विचारशील व्यक्तिमत्त्व : न्या.नरेंद्र चपळगावकर
माजी न्यायमूर्ती नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर यांचा मूळ पिंड हा वैचारिकतेचा आहे. साहित्याची आवड असल्यामुळे एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केल्यानंतर मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. लातूर व औरंगाबाद येथे काही काळ मराठी विषयाचे अध्यापन करून इ. स.१९६२ साली वकिली व्यवसायाला सुरूवात केली. १९९० साली मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली व १९९९ साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांच्या आई - वडिलांवर लहानपणीच स्वातंत्र्यलढ्याचे संस्कार झाले होते. वडील स्वामी रामानंद तीर्थ यांचे अनुयायी होते. त्यामुळे अनंत भालेरावांच्या सहवासात काही काळ नरेंद्र चपळगावकरांना राहता आले. स्वातंत्र्योत्तर मराठवाड्यातील वैचारिक लेखकात न्या.नरेंद्र चपळगावकर हे एक महत्त्वाचे नाव आहे. चपळगावकरांनी संयमितपणे समन्वयवादी भूमिका घेऊन वैचारिक लेखन केले. जुन्या हैदराबाद संस्थानात न्या.कोरटकर, न्या.एकबोट आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर न्या.व्यंकटराव देशपांडे, न्या.कुर्डूकर व न्या.कानडे मराठवाड्यात होऊन गेले. परंतु वैचारिक लेखनात न्या.चपळगावकर यांनी स्व...