशय उत्तम व उपयुक्त लेखन

    ReplyDelete
  19. दादा अतिशय उत्तम व उपयुक्त लेखन

    ReplyDelete
  20. खूप छान. अशी माहिती काळजी गरज आहे

    ReplyDelete
  21. खुपच सुंदर...अभिनंदन

    ReplyDelete
  22. खुप अभ्यासपुर्ण आणि सगळ्यात नहत्वाचू भारतीय संस्कृतीसोबतच शेतातील अन्नधान्याचे ऋतुनुसार महत्व व त्यातील लक्ष्मीतत्व खुप छानपणे मांडले गेले आहे! थौडी फार माहिती सगळ्यांना माहित असते पण संस्कृती पासुन भारतीय जीवन मांडण झाल आहे!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बिकट वाट वहिवाट नसावी

मराठी भाषा व साहित्य क्षेत्रातील रोजगाराच्या संधी

पर्यावरण संवर्धन काळाची गरज